Showing posts with label Love. Show all posts
Showing posts with label Love. Show all posts

Tuesday, July 14, 2026

प्रेम आणि ज्ञानी पुरुष | Love and The Self-Realized

 




अज्ञानी पुरुष कधीतरी प्रेम करतो आणि पुष्कळ वेळेला द्वेष करतो.  कधीतरीच त्याला प्रेमाचा उमाळा येतो परंतु ती प्रेमाची उर्मी काळाच्या ओघात निघूनही जाते.  म्हणजेच जोपर्यंत अहंकाराला पोषक वातावरण असते, तोपर्यंतच प्रेम असते, नंतर तो तिरस्कार करतो.  असे प्रेम तर कोणीही करते.  पशु सुद्धा करतात.  त्यामध्ये काही विशेष पुरुषार्थ नाही.  परंतु ज्ञानी पुरुष मात्र नित्य-निरंतर प्रेम करतो.  येथे ‘निरंतर’ हा खूप महत्वाचा शब्द आहे.  अज्ञानी पुरुष द्वेष करणे सोडत नाही आणि ज्ञानी पुरुष प्रेम करणे, क्षमा करणे सोडत नाही.

 

मनुष्य स्वतःवरच जास्त प्रेम करतो.  आत्मस्वरूप हेच प्रेमाचे आश्रयस्थान आहे.  माणसाने दुसऱ्यांवर कितीही प्रेम केले तरी ती प्रेमाची उर्मी येते आणि निघूनही जाते.  प्रेमाची जागा द्वेषबुद्धि घेते.  त्याला ‘प्रेम’ म्हणता येत नाही.  म्हणून मनुष्याचे खरे प्रेम स्वतःवरच आहे.  मी अखंडपणे माझ्यावर सतत प्रेमच करीत असतो.  मी कधीही मला अप्रिय होत नाही.  मी माझ्या स्वतःचा द्वेष करूच शकत नाही.  ज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही.  त्याला समत्वाची, एकत्वाची दृष्टि प्राप्त होते.  जसे तो स्वतःवर प्रेम करतो, तसेच सर्वांच्यावर करू शकतो.

 

श्री रामकृष्ण परमहंस फार सुंदर गोष्ट सांगत – एकदा एक विंचु पाण्यामध्ये पडला.  त्या विंचवाला वाचविण्यासाठी एक साधु त्याला पाण्यातून बाहेर काढत होता, पण विंचु त्याला चावत होता.  असे एकदा नाही तर अनेक वेळेला घडले.  त्यावेळी हे सर्व पाहणारा एक मनुष्य त्या साधूला म्हणाला की, “तो विंचु तुम्हाला चावत आहे तरी तुम्ही त्याला का वाचवत आहात ?”  त्यावर साधु उत्तर देतो, “चावणे हा विंचवाचा धर्म आहे, विंचु त्याचा धर्म सोडत नाही.  दया करणे हा साधूचा धर्म आहे, मग तो मी का बरे सोडू ?”  ही साधूची, ज्ञानी पुरुषाची उदात्त परमोच्च दृष्टि आहे.  त्या दृष्टीमध्ये स्वार्थ नाही, कामना अपेक्षा नाहीत, व्यक्तिगत रागद्वेष नाही, आपपर भाव नाही, अहंकार, ममकार प्रत्यय नाहीत, तर ती शुद्ध, निर्विशेष, आत्मचैतन्यस्वरूपाची अभेद दृष्टि आहे.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ–



Tuesday, January 28, 2025

खरे प्रेम कोणावर ? | Whom Do We Love Truly ?

 




विश्वामध्ये सर्व जीव स्वतःवरच खरे प्रेम करतात.  म्हणूनच याज्ञवल्क्य ऋषि मैत्रेयीला उपदेश करतात – आत्मनः वा अरे पत्युः कामाय सर्वं प्रियं भवति |  (बृह. उप. २-४-५)
“हे मैत्रेयी !  विश्वामध्ये स्वतःच्या कामनेसाठीच मनुष्याला सर्व विषय प्रिय होतात.  जर मनुष्य अन्य व्यक्तींच्यावर, विषयांच्यावर प्रेम करीत असेल, तर ते विषयांच्यासाठी किंवा दुसऱ्यांसाठी करत नाही.  पति पत्नीवर, पत्नी पतीवर, आईवडिल मुलांच्यावर प्रेम करीत असतील, तर ते प्रेम स्वतःसाठीच आहे.  प्रेम करण्यात मला आनंद मिळतो म्हणून मी प्रेम करतो.  जेथे जेथे मला आनंद मिळतो, जी जी व्यक्ति मला आनंद देते, अनुकूल आहे, तेथेच मी प्रेम करतो.”  म्हणून व्यवहारामध्ये आपण कितीही I love you, I love you ! असे म्हणालो, तरी I love myself alone !  हेच सत्य आहे.  संपूर्ण विश्वामध्ये मी हाच एकमेव माझ्या प्रेमाचा विषय आहे.  कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये, काळामध्ये, स्थानामध्ये मी मला अप्रिय होत नाही.  बाकी सर्व विषय काही काळ प्रिय होतात, काळाच्या ओघात पुन्हा अप्रिय होतात.  परंतु मी मला मात्र सतत सर्व ठिकाणी सर्व काळामध्ये प्रिय होतो.
 
त्याचप्रमाणे, मी आनंदावर प्रेम करतो.  कोणताही मनुष्य कधीही दु:खावर प्रेम करीत नाही आणि आनंद हेच आत्म्याचे स्वरूप आहे.  श्रुति म्हणते – आनंदो ब्रह्मेति व्यजानात् |  (तैत्ति. उप. ३-६)
आनंद हेच ब्रह्माचे स्वरूप आहे.  परमप्रेमआस्पदत्वात् |  परमप्रेम हेच ब्रह्माचे स्वरूप
आहे.  म्हणून ज्ञानी पुरुष आत्म्यावर, स्वस्वरूपावरच नितांत प्रेम करतो.  तो अनित्य विषयांच्यामध्ये मुळीच रममाण होत नाही.  

भगवान म्हणतात –
ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते |
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ||  (गीता अ. ५-२२)  
इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगामधून निर्माण झालेले सर्व भोग दु:खालाच कारण आहेत.  ते सर्व भोग अनित्य, नाशवान, दु:खस्वरूप असल्यामुळे ज्ञानी पुरुष त्यामध्ये रममाण होत नाही.

याउलट भगवान म्हणतात (गीता. अ. ३-१७) –
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव: |  आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ||
जो आत्मरति होतो, आत्म्यावरच प्रेम करतो, तो स्वस्वरूपामध्ये स्वतःच्याच स्वरूपाने तृप्त, संतुष्ट होतो.  तोच कृतकृत्य होतो.  म्हणून ज्ञानी पुरुष आनंदस्वरूप परमात्म्यावरच प्रेम करतो.


     

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ–



Tuesday, June 21, 2022

ज्ञानयुक्त प्रेम | Knowledge Based Affection

 



गोपींना ज्ञान झाले होते का ?  कारण गोपींनी फक्त श्रीकृष्णावर एकनिष्ठ प्रेम केले.  त्या संपूर्ण समर्पण झाल्या होत्या.  प्रेमाने त्या धुंद, वेड्या झालेल्या होत्या.  त्यांना स्वतःची नव्हे घरादाराची सुद्धा शुद्ध नव्हती.  परंतु हा प्रश्न भक्तीमध्ये निर्माण होत नाही.  प्रेमात ज्ञान हे गृहीत आहे.

 

व्यवहारात आपण पाहतो की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीची प्रथम ओळख होते आणि नंतर हळूहळू त्याच्या गुणांची, ज्ञानाची प्रगल्भता कळते तसे त्याच्यावरचे प्रेम वाढू लागते.  म्हणजेच प्रेम आणि ज्ञान भिन्न नसून परस्पर आश्रित आहे.  श्रद्धा आणि प्रेमाशिवाय ज्ञान असेल तर ते अहंकार, दंभ, दर्प, उद्धटपणा वगैरे निर्माण करेल आणि ज्ञानाशिवाय प्रेम असेल तर ती फक्त उचंबळून येणारी भावना राहील.  त्यात फक्त शारीरिक आकर्षणाचा भाग अधिक असेल.  त्या प्रेमामध्ये कामुकता निर्माण होऊन उपभोगण्याची वासना निर्माण होईल.  प्रेमाचा उत्कर्ष होण्याऐवजी प्रेम हळूहळू कमी होईल.  तसेच प्रेम आनंदवर्धक होण्याऐवजी दुःखवर्धन करण्यास कारण ठरेल.

