Tuesday, October 27, 2026

त्रैलोक्यरूपी माया | The Cosmic Maya

 




हे राघवा !  ही त्रैलोक्यरूपी स्त्री जणु काही चित्तामधूनच उत्पन्न होऊन तिची कल्पना अत्यंत दृढ झाली आहे.  या त्रैलोक्यरूपी स्त्रीचा जन्म सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्यामधून झाला.  त्यामुळेच या चित्ताने सर्व लोकांना भ्रम उत्पन्न केला आहे.  मात्र चित्त शांत झाले, चित्ताची उपशमा होऊन वासनाक्षय झाला की, मग मात्र चित्ताची माया नष्ट होते.  त्यावेळी त्या अवस्थेलाच 'कर्मक्षय' असे म्हटले जाते.

 

हे रामा !  या संसाररूपी भयंकर असणाऱ्या रहाटाला वासनारूपी दोरी बांधली आहे.  या वासनारूपी दोरीमुळे हे संसाराचे रहाटचक्र अखंड फिरत असते.  त्यामध्येच अनेक जीव भरडले जातात.  त्यामुळे हे रामा !  ही वासनारूपी दोरीच तू प्रयत्नाने तोडून टाक.  त्याचवेळी रहाटचक्ररूपी संसाराचे फिरणे थांबेल.  जोपर्यंत या वासनेचे किंवा अविद्येचे स्वरूप यथार्थपणे समजत नाही, तोपर्यंत ती वासना जीवाला महामोहामध्ये गुंतवीत राहते.  परंतु तिच्या स्वरूपाचे ज्ञान झाले की, मग मात्र तीच वासना अनंत सुख देऊन जीवाला ब्रह्मपदही प्रदान करते.  अशी ही वासना म्हणजेच माया ही ब्रह्मापासूनच उत्पन्न झालेली आहे.  अत्यंत लीलया ती या सर्व संसाराचा उपभोगही घेते आणि पुन्हा ब्रह्माचे चिंतन करीत ती ब्रह्मामध्येच विलीन होते.

 

हे राघवा !  जसे तेजापासून प्रकाश उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे शिवस्वरूप, रूपरहित, अप्रमेय, निरामय, निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक अशा आत्मचैतन्यापासूनच ही सर्व भूतमात्रे उत्पन्न होतात.  जसे झाडाच्या पानामध्ये शिरा असतात, पाण्यामध्ये अनेक लाटा असतात, सोन्यामध्ये अलंकार असतात, अग्नीमध्ये उष्णता असते, त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपामध्ये हे त्रैलोक्य अस्तित्वात असते.  ब्रह्मामधूनच त्रैलोक्याची उत्पत्ति होते, ब्रह्मामध्येच ते स्थित असते आणि नंतर ते ब्रह्मामध्येच लय पावते.  म्हणून त्रैलोक्य हे ब्रह्ममय आहे आणि तेच ब्रह्म सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणामध्येही प्रत्यगात्मरूपाने स्थित असते.

 

अशा या ब्रह्मस्वरूपाला जो जाणतो, त्याने संपूर्ण त्रैलोक्याला जाणल्यासारखेच आहे.  कारण पाण्याला जाणणे म्हणजेच सर्व लाटांचे स्वरूप जाणणे होय.  जग हे ब्रह्ममय असल्यामुळे एका ब्रह्माला जाणले की, सर्व विश्वच ज्ञात होते. इतकेच नव्हे, तर जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो, तोच या त्रैलोक्यामध्ये खरा ज्ञाता आहे.  कारण त्याने संपूर्ण त्रैलोक्याला जाणले आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–