अज्ञान ही अंतःकरणाची एक अवस्था किंवा
वृत्ति आहे. या वृत्तीशी 'मी' तादात्म्य
पावतो. त्यामुळे आपण म्हणतो की, "मी अज्ञानी आहे". यामध्ये "मी आहे" हा पहिला
अनुभव असून "मी अज्ञानी आहे" हा दुसरा अज्ञानाचा अनुभव आहे. म्हणजेच प्रथम मला 'मी' ची जाणीव आहे. I am conscious of myself. परंतु यापुढे जाऊन मी म्हणतो की, "मी अज्ञानी आहे." येथे मला अज्ञानाची जाणीव होते.
परंतु हे वाक्यच चुकीचे आहे. "मी अज्ञानी आहे", यात "मी" म्हणजे कोण ? "मी" म्हणजे subject, the knower आहे. त्यामुळे "मी" कधीही अज्ञानी होऊच
शकत नाही, कारण
मला माझ्या अज्ञानाचे ज्ञान, जाणीव
आहे. त्यामुळे 'अज्ञान' हा 'मी' चा धर्म नसून अंतःकरणाची वृत्ति आहे. अज्ञानाची जाणीव 'मी' ला Subject ला होते. अज्ञान हे ज्ञेय, अनुभवयोग्य (object) आहे. म्हणून 'मी' हा
अज्ञानाचाही ज्ञाता आहे. I know that I am ignorant. I am
aware of my own ignorance.
अज्ञान हे तर जड-अचेतन स्वरूपाचे आहे. त्यामुळे अज्ञानच अज्ञानाला जणू शकत नाही. म्हणून अज्ञानापासून भिन्न असणारा 'मी' सचेतन
ज्ञाता अज्ञानाला जाणतो. अज्ञान हे ज्ञेय आहे व 'मी' ज्ञाता आहे. परंतु आपण म्हणतो की, I am ignorant. I want to get rid
of my ignorance. येथे 'मी' अज्ञ आहे हा अध्यास आहे. फक्त एक कल्पना आहे. या कल्पनेचा निरास केला की, आपोआपच 'मी' अज्ञानापासून निवृत्त होऊन, अज्ञानापासून भिन्न असणारा अज्ञानाचा ज्ञाता होतो. 'मी' च अज्ञानाचे अधिष्ठान आहे. घटद्रष्टा घटात् भिन्नः | या न्यायाने 'मी' ज्ञाता हा ज्ञेय अज्ञानापासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचा
आहे.
ज्ञेय ब्रह्म अव्यक्ताच्या अतीत असून तेच 'अनादिमत्परं' आहे. ते अज्ञानाच्या अतीत आहे. म्हणजेच ते स्वरूप अज्ञानाने लिप्त, स्पर्शित, आवृत्त
होत नाही. चैतन्यस्वरूपावर अज्ञान कधीही
आवरण घालू शकत नाही.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–

