Sunday, June 28, 2020

अपरा प्रकृति | Inferior Existence
अष्टधा प्रकृतीमधुनच या नानाविविध विश्वाची निर्मिति होते.  सूक्ष्म पंचमहाभूते, मन, बुद्धि, अहंकार यांनी युक्त असणारी अशी ही अष्टधा अपरा प्रकृति परमेश्वराच्या परा शक्तीपासून भिन्न स्वरूपाची आहे.  अपरा म्हणजेच निकृष्ट स्वरूपाची आहे.  अपरा प्रकृति ही निकृष्ट स्वरूपाची का आहे ?  आचार्य याचे उत्तर देतात –

१) अनृतत्वात्अपरा प्रकृति ही निर्मित असल्यामुळे सतत विकारयुक्त असून मिथ्या स्वरूपाची आहे.
२) जडत्वात् – ही प्रकृति अचेतन आहे.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.
३) दुःखात्मकत्वात् – ही प्रकृति दुःखस्वरूप आहे.  म्हणूनच या विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये सुखाची अनुभूति येत नाही.  इंद्रियांच्या माध्यमातून घेतलेले सर्व विषयांचे उपभोगही दुःखालाच कारण होतात.  दुःख दोन प्रकाराने होते.  प्रियवियोगेन – प्रिय विषयांच्या वियोगाने आणि अप्रियसंयोगेन – अप्रिय विषयांच्या संयोगानेही दुःखप्राप्ति होते.  
४) अशुद्धत्वात् – ही अपरा प्रकृति रजोगुण व तमोगुणाच्या प्रभावाने युक्त असल्यामुळेच तिला अशुद्ध अथवा मलिन प्रकृति असे म्हणतात.  
५) पुरुषाधीनत्वात् – ही अपरा प्रकृति जड, अचेतन असल्यामुळे तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.  म्हणून सत्तास्फूर्तीसाठी ती पुरुषावर अवलंबून आहे.  म्हणजे परमात्म्याच्या चेतानात्मक प्रकृतीवर अवलंबून आहे.  
६) वेद्यत्वात् – अशी ही प्रकृति वेद्य म्हणजेच दृश्य, इंद्रियगोचर आहे.  मनाच्या, बुद्धीच्या साहाय्याने तिचे स्वरूप जाणता येते.
७) ज्ञानेन निवर्त्यत्वात् – ही अपरा प्रकृति आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे मिथ्या, जड, दुःखात्मक, अशुद्ध, पुरुषाधीन असेल तरीही ती दृश्य, वेद्य असल्यामुळे तिचे ज्ञान घेता येते.  

ही अपरा प्रकृति बुद्धीवर अज्ञानाचे आवरण घालून जीवाला बहिर्मुख, विषयासक्त करते आणि क्रमाने जीवाचे अधःपतन करते.  ती संसारवर्धन करून जीवाला स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवते.  जीवांना मोहीत करून कठपुतली बाहुल्यांच्याप्रमाणे जन्मानुजन्मे नाचविते.- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998


- हरी ॐ