 

व्यवहारात आपण मंदिर दिसले की मूर्तीला बघून नमस्कार करतो.  भक्त तो केवळ दगड पाहात नाही तर त्याठिकाणी ईश्वरत्व पाहातो.  म्हणूनच त्याची श्रद्धा, भावना त्या पिंडाशी निगडित झालेल्या असतात.  त्यामुळे डोळ्यांना जरी तो दगड दिसत असला तरी अंतःचक्षूंना परमेश्वराचे सगुण, साकार रूप दिसते.  याचाच अर्थ त्याला माहात्म्यज्ञान आहे.  हे माहात्म्य, दिव्यता, भव्यता डोळ्यांना दिसत नाही तर मनाला प्रचीतीला येते.

 

याप्रमाणे गोपींना सुद्धा माहात्म्यज्ञान होते.  म्हणूनच त्यांचे प्रेम कामनारहित, शुद्ध प्रेम होते.  त्यांच्यात अहंकार, दंभ, दर्प वगैरेचा लेशमात्रही दोष नव्हता.  त्या अनन्यभावाने परमेश्वराला समर्पण झालेल्या होत्या.  त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अध्यात्मज्ञानाचा उपदेश दिला होता.  गोपींच्या अनुभूतीमध्ये अद्वैताचे, एकत्वाचे ज्ञान होते.  त्यांची भक्ति परमप्रेमस्वरूपाची, अमृतस्वरूपाची होती.  यामुळेच त्यांचे जीवन पूर्ण, तृप्त झाले होते.  कृतकृत्य झाले होते.  अनन्य भक्तीने त्या मुक्त झालेल्या होत्या.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, May 15, 2018

साधूंची प्रेम-छाया | Love-Canopy of Saints




शास्त्रकार सुंदर दृष्टांत देतात.  आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत.  सर्व अवयवांच्यावर आपण सारखेच प्रेम करतो.  एका हाताला लागले तर दुसरा हात त्यावरून हळुवारपणे फिरविला जातो.  तेथे आपण कोणताच भेद करीत नाही.  नव्हे, आपल्या मनामध्ये भेदाची कल्पनादेखील निर्माण होत नाही.  

याप्रमाणेच साधकाने सर्व जीवांना समदृष्टीने पाहावे.  सर्वांच्यावर शुद्ध प्रेम करावे.  वास्तविक प्रेम करता येत नाही.  प्रेम दाखविताही येत नाही.  तर “प्रेम” हा मनुष्याचा स्वभाव झाला पाहिजे.  या विश्वामध्ये प्रेमाइतकी कोणतीही पवित्र, सुंदर, शुद्ध गोष्ट नाही.  प्रत्येक जीव प्रेमाचा भुकेला असतो.  प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी जीवनभर मनुष्य आसुसलेला असतो.  हे शुद्ध प्रेम फक्त साधु पुरुषच करू शकतो.  

आजपर्यंत सर्व समाजावर साधूंनी, संतांनीच शुद्ध प्रेम केलेले आहे.  आपल्या प्रेमळ शब्दांच्या हळुवार स्पर्शाने लाखो जीवांची आसवे पुसलेली आहेत.  त्यांना या दुःखसागरामधून बाहेर काढलेले आहे.  याचे कारण साधु पुरुषाच्या मनामधून राग, द्वेष, कामुकता, स्वार्थ या सर्व वृत्ति गळून पडलेल्या असतात.  तोच निःस्वार्थ, निष्काम प्रेम करतो.  म्हणून साधूंच्या सहवासात शुद्ध आनंदाची प्राप्ति होते.  त्यांच्या प्रेमवृक्षाच्या छायेमध्ये सर्व दुःखी-कष्टी जीव आनंदी, प्रसन्न होतात.  

