Tuesday, October 27, 2026

त्रैलोक्यरूपी माया | The Cosmic Maya

 




हे राघवा !  ही त्रैलोक्यरूपी स्त्री जणु काही चित्तामधूनच उत्पन्न होऊन तिची कल्पना अत्यंत दृढ झाली आहे.  या त्रैलोक्यरूपी स्त्रीचा जन्म सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्यामधून झाला.  त्यामुळेच या चित्ताने सर्व लोकांना भ्रम उत्पन्न केला आहे.  मात्र चित्त शांत झाले, चित्ताची उपशमा होऊन वासनाक्षय झाला की, मग मात्र चित्ताची माया नष्ट होते.  त्यावेळी त्या अवस्थेलाच 'कर्मक्षय' असे म्हटले जाते.

 

हे रामा !  या संसाररूपी भयंकर असणाऱ्या रहाटाला वासनारूपी दोरी बांधली आहे.  या वासनारूपी दोरीमुळे हे संसाराचे रहाटचक्र अखंड फिरत असते.  त्यामध्येच अनेक जीव भरडले जातात.  त्यामुळे हे रामा !  ही वासनारूपी दोरीच तू प्रयत्नाने तोडून टाक.  त्याचवेळी रहाटचक्ररूपी संसाराचे फिरणे थांबेल.  जोपर्यंत या वासनेचे किंवा अविद्येचे स्वरूप यथार्थपणे समजत नाही, तोपर्यंत ती वासना जीवाला महामोहामध्ये गुंतवीत राहते.  परंतु तिच्या स्वरूपाचे ज्ञान झाले की, मग मात्र तीच वासना अनंत सुख देऊन जीवाला ब्रह्मपदही प्रदान करते.  अशी ही वासना म्हणजेच माया ही ब्रह्मापासूनच उत्पन्न झालेली आहे.  अत्यंत लीलया ती या सर्व संसाराचा उपभोगही घेते आणि पुन्हा ब्रह्माचे चिंतन करीत ती ब्रह्मामध्येच विलीन होते.

 

हे राघवा !  जसे तेजापासून प्रकाश उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे शिवस्वरूप, रूपरहित, अप्रमेय, निरामय, निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक अशा आत्मचैतन्यापासूनच ही सर्व भूतमात्रे उत्पन्न होतात.  जसे झाडाच्या पानामध्ये शिरा असतात, पाण्यामध्ये अनेक लाटा असतात, सोन्यामध्ये अलंकार असतात, अग्नीमध्ये उष्णता असते, त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपामध्ये हे त्रैलोक्य अस्तित्वात असते.  ब्रह्मामधूनच त्रैलोक्याची उत्पत्ति होते, ब्रह्मामध्येच ते स्थित असते आणि नंतर ते ब्रह्मामध्येच लय पावते.  म्हणून त्रैलोक्य हे ब्रह्ममय आहे आणि तेच ब्रह्म सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणामध्येही प्रत्यगात्मरूपाने स्थित असते.

 

अशा या ब्रह्मस्वरूपाला जो जाणतो, त्याने संपूर्ण त्रैलोक्याला जाणल्यासारखेच आहे.  कारण पाण्याला जाणणे म्हणजेच सर्व लाटांचे स्वरूप जाणणे होय.  जग हे ब्रह्ममय असल्यामुळे एका ब्रह्माला जाणले की, सर्व विश्वच ज्ञात होते. इतकेच नव्हे, तर जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो, तोच या त्रैलोक्यामध्ये खरा ज्ञाता आहे.  कारण त्याने संपूर्ण त्रैलोक्याला जाणले आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–



Tuesday, October 20, 2026

अध्यारोप-अपवाद न्याय | Imposition-Negation Methodology

 




ज्यावेळी अत्यंत गूढ रहस्य सांगावयाचे असते त्यावेळी ते कधीही सरळ-सरळ, स्पष्टपणे सांगत नाहीत.  ते विरोधाभासामधुनच प्रकट केले जाते.  शास्त्रकार म्हणतात –

अध्यारोपापवादन्यायेन गुरुः शिष्यं उपदिशति |

किंवा –

अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपञ्चं प्रपञ्च्यते |

 

अध्यारोप-अपवाद यांच्या साहाय्याने निर्विशेष परब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाचा उपदेश गुरु शिष्याला करतात.  ही अत्यंत अवघड पद्धत आहे.  केवळ उपदेश देणे, प्रवचन देणे, व्याख्याने देणे सोपे आहे.  परंतु एखाद्याला शिकविणे, समजावून - पटवून देणे ही अवघड गोष्ट आहे.  हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे !  त्यामुळे अत्यंत विद्वान, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ गुरु शिष्याला अध्यारोपअपवादन्यायाने या आत्मतत्त्वाचा उपदेश करतात.

 

भगवंतांनी गीतेमध्ये अनेक ठिकाणी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे.  दुसऱ्या अध्यायामध्येही स्थितप्रज्ञदर्शनामध्ये "तो चालतो पण चालत नाही, बोलतो पण बोलत नाही, करतो पण करीत नाही," असे स्थितप्रज्ञ पुरुषाचे विरोधी वर्णन केलेले आहे.  या श्लोकामध्येही भगवान, "सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च |"  

असे परस्परविरोधी वर्णन करतात.

 

अध्यारोप म्हणजेच प्रथम अध्यास करणे आणि अपवाद म्हणजे अध्यासाचा निरास करणे होय.  येथे भगवंतांनी परब्रह्मस्वरूपामध्ये सर्व इंद्रियांचा अध्यारोप, अध्यास करून परब्रह्माची सत्ता सिद्ध केली आणि नंतर परब्रह्म हेच फक्त सत्य आहे, हे सांगताना सर्व इंद्रियरूपी अध्यस्त उपाधींचा निरास करून परब्रह्म निरवयव, निरुपाधिक, निर्विशेष स्वरूपाचे आहे, असे प्रतिपादन केले.  

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–



Tuesday, October 13, 2026

ज्ञान आणि सदाचार - दृष्टांत | Parable Of Knowledge & Virtue

 




मनुष्याच्या अंतःकारणामध्ये सदाचार उदयाला आला तरच येथे आत्मज्ञान सुप्रतिष्ठित होऊन सुस्थिर होऊ शकते.  मात्र त्यासाठी साधकाच्या मनामध्ये प्रथम सदाचाराचा संकल्प हवा.  संकल्पाशिवाय साधना घडू शकत नाही.  साधनेला, मनुष्याच्या प्रयत्नांना संकल्पाचे सामर्थ्य मिळाले पाहिजे.  म्हणून वसिष्ठ मुनि येथे अत्यंत तळमळीने सदाचाराचे महत्त्व सांगतात.  हे रामा !  साधकाने आत्मज्ञान तर प्राप्त करावेच पण त्याचबरोबर शमादि गुणही प्राप्त करावेत.  किंवा शमादि गुण प्राप्त करता-करता आत्मज्ञान प्राप्त करावे.  या दोन्हीही गोष्टी सहज शक्य आहेत.

 

हे रामा !  समजा, एखाद्या शेतामध्ये भरघोस पीक आले असेल, अशा वेळी वडील आपल्या मुलीला त्या शेताचे रक्षण करण्यासाठी शेतावर पाठवितात.  त्यावेळी ती मुलगी शेतावर जाते आणि पीकांवर लक्षही ठेवते.  परंतु पीकांवर लक्ष ठेवायचे म्हणून केवळ बसूनच राहत नाही.  ती हरहुन्नरी मुलगी आपल्या मैत्रिणींना जमवेल, तेथे मुक्त कंठाने गाणी म्हणेल, सर्वजण मिळून सुंदर नृत्य करतील.  त्यावेळी पीकांवरील पक्षी आपोआपच उडून जाऊन पीकांचे रक्षण होते.  म्हणजे एका बाजूला ही मुलगी शेतही सांभाळते आणि दुसऱ्या बाजूला ते सांभाळताना नृत्यगीतामधील आनंदही घेते.

 

त्याचप्रमाणे हे राघवा !  ज्ञानी पुरुष अत्यंत सहजतेने आत्मज्ञान घेतात.  आत्मज्ञानासाठी श्रवण, मनन, चिंतनादि साधनेमध्ये प्रवृत्त होतात.  आत्ताच सांगितल्याप्रमाणे शमादि सर्व साधनांचे व सदाचाराचे अनुसरण करतात.  ते करता-करता आपोआपच त्यांच्या अंतःकरणामधील कामक्रोधादि प्रतिबंध त्या पक्षांच्याप्रमाणे दूर होतात.  म्हणजे साधक एका बाजूला साधना करायला लागला, सत्संगामध्ये गेला, आत्मविचार करू लागला की, दुसऱ्या बाजूला कामक्रोधादि विकार नाहीसे होऊन त्याचे मन शुद्ध होते आणि त्याला सहजच परमपदाची प्राप्ति होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–



Tuesday, October 6, 2026

आत्म्याची विशेषणे | Adjectives For The Supreme Being

 




श्रुति आत्म्याची अनेक विशेषणे सांगते –

१. पर्यगात् – आत्मचैतन्य नाही असे एकही स्थान नाही.  परंतु जाऊनही तो या सर्वांच्या अतीत, सर्वांच्यापासून अलिप्त, अपरिणामी, अस्पर्शित स्वरूपाने राहातो.

२. शुक्रम् – आत्मा हा शुक्रं म्हणजेच अत्यंत तेजस्वी, ओजस्वी असून शुद्ध, दीप्तिमान स्वयंप्रकाश-स्वरूप आहे.  त्याच्याच प्रकाशामध्ये अव्यक्तापासून स्थावरान्तपर्यंत सर्व विश्व प्रकाशमान होते.

३. अकायम् – आत्मा शरीररहित, उपाधीरहित आहे.  याठिकाणी शरीर म्हणजेच लिंगशरीर होय.  लिंग म्हणजेच सूक्ष्मशरीर.  तसेच आत्मा सूक्ष्मशरीराच्याही अतीत आहे.

४. अव्रणम् – ज्याला कोणताही व्रण म्हणजेच क्षति किंवा इजा नाही, त्याला ‘अव्रणम्’ असे म्हणतात.  आत्मा हा इजारहित, व्रणरहित आहे.

५. अस्नाविरम् – ज्याच्यामध्ये स्नायू, शिरा म्हणजेच नाडी, त्याचप्रमाणे मज्जा, अस्थि रक्त, मांस वगैरे धातु नाहीत, त्याला ‘अस्नाविरम्’ असे म्हणतात.  आत्मा स्थूल शरीराच्याही अतीत आहे.  

६. शुद्धम् – शुद्ध म्हणजे निर्मळ, अविद्यामलरहित स्वरूप होय.  म्हणजेच आत्मा हा कारण शरीराच्याही अतीत आहे.

७. अपापविद्धम् – आत्मस्वरूपामध्ये धर्मादि पाप-पुण्याचा अभाव आहे.  म्हणजेच आत्मा कर्म-कर्मफळाच्याही अतीत आहे.

८. कविः – कवी म्हणजेच क्रान्तदर्शी किंवा सर्वदर्शी होय.  जो ज्ञानाने सर्व पाहू शकतो, जणू शकतो, त्यास ‘कवी’ असे म्हणतात.

९. मनीषी – जो मनाला प्रेरणा देतो, तो सर्वज्ञ ईश्वर म्हणजेच चैतन्य होय.  आत्मचैतन्यच मनाला सत्ता आणि स्फूर्ति प्रदान करते.

१०. परिभूः – आत्मचैतन्य हे सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ, सर्वोत्तम असल्यामुळेच त्यास ‘परिभूः’ असे म्हणतात.

११. स्वयंभूः – जो स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने निर्माण होतो, त्यास ‘स्वयंभू’ असे म्हणतात.  आत्मचैतन्याला निर्माण होण्यासाठी अन्य कोणत्याही कारणाची आवश्यकताच नाही.  कारण नसल्यामुळे त्याचा जन्मही शक्य नाही.  म्हणूनच त्यास अजन्मा, जन्ममृत्युरहित असे म्हणतात.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ–