Showing posts with label Narad Bhaktisutra. Show all posts
Showing posts with label Narad Bhaktisutra. Show all posts

Tuesday, August 11, 2026

एकांतवासाचे फायदे | Benefits Of Solitude

 




एकान्तवास कशासाठी करावा ?  त्याचे अनेक फायदे आहेत.

१) आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बाह्य विषयांचे आकर्षण मनाला सतत भुरळ पाडत असते.  विषय अत्यंत मोहक असल्यामुळे नकळत आपण त्यांना बळी पडत असतो आणि त्याबरोबर वाहात राहातो.  विषयसंगामुळे आपल्या मनात सतत अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, आशा-आकांक्षा निर्माण होतात आणि त्यातुनच कामादि विकार निर्माण होतात.  आपण कितीही चांगले असलो तरी लोकांच्या सान्निध्याने कपटीपणा, द्वेष, मत्सर, कटुता वगैरे आपण शिकतो.  त्यांच्या सवयी आपण उचलतो.  म्हणून काही काळ का होईना प्रत्येकाने सर्व विषयांचा आणि जनसंपर्काचा त्याग करून एकान्तवास करावा.

 

२) जीवन जगत असताना अनेक संकटे, दुःखाचे प्रसंग सतत येत असतात.  हे प्रसंग का येतात ?  याचे कारण शोधताना आपण सर्व दुःखांचे मूळ कारण बाहेर शोधत असतो - मग ते प्रसंगामध्ये, विषयामध्ये किंवा व्यक्तीमध्ये असो.  एकान्तवासात मनुष्य एकटा असतो.  सर्व जनसंपर्क आणि प्रसंगांच्यापासून काही प्रमाणात दूर राहातो.  काही प्रमाणात का होईना तो आत्मपरीक्षण करतो.  अंतर्मुख होण्याची त्याला संधी मिळते.  सर्व दुःखांचे कारण आपल्या मनातच आहे हे एकान्तवासामध्येच समजते.  जर बदल करावयाचा असेल तर आपल्याला आपले मन कसे आहे ?  त्यात काय दोष आहेत ?  आपण कोठे आहोत ?  हे स्पष्टपणे समजले पाहिजे आणि दोष समजण्याची संधी फक्त एकान्तवासातच मिळते.  दोष समजल्यानंतर ते काढून टाकण्याचा जो प्रयत्न करतो तोच खरा साधक आहे.

 

३) आपण आपल्या मनाला सतत कोणत्यातरी विषयात गुंतवीत असतो, कारण थोडे शरीराने शांत बसले की मन उफाळून येते.  ते आपण सहन करू शकत नाही.  या मनाला सामोरे जाणे अत्यंत कठीण जाते.  जो स्वतःच्या मनाला सामोरे जातो तोच विश्वाला, जीवनातील सर्व प्रसंगांना अत्यंत सहजपणे सामोरे जाऊ शकतो.  हे अंतरिक सामर्थ्य येण्यासाठी एकान्तवासाची जरूरी आहे.  एकान्तवासात मनाला बाहेर कोठेही गुंतविता येत नाही.  तसेच विषयांचा, लोकांचा संपर्क नसल्यामुळे मनाने मनाला सामोरे गेले पाहिजे.  या अभ्यासाने मनाची अंतरिक शक्ति वाढते.  मन अंतर्मुख होते.  असे मन ईश्वरचिंतनामध्ये एकाग्र करता येते.  हे चिंतन, उपासना एकान्तवासामध्येच होते.  म्हणून एकान्तवास साधनेला पूरक आणि पोषक आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –


Tuesday, May 19, 2026

काम-क्रोधादींपासून रक्षण | Defence Against Desire & Rage

 




मनुष्य म्हणतो की, विश्व बघण्यासाठी आहे. मग काहीही पाहिले तर त्यात काय पाप आहे ?  डोळ्यावर पट्टी बांधून फिरावयाचे का ?  बघावयास लागला की मनामध्ये विचार येतो की, "समोर आलेल्या व्यक्तीबरोबर दोन शब्द बोलण्यामध्ये काय दोष आहे ?"  कोणी भेटले तर दोन गोष्टी बोलणे हा शिष्टाचार आहे.  मन आणखी पुढे जाते आणि म्हणते त्यांच्याशी संबंध ठेवला म्हणून काय झाले ?  लोकांशी संबंध ठेवावयाचा नाही तर कोणाशी ठेवावयाचा ?  याप्रमाणे अनर्थ फुलत जातो आणि मनुष्याचे अधःपतन होते.  आपणच आपले मन क्षुब्ध, संतप्त, विक्षेपयुक्त करतो आणि मनाची शांति, स्थिरता, शुद्धता, संयमन नाहीसे करतो.  हे नाना तऱ्हेचे विचार, पूजा, जप, उपासना वगैरे साधना करताना आपला पिच्छा सोडत नाहीत.  नव्हे, मंत्रजपाच्या वृत्तीच्या ऐवजी अन्य सर्व विचार येत राहातात. हा फार मोठा प्रतिबंध आहे.  म्हणून साधकाने, भक्ताने अधिक सावधान, दक्ष राहिले पाहिजे की ज्यामुळे मनामध्ये पाप संकल्पाचा तरंगच उठणार नाही.

 

दद्यान्नावसरं किञ्चित् कामादीनाम् मनागपि |  कामक्रोधादींना कधीही मनामध्ये येण्याचा यत्किंचित् सुद्धा अवसर देता कामा नये.  इतकी सावधानता, दक्षता मनात सतत ठेवली पाहिजे.  म्हणून तर यमराज सर्व साधकांना आदेश देतात - अप्रमत्तः भव |  म्हणजेच - प्रमादं न कुर्यात् |  साधना करीत असताना साधकाने कोणत्याही प्रकारचा प्रमाद, निष्काळजीपणा, चालढकलपणा करू नये.  अत्यंत दक्ष आणि सावधान राहून मनातील सर्व वृत्तींचे निरीक्षण केले पाहिजे आणि पुसटसा सुद्धा विषयाचा संकल्प आणू देता कामा नये.  आला तर तेथेच काढून टाकण्याचा अभ्यास करावा.

 

आज आमची स्थिति अशी आहे की, आमच्या मनात काय विचार येतात, ते कोणत्या विषयाचे आहेत याची बिलकुल जाणीव नाही.  मन स्वैर, भरकटलेले, कल्पनाविलासामध्ये रमणारे आहे.  यामुळे आपण काय विचार करतो, काय बोलतो, कोठे बोलतो, कोणाला बोलतो याचा परिणाम काय होईल, काय करतो याची यत्किंचित् सुद्धा जाणीव नाही.  सुकाणु किंवा शीड नसलेल्या बोटीप्रमाणे मन मानेल तसे दिशाहीन, स्वैर, अनियंत्रित, उच्छ्रंखल जीवन आहे.  म्हणून येथे म्हटले आहे की कामादि संकल्पांना थोडीही अजाणतेने संधि देता कामा नये.  उलट साधकाने अत्यंत दक्ष राहून मनातील प्रत्येक वृत्तीचे निरीक्षण करावे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –



Tuesday, February 24, 2026

विनाशाचा क्रम | Sequence Of Self-Destruction

 




आपले मन साधुसंगतीमध्ये, ईश्वरामध्ये रमत नसेल, चिंतन करीत नसेल तर ते साहजिकच जड विषयांच्यामध्ये, अनात्म्यामध्ये रमेल.  विषयांचेच चिंतन करील. (ध्यायतो विषयान्स्पुंसः)  त्या चिंतनामुळे हळूहळू विषयांचे आकर्षण निर्माण होऊन विषयांचे प्रेम निर्माण होते.  आसक्ति निर्माण होते. मग विषय समोर असो किंवा नसो विषयांचेच विचार मनामध्ये रात्रंदिवस घोळत राहातात. त्यातच मनाला सुख वाटते.  बरे वाटते.  (संगस्तेपूषजायते)  यामधून प्रिय विषय हवाहवासा वाटतो आणि आपोआपच तो आपल्याजवळ असावा असे वाटते.  तो प्राप्त करण्याची कामेच्छा निर्माण होते.  याचाच परिणाम म्हणजे विषयध्यास लागतो.  तो मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करावयास लागतो.

 

(संगात्संजायते कामः)  परंतु अनेक वेळेला प्रयत्न करूनही कामेच्छा पूर्ण होईलच असे नाही.  उलट प्रयत्नामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात.  प्रतिबंध येतात.  यामुळे तोच काम, क्रोधाची भावना निर्माण करतो.  (कामात्क्रोधोSभिजायते)  क्रोधाची भावना अनावर झाली की, विवेक नाहीसा होतो.  बुद्धीला संमोह-संभ्रम निर्माण होतो.  त्यामुळे योग्य काय, अयोग्य काय याचा सारासार विवेक संपतो.  मनावरचे संयमन, मनाचे संयमन सुटते.  मन आणि बुद्धि भ्रमिष्ट होते.  (क्रोधात्भवति संमोहः)  क्रोधाविष्ट झालेल्या मनामध्ये मूढत्वामुळे स्मृतीचा ऱ्हास होतो.  म्हणजेच कोणत्याही प्रसंगामध्ये योग्य-अयोग्य, चांगले-वाईट परिणाम मनुष्य विसरतो.  (संमोहास्मृतिविभ्रमः)

 

खरे पाहाता आपल्याकडून अपेक्षित कर्म कोणते, कसे वागावे, बोलावे, कसे योग्य आचरण ठेवावे यासाठी आपल्यावर आई-वडील आणि आचार्य सतत संस्कार करीत असतात.  अनेक शास्त्रांचे अध्ययन, धर्मशास्त्र, वेदान्तशास्त्राचे अध्ययन आणि त्यामधून मिळालेल्या ज्ञानाचे प्रयोजन सुसंस्कृत, सद्विचारी, सदाचारी मनुष्य व्हावा हेच आहे.  हेच संस्कारयुक्त ज्ञान स्मृतिरूपाने प्रत्येक प्रसंगामध्ये योग्य ते कर्म करावयास प्रवृत्त करीत असते.  परंतु ही स्मृतिच जर अनावर क्रोधाने गिळंकृत केली तर ज्ञानसंपन्न असूनही मनुष्याचा तोल जाईल आणि जे करू नये ते तो करेल, जे बोलू नये ते तो बोलेल, जे खाऊ नये ते तो खाईल.  तो पशुतुल्य होईल.  हाच मनुष्याचा नाश आहे.  (स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति)  कारण तो मनुष्यत्व टाकून अत्यंत हिंस्र पशूप्रमाणे झालेला आहे.

 


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ –



Tuesday, December 2, 2025

दुःसंगाचा त्याग का करावा ? | Why Give Up Inferior Company ?

 



दुःसंग कोणता ?  साधुसंतांच्या संगापासून दूर नेणारा, आपल्या श्रद्धा, भक्तीचे खंडन करणारा, त्याचा उपहास करणारा, मन अधिक विषयाभिमुख करून उपभोगण्याची लालसा वाढविणारा, विषयसेवनामध्ये प्रवृत्त करणारा, मन अशुद्ध, कलुषित, विकारी करून क्षुब्ध करणारा, सद्गुणांचा किंवा दैवीगुणसंपत्तीचा ऱ्हास करणारा, मनाचे संयमन किंवा संतुलन तोडणारा, सत्कर्मामधून परावृत्त करून असत्कर्मामध्ये, पापाचरणामध्ये प्रवृत्त करणारा कोणताही संग हा दुःसंग आहे.  मग तो व्यक्तीचा संग असेल किंवा विषय, प्रसंग वगैरेंचा संग असेल.  त्या सर्वांचा प्रयत्नपूर्वक विवेकाने मनाचा तोल ठेऊन त्याग करावा.  जो शास्त्रविधीचा त्याग करून स्वकामनेने प्रेरित होऊन त्यानुसार आचरण करतो त्याला आत्मसिद्धि मिळत नाही, सुखही मिळत नाही.  इतकेच नव्हे तर उत्तम गति सुद्धा मिळत नाही.

 

दुःसंगाचा त्याग का करावा ?  परमेश्वर अभिमानाचा द्वेष करणारा आहे.  तसेच त्याचे प्रेम, भक्ति कामनारहित आहे.  त्यामुळे ईश्वरभक्ति आणि अहंकार, विषयकामना परस्परविरुद्ध आहेत.  म्हणून परमेश्वर हाच माझा प्रियतम असेल तर माझे कर्तव्य काय आहे ?  जे जे परमेश्वराला प्रिय आहे तेच करणे योग्य आहे.  आपल्या हातून असे कर्म व्हावे की ते ईश्वराभिमुख असेल ज्यामुळे तो संतुष्ट होईल, प्रसन्न होईल, आपल्यावर त्याची सतत कृपा राहील.  आणि जे ईश्वराला अप्रिय असेल ते कर्म आपल्याकडून घडू नये.  याचाच अर्थ प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणे, त्याच्यासाठी करणे हेच प्रेमाचे लक्षण आहे.

 

जे कर्म माझ्याकडून अपेक्षित आहे, योग्य आहे, ईश्वरस्वरूपाकडे नेणारे आहे ज्यामुळे मन शुद्ध, अंतर्मुख होईल असे कार्य करावे.  त्याव्यतिरिक्त सर्व कर्मांचा, संगाचा त्याग करावा.  याचे कारण, विषयावर प्रेम आणि ईश्वरावर प्रेम दोन्ही शक्य नाही.  एकावरच प्रेम केले पाहिजे.  प्रियतम एकच हवा तरच मनाची स्थिरता, एकाग्रता शक्य आहे.  यासाठी विषयांचा संग, प्राकृत बुद्धीच्या लोकांचा संग, अहंकारी, उन्मत्त, आसुरी गुणयुक्त लोकांचा संग, नास्तिक पाखंडी लोकांचा संग, उपभोगात रमणाऱ्या लोकांचा संग यांचा सर्वथा त्याग करावा.  त्याशिवाय आपले मन विषयांच्यापासून निवृत्त होणार नाही.  ईश्वराभिमुख होणार नाही.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, September 9, 2025

साधकाचा पुरुषार्थ | Prime Effort Of A Seeker

 



मुमुक्षूने, साधकाने कोणता पुरुषार्थ करावा ?  देवर्षि नारद सांगतात माहात्म्यांचा सत्संग करावा आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी साधकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा.  नव्हे, सर्व साधना करावी.  म्हणून शास्त्रामध्ये जी साधने सांगितलेली आहेत - पूजा, अर्चना, व्रत, वैकल्य, उपवास, उपासना, यज्ञ, याग, भजन, कीर्तन वगैरेदि सर्व निःस्वार्थपणे सातत्याने करावीत.  त्या सर्वांचा परिपाक म्हणजे महात्माप्राप्ति होय.  हेच सर्व साधनेचे फळ आहे.  महात्मा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ईश्वरपूजा, सेवा, ईश्वरउपासना, श्रद्धेने आणि निष्ठेने अखंड नियमित करावी, त्याचे फळ म्हणजे आपले मन हळूहळू शुद्ध होते.  अंतर्मुख होते आणि योग्य वेळी आपल्या आयुष्यात महात्मा येतो.  नव्हे महात्मा आहे हे आपल्याला समजते.

 

शास्त्रकार म्हणतात आपण महात्म्याला शोधावयास जाण्याची गरज नाही तर महात्मा आपोआप जीवनात येतो.  त्यासाठी ततपूर्वी आपली योग्य तयारी असली पाहिजे नाहीतर तो आला तरी समजण्याची पात्रता असणार नाही.  म्हणून जेव्हा तयारी होते तेव्हा महात्मा भेटतो.  हृदयाला हृदय भिडते.  शिष्याला गुरु आणि गुरूंना शिष्य भेटतो.  त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की, "हे परमेश्वरा !  मला सद्बुद्धि दे.  मला ऐश्वर्य नको, स्वर्ग नको, काहीही नको.  फक्त महात्म्यांचा सत्संग होऊ दे.  माझ्याकडून त्यांची सेवा घडू दे.  माझी श्रद्धा, निष्ठा, भक्ति त्यांच्यामध्ये राहू दे.  त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींचा मला विसर पडू दे.  माझे लक्ष त्यांच्यातच राहू दे.  त्यांनी दिलेला उपदेश माझ्या मनावर ठासून आत्मसात होऊ दे."

 

भगवान म्हणतात -

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ||                         (गीता अ. ४-३४)

साधूंना अनन्य भावाने शरण जावे.  त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करावे.  संतुष्ट करावे.  म्हणजेच परमेश्वरही संतुष्ट होतो.  त्यामुळे कृपा होऊन आमच्या अंतःकरणात परमेश्वराचे अनन्य प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा उदय होईल.  त्यांच्या कृपेनेच आमच्या जीवनात अंतरिक शांति, समाधान येईल.  जीवनाला पूर्णता येईल.  म्हणून साधुसंग मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत.  साधना करावी.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, June 17, 2025

सद्गुरू त्यांच्याच कृपेने भेटतात | Sadguru Meets By His Own Grace

 



कदाचित आपण स्वप्रयत्नाने महापुरुषांच्या जवळ जाऊ शकू परंतु त्यांची कृपा मिळेलच असे नाही.  याचे कारण प्रत्येकाचे प्रारब्ध !  येथे साधूजवळ आपपर भाव नाही.  कृपा सर्वांच्यावर आहे.  परंतु ज्यावेळी भाग्य फलोन्मुख होईल किंवा होण्याची वेळ येईल तेव्हाच ती कृपा मिळेल.  मग तुमची इच्छा असो वा नसो.  ते त्यांच्या सामर्थ्याने आपल्याला जवळ खेचतील.  नाहीतर कितीही प्रयत्न केला तरी मिळणार नाही.  अशा काही घटना घडतील किंवा प्रसंग येतील की आपली श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही.  साशंक वृत्ति निर्माण होईल आणि आपण शरीराने कितीही जवळ असलो तरी मनाने साधुपुरुषाच्या जवळ जाऊ शकत नाही.  ते मन त्यांच्यापासून दूर खेचेल.

 

सर्वजण जरी माहात्म्याजवळ गेले तरी प्रत्येकाची अंतरिक इच्छा, तीव्रता भिन्न-भिन्न असते, काहींचा परमार्थ आवडीचा असतो, काहींचा सवडीचा तर काहींचा नडीचा असतो.  नडीने परमार्थ करणारेच जास्त असतात.  आवडीने करणारे फारच थोडे !  म्हणून जशी ज्यांची इच्छा असते त्याप्रमाणेच त्याला फळ मिळते.  त्यामुळे साधुमध्ये भेदभाव नाही.  सर्वांचा उद्धार व्हावा हीच त्यांची इच्छा असते.  परंतु आम्ही खरोखरच त्याला अधिकारी आहोत का ?  हा प्रश्न आहे.  सर्व शिष्यांच्यामधून स्वामी विवेकानंदानाच रामकृष्णांनी साक्षात्कार दिला.  का ?  याला व्यावहारिक उत्तर नाही.  फक्त एकच त्यांची तीव्र इच्छा, अंतरिक तळमळ ही पराकोटीची होती.

 

याचाच अर्थ महात्म्यांचा फक्त शारीरिक संग किंवा जवळीक असणे म्हणजे त्यांची कृपा नाही तर जेव्हा आमच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत एकनिष्ठा, श्रद्धा, अनन्य प्रेम निर्माण होऊन तीव्र तळमळ निर्माण होईल त्यावेळी मनाने त्यांच्याशी खरा संग निर्माण होतो आणि त्यावेळीच आमच्यावर त्यांची कृपा होईल.  त्यांच्या कृपेने आम्ही संसार पार करू शकू.  म्हणून त्यांच्याच कृपेने ते प्राप्त होतात.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, March 25, 2025

परिसाचा संग | Transformational Company

 



गुरूंचा महिमा, गुरूंचे माहात्म्य, अगाध, अपार, अनाकलनीय आहे.  सर्व शास्त्र, पुराणे, आचार्य त्यांचा महिमा गातात.  सद्गुरू शरण आलेल्या शिष्याला घडवीत असतो.  ते जीवनाला निश्चित दिशा देतात.  त्यांच्याच कृपेमुळे आपण जीवनात निश्चित काय शोधत आहोत, आपले अंतिम साध्य काय आहे ते समजते.  त्यांच्याच कृपेमुळे आपल्या जीवनात आत्मविश्वास, श्रद्धा, निष्ठा, धैर्य, निःस्वार्थ सेवा, त्याग भक्ति वगैरे वृत्तींचा उत्कर्ष होतो.  आपले मन विषयांच्यापासून निवृत्त होऊन हळूहळू ईश्वराभिमुख होते.  अंतर्मुख होते.  प्रत्येक कर्मामधून ईश्वराची, गुरूंची सेवा घडते.  त्यांच्याच संगाने आमच्या मनातील राग-द्वेष, कामक्रोधादि विकार कमी होतात.  चित्त शुद्ध, निर्मळ होते.  आमच्या साधनेमध्ये सातत्य, नियमितपणा येतो.

 

सद्गुरूंच्याच कृपेमुळे जीवनात येणाऱ्या सर्व संकटांच्यामधून, अडचणींच्यामधून, आपत्तीमधून साधक पार होतो.  बाह्य प्रसंग मन विचलित करीत नाहीत.  सर्व बाह्य विषयांची, व्यवहाराची निष्फळता समजावयास लागते आणि ईश्वरविषयीचे प्रेम, ओढ वाढते.  परमेश्वराचे चिंतन अखंड होते आणि शेवटी त्यांच्याच उपदेशाने अंतरंगामध्ये असलेला अज्ञानाचा अंधार नाहीसा होऊन आत्मप्रचीति येते.  जीवनामध्ये परमोच्च आनंदाची अनुभूति येते.  जीवन पूर्ण होते.  तृप्त होते.

 

म्हणून सद्गुरुंचे सान्निध्य आणि त्यांची कृपा ही परीसापेक्षाही अधिक आहे.  परीस फक्त लोखंडाचे सोने करतो परंतु त्याला लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य देत नाही.  सद्गुरू मात्र शिष्याला स्वतःचे आत्मस्वरूप देऊन सद्गुरू बनवितात.  खरोखर त्यांची किमया अगाध आहे.  अपार आहे.  म्हणूनच सर्व संत म्हणतात.  आम्ही बी घडलो ।  तुम्ही बी घडाना ।  नारदमहर्षि म्हणतात ते त्रिवार सत्य आहे.  महत्सङ्गःस्तु दुर्लभोऽग्यम्योऽमोघश्च |

 

थोडक्यात महात्म्यांच्या संग अत्यंत दुर्लभ, अगम्य आणि अमोघ आहे.  त्यांच्या कृपेनेच परमप्रेमरूपा, अमृतस्वरूपा न कामयमाना भक्ति आपण प्राप्त करू शकतो.  म्हणून तप, यज्ञ, याग, पूजा, अर्चना करून घरादाराचा त्याग करून सुद्धा जी भक्ति आपण प्राप्त करू शकत नाही ती भक्ति गुरुकृपेमुळे, संतकृपेमुळे मिळते.  महात्म्यांच्या चरणरजांच्या अभिषेकाने, त्यामध्ये लोळल्याने, त्यांच्या पवित्र स्पर्शाने आपल्या हृदयात ईश्वराचे प्रेम उदयाला येते.  यासाठी महात्म्यांच्या संग, त्यांची कृपा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा.  बाकी काहीही करू नये, कारण भक्ति स्वतःच्या प्रयत्नाने मिळत नाही.

 


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, December 31, 2024

ईश्वराचे कृपामय स्वरूप | Generous Nature Of God

 



ईश्वराचे स्वरूप कृपामय आहे.  तो सर्व प्राणिमात्रांच्यावर कृपाच करतो.  मग तो महान असो किंवा यःकश्चित जीव असो.  तो सर्वांच्यावर सारखीच कृपा करीत असतो.  मग तो चांगला आनंदवर्धन करणारा प्रसंग असो, किंवा अनपेक्षित संकट, प्रतिकूल परिस्थिति आणि दुःख देणारा प्रसंग असो, निंदा, नालस्ती, अवहेलना असेल किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल, जीवनामध्ये उत्कर्षाचे दिवस असतील किंवा विनाशाचे असतील.  त्या सर्व प्रसंगांच्यामध्ये परमेश्वराची कृपा ही आहेच.  सूर्याचे किरण हे सर्व विश्वाला भेदभाव न करता प्रकाशमान करतात. त्या प्रकाशाचा कोण, कसा उपयोग करेल हे माहीत नाही.  एखादा विधायक काम करेल तर दुसरा विघातक काम करेल.  एखादा धर्माचे रक्षण करेल दुसरा धर्मनाशाचा विचार करेल.  त्याच प्रकाशात एखादा माणसाचे जीवन वाचवील तर दुसरा जीव घेईल.  मग हा दोष कोणाचा ?  सूर्याच्या प्रकाशाचा की मनुष्याचा ?  सूर्याचे किरण सर्वांनाच एकसारखा प्रकाश देणारे, मार्गस्थ करणारे आहेत.  त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव दिसत नाही.

 

परमेश्वराने आपल्याला काय दिले नाही ?  सर्व विश्व फक्त मनुष्याच्या तैनातीलाच निर्माण झाले आहे असे म्हटले पाहिजे.  इतकेच नव्हे, तर मनुष्याला भावना आणि विचार करण्याची बुद्धि दिलेली आहे.  विश्वामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या तीन शक्ति - ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति - मनुष्याला दिलेल्या आहेत.  यांच्या साहाय्याने नानाविध विश्वाचे निरीक्षण करून अनेक विषयांचे ज्ञान संपादन करून तो ज्ञानसमृद्ध होतो.  ऐहिक उत्कर्षासाठी संकल्पशक्तीने भविष्याच्या इच्छा निर्माण करून त्या पूर्ण करण्यासाठी असामान्य कर्तृत्वशक्ति मनुष्याला दिलेली आहे.  थोडक्यात जीवनाचा सर्वांगीण विकास करावा, विश्व आणि विषयांच्या साहाय्याने मोहक, सुंदर जीवन तयार करावे, जीवनातील ऐहिक आनंद लुटावा.

 

याच्याही पलीकडे जाऊन विश्वाच्या मागे, जीवनाच्या मागे काही तत्त्व आहे का ?  याचा बुद्धीने शोध घ्यावा.  सर्व विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तसेच अदृश्य, अव्यक्त गूढ तत्त्वाचा शोध किंवा जीवनाचे गूढ रहस्य शोधून काढण्याचे सामर्थ्य मानवाला दिलेले आहे.  त्या तत्त्वाच्या अनुभूतीने मनुष्य मन आणि मनाच्या विकारांच्यावर विजय मिळवून जीवनाची पूर्णता, कृतकृत्यता मिळवू शकेल.  थोडक्यात परमेश्वराने मनुष्याला सर्व काही दिले आहे.  ही त्याची अनंत अपार कृपा आहे.  खरे पाहाता - अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने ।  अशी स्थिति आहे.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, October 8, 2024

ईश्वर खरच निष्ठुर आहे का ? | Is God Really Unkind ?

 



ईश्वरकृपा असताना जीवनात संकटे, प्रतिबंध, आपत्ति, कष्ट, दुःख, यातना कशा काय येतात ?  ज्याठिकाणी ईश्वरकृपा असेल तेथे आनंदच असला पाहिजे.  पण हे प्रत्यक्षात दिसत नाही.  त्यामुळे शंका येते की खरोखरच परमेश्वर कृपाळु, दयाळु आहे, का निष्ठूर आहे ?  अशी शंका घ्यावयाचे कारण नाही.  ज्याप्रमाणे चांगल्या, सुखाच्या प्रसंगामध्ये ईश्वरकृपा आहे, तशीच संकटकाळी दुःखाचे वेळी सुद्धा परमेश्वरकृपा आहेच.  ती पाहाण्याची आमच्या मनात ताकद नाही.  मनाची पक्वता नाही.  आपल्या मनाची दारे बंद आहेत.  कल्पनांच्या भराऱ्यामध्ये, राग-द्वेषांच्या जाळ्यामध्ये आपणच आपल्याला बद्ध केलेले आहे.

 

जर एखादा मुलगा म्हणाला की, माझ्या आईचे प्रेम नाही, तर ते किती अव्यवहार्य, अयुक्त आहे.  अशी कोणती माता असेल की जिने नऊ मास आपल्या उदरात मुलास वाढवून आपल्या रक्तातून त्याला अन्न, पाणी पुरवून त्याचे पोषण, वर्धन केले.  असह्य यातना सहन करून त्याला जग दाखविले.  एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला ती मुलाच्याच कल्याणाचा विचार करते.  त्याची काळजी घेते.  तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपते.  अशा मुलाने जर आईचे माझ्यावर प्रेम नाही असे म्हटले तर ते योग्य आहे का ?  सुखदुःखाच्या अनेक प्रसंगात ती त्याच्या मदतीला धावून जाते.  स्वतःच्या प्रेमाने त्याला गोंजारते.  परंतु पुत्राच्या कमनशीबामुळे ते प्रेम तो बघू शकत नाही.  तिचे वात्सल्य तिच्या अंतापर्यंत कायम असते.  परंतु कल्पनेच्या विलासात रंगणाऱ्या त्या अभागी पुत्रास ते दिसत नाही.

 

एखादा डॉक्टर रोग्यावर उपचार करतो.  त्यावेळेस त्या रोग्याच्या यातना, दुःख त्याला समजतात.  रोगाची तीव्रता किती आहे हे जाणून त्याप्रमाणे तो उपचार करतो.  एखादा रोगी गळूमुळे वेदनेने तळमळत आहे.  त्याला असह्य यातना होत आहेत.  अशावेळी आपण जर म्हटले की काय डॉक्टर आहे पहा !  आधीच बिचारा असह्य वेदनेने तळमळत आहे आणि हा डॉक्टर आणखीन कापाकापी करून त्याला अधिकच यातना देत आहे.  तो डॉक्टर दुष्ट, निर्दयी, कसाई आहे.  असे म्हणणे योग्य होईल का ?  डॉक्टरची कृति बाहेरून जरी निर्दयपणाची वाटली तरीही त्याच्या मनात रोग्याविषयी निष्ठुरता नाही.  उलट त्याच्याबद्दल जिव्हाळा, प्रेमच आहे.  म्हणूनच तो रोग्याला वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न करतो.  तसेच परमेश्वरकृपा असूनही दुर्दैवाने ती आपल्याला दिसत नाही.  तो किती दयाळु-कृपाळु आहे हे बघण्यासाठी मनाचे दरवाजे उघडले पाहिजेत.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –