Tuesday, October 24, 2023

संसाराची दलदल | The Swamp Of Illusion

 



प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्येच निरतिशय आनंदस्वरूप परमात्मा निवास करीत असेल तरी दुर्दैवाने सर्व जीव स्वस्वरूपाचा शुद्ध आनंद न अनुभवता फक्त दुःखकारक संसाराचाच अनुभव घेतात.  याला कारण स्वस्वरूपावर आलेले अज्ञान आणि अज्ञानजन्यकार्याचे आवरण होय.  ज्याप्रमाणे गाईच्या सडामध्ये अमृततुल्य दूध असते;  परंतु त्याच सडावर बसलेली गोचीड अमृततुल्य दूध न पिता रक्तच शोषत असते.  प्रकाशस्वरूप असलेल्या सूर्यावर आवृत्त झालेल्या कृष्णवर्णीय ढगाच्यामुळे सूर्य काळवंडलेला, तेजोहीन दिसतो.  तो ढगाच्या मागे असूनही त्याच्या स्वरूपाने अनुभवायला येत नाही.

 

त्याचप्रमाणे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे नित्य, शाश्वत, निरतिशय सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृति होते.  नित्य काय ?  आणि अनित्य काय ?  हे कळत नाही.  या अविवेकामुळे सर्व जीव देहाशी तादात्म्य होतात.  यामधून त्यांच्या अंतःकरणामध्ये अनात्मस्वरूपाच्या विषयांच्याच उपभोगण्याच्या कामना निर्माण होतात.  खरे पाहाता त्यांची निरतिशय आनंद मिळावा हीच मूलभूत कामना असते;  परंतु निरतिशय आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न करता विषयभोगाची इच्छा करतात.  विषयभोगामधून ते निरतिशय आनंद मिळविण्याची इच्छा करतात.  परंतु सर्व विषय उपभोग घेऊनही त्यांना आयुष्यामध्ये कधीही आनंद मिळत नाही.  त्यांच्या सर्व कामना व्यर्थ, निष्फळच होतात.

 

येथे शंका येईल की आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न होता विषयांच्या इच्छा का निर्माण होतात ?  याचे उत्तर भगवान देतात – त्या सर्व अविवेकी लोकांनी राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेला असतो.  त्यांचे कोणतेही कर्म निःस्वार्थ, निष्काम आणि उदात्त भावाने नसल्यामुळे सर्व कर्मे व्यर्थच असल्यासारखी आहेत.  सकाम ज्ञानाने फक्त कामना आणि कर्मफळाची वासना अधिक वृद्धिंगत होते.  म्हणून त्यांचे सर्व ज्ञान निष्फळ झाल्यासारखे होते.  रजोगुण आणि तमोगुणात्मक अविद्या मायेच्या प्राधान्यामुळे रज आणि तमोविकारांच्या आहारी जाऊन प्रकृतीचे गुलाम होतात आणि अधःपतित होतात.  ते संसारामध्येच संपूर्ण अडकतात.  यामुळे मी परमात्मा त्याच्या हृदयामध्ये निवास करून सुद्धा ते मला जाणत नाहीत.  ते मला प्राप्त न होता संसाराला प्राप्त होतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