प्रेमाचा
उत्कट भाव सर्वांच्या हृदयामध्ये अनुभवण्यास का येत नाही ? जो भाव मनुष्याला शुद्ध करतो, ईश्वरचरणांवर
समर्पण करावयास लावतो, मनुष्याला ईश्वराभिमुख बनवितो, नव्हे ईश्वरस्वरूप बनवून
जीवन तृप्त करतो, कृतकृत्य करतो, तो भाव आमच्यात का बरे उदयाला येत नाही ? याचे उत्तर नारदमहर्षि पुढील सूत्रात देतात –
प्रकाशते क्वापि पात्रे |
एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये (ते प्रेम) प्रकाशित होते.
हे
अनिर्वचनीय प्रेम एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये प्रकाशित होते. याचाच अर्थ हे परमप्रेम सर्वांच्या
अंतःकरणामध्ये प्रकट होत नाही. अनुभवण्यास
येत नाही, कारण आम्ही जे प्रेम करतो ते व्यावहारिक प्रेम आहे. मोहयुक्त प्रेम आहे. येथे शंका निर्माण होईल की, आमचे प्रेम इतके
कामुक का आहे ? जसा आमच्या प्रेमाचा
विषय असतो तसे आमचे प्रेम होते. आमच्या प्रेमाचा विषयच अशुद्ध, जड स्वरूपाचा आहे.
मग ते विषय असोत, लोक असोत, नातेवाईक असोत
अगर स्थावर-जंगमादि मालमत्ता असो. हे सर्व
प्रेमाचे अशुद्ध विषय आहेत. ते प्रेम
विकार, वासनांनी ओतप्रोत भरलेले असून उपभोगण्यास प्रवृत्त करणारेच आहे. तेथे
परमप्रेम उत्पन्न होणार नाही.
जर
प्रेम तात्पुरते, तात्कालिक असेल, काळाच्या ओघात कमी कमी होत असेल, तसेच प्रेमाचा
विषय सतत बदलत असेल तर ते प्रेम नाहीच. ती फक्त कामुकता आहे. ते अशुद्ध, राग-द्वेषांनी युक्त असलेले प्रेम
आहे. मग शुद्ध, परमप्रेम हवे असेल
तर निश्चितपणे प्रेमाचा विषयही तितकाच शुद्ध, पवित्र, मंगलमय हवा. तो जड, प्राकृत नसून चिन्मय, चैतन्यस्वरूप,
अप्राकृत असला पाहिजे. याप्रमाणे विषय
जर शुद्ध असेल तर प्रेम शुद्ध असेल आणि असे शुद्ध प्रेम शुद्ध हृदयामध्येच निर्माण
होईल. हे शुद्ध हृदय अत्यंत
दुर्मिळ आणि दुर्लभ आहे.
- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,
एप्रिल २००६
- Reference: "Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- Reference: "Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment