श्रीवसिष्ठ मुनि येथे आणखी सखोल विचार सांगतात.
ब्रह्माजी हा कारण नाही आणि विश्व हे कार्यही
नाही. त्यामुळे ब्रह्माजीमधून विश्व निर्माण
झाले, असे म्हणणे केवळ औपचारिक आहे. मग हे
सगळे दिसते ते काय आहे ? श्रीवसिष्ठ मुनि सांगतात
- यद्रुक् एव परं ब्रह्म तादृक् एव जगत् त्रयम् | हे रामा ! संपूर्ण त्रैलोक्य हे परब्रह्मस्वरूप
आहे. म्हणून "विश्व मिथ्या आहे"
असे म्हणणे म्हणजेच "विश्व परब्रह्मस्वरूप आहे" असे म्हणणे होय.
हे आपण दृष्टांतावरून समजावून घेऊ. जसे पाण्यामधून लाट निर्माण होते. पाणी हे कारण व लाट हे कार्य आहे. असे जरी असले तरी ज्यावेळेस आपण पाण्याच्या दृष्टीने
पाहतो, त्यावेळी लाट नाहीच. फक्त पाणीच आहे.
म्हणून वस्तुतः पाणी हे कारण नाही व लाट हे
कार्यही नाही. वस्तुतः पाण्यामधून काहीही निर्माण
झाले नाही. निर्माण होतच असेल तर तो केवळ लाटेचा
भास आहे. पाण्यामधून लाट निर्माण झाली,
असे म्हणणे म्हणजे वाचेचा केवळ उपचार आहे. म्हणून लाट हा केवळ भ्रम आहे.
मग दिसते ते काय आहे ? दिसते ते केवळ पाणी आहे ! म्हणून लाट नाही, असे म्हणणे म्हणजे लाट पाणीस्वरूप
म्हणणे असे होय. काहीच नाही, असे म्हणणे म्हणजे
अधिष्ठानाची सत्ता मान्य करणे होय. कारण
अभावाला सुद्धा सत्ता आहे. अभावाचे ज्ञान होण्यासाठी सत्तेचीच आवश्यकता आहे. म्हणून जग मिथ्या आहे, असे म्हणणे म्हणजे जग ब्रह्मस्वरूप
आहे, असे म्हणण्यासारखे आहे.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022
- हरी ॐ–