यासाठीच साधकाने अहंकार-ममकार, राग-द्वेष यांचा त्याग करून हिंसात्मक वृत्तीच्या विरुद्ध असणारी प्रतिपक्षभावना म्हणजेच “प्रेमवृत्ति” आत्मसात केली पाहिजे.  म्हणजे आपोआपच “अहिंसावृत्ति” आत्मसात होईल.  या शुद्ध, शांत मनामध्येच ज्ञानाचा उदय होईल.  म्हणून “अहिंसा” हा स्वभाव झाला पाहिजे.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ – 

Tuesday, August 15, 2017

दयेची अपेक्षा | Expecting Empathy


जनकृपा उत्सृज्यताम् |  याचा दुसरा अर्थ म्हणजे लोकांच्याकडून साधकाने कृपेची, प्रेमाची, मदतीची अपेक्षा करू नये.  दुसऱ्याकडून दयेची अपेक्षा करणारा स्वतःजवळ शांतीने, समाधानाने राहू शकत नाही.  (I am not happy with myself, so I feel I am insecure.  Then I demand love and affection from others.)  असुरक्षिततेच्या भावनेतून मनुष्य सतत मदतीची व प्रेमाची याचना करतो.  साधकाने दुसऱ्याकडून सहकार्याची अपेक्षा केली, तर त्या अपेक्षाने त्याचे मन एकसारखे बहिर्मुख होते.  परिणामतः मनात रागद्वेष निर्माण होतात.  तसेच लोकांनी कितीही मदत अथवा प्रेम केले तरी त्याने मन संतुष्ट होत नाही.  सतत अपेक्षा वाढतच रहाते.  दुसऱ्यांकडून सदैव अपेक्षा करणारे मन नेहमी असंतुष्टच रहाते.  (Demanding mind is always dissatisfied mind.)  

तसेच लोकांनी प्रेम केले नाही तर त्यातून क्रोध व नैराश्य येते.  वैफल्याची व एकाकीपणाची भावना मनात दृढ होते.  असुरक्षिततेच्या भावनेमुळे आत्मविश्वास नाहीसा होतो.  लोकांकडून प्रेम व मदतीची अपेक्षा करताना आपण स्वतः लोकांना काय व किती दिले ? याचा विचार साधकाने प्रथम करावा.  

नद्या सदैव परोपकारार्थ वाहतात.  वृक्षांना रसाळ व मधुर फळे येतात.  ती फळे ते दुसऱ्यांना देतात. स्वतःच्या खाण्यासाठी ते कधीच फळांचा उपयोग करीत नाहीत.  गायी सुद्धा अमृततुल्य दुधाने सर्वांचे पोषण करतात.  संपूर्ण निसर्गातच ही निस्वार्थ बुद्धि दिसते.  साधुवृत्ति आढळते.  स्वतःसाठी न जगता साधु परोपकारासाठी जगतो.  त्याची त्यागाची वृत्ति हा त्याचा स्वभाव असतो.  साधुवृत्ति साधकाने अंगी बाणवावी.  

सर्वांच्यावर जीवनभर शुद्ध, निरतिशय प्रेम करत राहावे.  साधकाचा याने होणारा मोठा फायदा म्हणजे या निरतिशय, शुद्ध प्रेम करण्याने त्याचे स्वतःचे सर्व रागद्वेष नाहीसे होतात.  प्रेमाचा भावच इतका अत्युत्कट आहे, की त्यात स्वतःचे सगळे राग-द्वेष व अहंकार विरघळून जातात.  वृत्ति आपोआप शुद्ध होते.  प्रेमाच्या शुद्ध वृत्तीत अत्यानंद असतो.  Love is bliss because it is free from likes and dislikes.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ –




Friday, April 24, 2015

पूजा आणि अनुराग | Worship with Love


पूजा हे एक कर्म आहे.  ते ईश्वराभिमुख आहे.  यामध्ये सगुण ईश्वराची पूजा केली जाते.  ही पूजा मूर्तीची असेल, किंवा प्रतिमेची असेल, किंवा प्रतीकाची सुद्धा असेल.  कदाचित प्राणप्रतिष्ठा करूनही केलेली असेल किंवा यज्ञयागादि रूपाने केलेली असेल.  विग्रहरूपाने असेल.  यात आवाहन, आसन, अर्घ्य, स्नान, उटी-चंदन आणि पंचामृतादि अशी विधिपूर्वक पूजा करून विग्रहाची स्थापना केली जाते.

त्यानंतर विग्रहाला वस्त्र-उपवस्त्र, यज्ञोपवित्, गंध, चंदन, अक्षता, दूर्वा, बेल, तुलसीपत्र, सुगंधी फुले, आभूषण अर्पण करून धूप, दीप, नैवेद्य दिला जातो.  त्यानंतर आरती, तांबूल देऊन स्तवन केले जाते.  कोणी कथेमधून स्तवन करेल, तर कोणी कीर्तनगायनामधून, कोणी नृत्य करून, तर कोणी जपध्यानामधून करेल.  अशा अनेक क्रियांच्यामधून ईश्वराला प्रसन्न केले जाते.

पूजा हे एक कर्म आहे परंतु केवळ कर्म करणे म्हणजे भक्ति नव्हे.  रोजच्या अनेक कर्मांच्यापैकी पूजा हे एक रोजचे कर्म होईल.  ते यंत्रवत् होईल.  म्हणून केवळ पूजा हे कर्म भक्तीच्या दृढ निश्चयाचे लक्षण होणार नाही.  यासाठी पूजादि कार्यात अनुराग असणे आवश्यक आहे.

‘अनुराग’ – ‘अनु’ या उपसर्गामध्ये पाठीमागून जाणे हा अर्थ अभिप्रेत आहे.  ‘सुखानुशयी रागः’ ज्याचे स्मरण केल्याने सुख मिळते त्याला ‘राग’ म्हणतात.  अनुराग म्हणजे प्रेम, प्रीति.  हा अनुराग विषयांमध्ये नसून तो पूजादि कर्मामध्ये आहे, कारण पूजादि कर्म शारीरिक असेल तरी ते अन्य कर्माप्रमाणे विषयाभिमुख करणारे नसून ईश्वराभिमुख करणारे आहे.  ईश्वरावर केंद्रीभूत आहे.  म्हणून पूजादि कर्मामध्ये अनुराग किंवा प्रीति निर्माण होणे यालाच भगवान व्यास भक्ति दृढ झाल्याचे लक्षण सांगतात.

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006




- हरी ॐ –

Friday, April 3, 2015

आमचे प्रेम गौण का आहे ? | Why Is Our Love Inferior?


प्रेमाचा उत्कट भाव सर्वांच्या हृदयामध्ये अनुभवण्यास का येत नाही ?  जो भाव मनुष्याला शुद्ध करतो, ईश्वरचरणांवर समर्पण करावयास लावतो, मनुष्याला ईश्वराभिमुख बनवितो, नव्हे ईश्वरस्वरूप बनवून जीवन तृप्त करतो, कृतकृत्य करतो, तो भाव आमच्यात का बरे उदयाला येत नाही ?  याचे उत्तर नारदमहर्षि पुढील सूत्रात देतात –

प्रकाशते क्वापि पात्रे |
एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये (ते प्रेम) प्रकाशित होते.

हे अनिर्वचनीय प्रेम एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये प्रकाशित होते.  याचाच अर्थ हे परमप्रेम सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नाही.  अनुभवण्यास येत नाही, कारण आम्ही जे प्रेम करतो ते व्यावहारिक प्रेम आहे.  मोहयुक्त प्रेम आहे.  येथे शंका निर्माण होईल की, आमचे प्रेम इतके कामुक का आहे ?  जसा आमच्या प्रेमाचा विषय असतो तसे आमचे प्रेम होते. आमच्या प्रेमाचा विषयच अशुद्ध, जड स्वरूपाचा आहे.  मग ते विषय असोत, लोक असोत, नातेवाईक असोत अगर स्थावर-जंगमादि मालमत्ता असो.  हे सर्व प्रेमाचे अशुद्ध विषय आहेत.  ते प्रेम विकार, वासनांनी ओतप्रोत भरलेले असून उपभोगण्यास प्रवृत्त करणारेच आहे. तेथे परमप्रेम उत्पन्न होणार नाही.

जर प्रेम तात्पुरते, तात्कालिक असेल, काळाच्या ओघात कमी कमी होत असेल, तसेच प्रेमाचा विषय सतत बदलत असेल तर ते प्रेम नाहीच.  ती फक्त कामुकता आहे.  ते अशुद्ध, राग-द्वेषांनी युक्त असलेले प्रेम आहे.  मग शुद्ध, परमप्रेम हवे असेल तर निश्चितपणे प्रेमाचा विषयही तितकाच शुद्ध, पवित्र, मंगलमय हवा.  तो जड, प्राकृत नसून चिन्मय, चैतन्यस्वरूप, अप्राकृत असला पाहिजे.  याप्रमाणे विषय जर शुद्ध असेल तर प्रेम शुद्ध असेल आणि असे शुद्ध प्रेम शुद्ध हृदयामध्येच निर्माण होईल.  हे शुद्ध हृदय अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे.


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006




- हरी ॐ –

Tuesday, December 2, 2014

कामना आणि प्रेम | Desire and Love




व्यावहारिक प्रेम कामनायुक्त – कामुक असते.  ते अनेक विषयांच्यावर असू शकते – धन, सत्ता, पुत्र, पौत्र, पत्नी, घर वगैरे.  वैषयिक प्रेमामध्ये प्रिय विषय उपभोगण्याची इच्छा असते.  परंतु पुन्हा पुन्हा उपभोगाने कालांतराने त्या अतिप्रिय वस्तूचे किंवा व्यक्तीचे आकर्षण कमी होते, उत्कटता कमी होते.  मग तेच प्रेम आनंदवर्धक – सुखदायक न होता दुःखालाच कारण होते.  त्यामुळे ती व्यक्ति किंवा तो विषय दूर ठेवण्याची – टाळण्याची धडपड सुरु होते.

विषय उपभोगाने इंद्रियांची शक्ति क्षीण होत जाते.  शरीर व्याधिग्रस्त होते.  हे सत्य असूनही ‘काम’ मनुष्याला स्वस्थ बसू न देता, तृप्त होऊ न देता विषयांच्यामध्ये फसवून सुख देण्याचा भ्रम निर्माण करते.  परंतु शेवटी आनंदाची उर्मी कमी होऊन विषाप्रमाणे मनुष्याला दुःखाचे घोट गिळावे लागतात.

परिपूर्ण, आनंदघन भगवंताच्या प्रेमामध्ये – भक्तीमध्ये कामना नाहीत.  उलट परमप्रेमरूप भक्तीच्या सामर्थ्याने त्या दग्ध होतात, गळून पडतात.  कामुक प्रेमामध्ये मनुष्य हा नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो.  प्रेम करतो.  परंतु परमेश्वरावरील प्रेमात स्वार्थाचा, कामनेचा लेशमात्रही गंध नसतो.  असते ती फक्त अनन्य भक्ति, अत्यंत निष्ठा आणि निःसीम निःस्वार्थी प्रेम !  परमप्रिय प्रियोत्तमाला अत्यंत सुखी, संतुष्ट करावे हीच एक तळमळ, अंतरिक तीव्र इच्छा असते.

त्या परमेश्वराच्या आनंदासाठी भक्त काया-वाचा-मनासा नितांत श्रद्धेने, प्रेमाने निरंतर सेवा करतो.  सेवेमध्ये तो स्वतःला अर्पण करतो.  तो स्वतःला विसरून जातो.  तो आणि परमेश्वर यातील भेद नाहीसा होऊन अद्वैताचे दिव्य संगीत सुरु होते.  तो तृप्त होतो.  अंतःकरण शुद्ध, निर्मळ होते.  राग-द्वेष, कामक्रोधादि विकारांचा पगडा कमी होऊन नीरव शांति अनुभवास येते.  जितक्या प्रमाणात अधिक प्रेम केले जाते त्यापेक्षा अनंत पटीने आनंद मिळतो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –