शास्त्रकार
सुंदर दृष्टांत देतात. आपल्या शरीरामध्ये
अनेक अवयव आहेत. सर्व अवयवांच्यावर आपण
सारखेच प्रेम करतो. एका हाताला लागले
तर दुसरा हात त्यावरून हळुवारपणे फिरविला जातो. तेथे आपण कोणताच भेद करीत नाही. नव्हे, आपल्या मनामध्ये भेदाची कल्पनादेखील
निर्माण होत नाही.
याप्रमाणेच
साधकाने सर्व जीवांना समदृष्टीने पाहावे. सर्वांच्यावर
शुद्ध प्रेम करावे. वास्तविक प्रेम
करता येत नाही. प्रेम दाखविताही येत नाही.
तर “प्रेम” हा मनुष्याचा स्वभाव झाला
पाहिजे. या विश्वामध्ये प्रेमाइतकी
कोणतीही पवित्र, सुंदर, शुद्ध गोष्ट नाही. प्रत्येक जीव प्रेमाचा भुकेला असतो. प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी जीवनभर मनुष्य
आसुसलेला असतो. हे शुद्ध प्रेम फक्त साधु
पुरुषच करू शकतो.
आजपर्यंत
सर्व समाजावर साधूंनी, संतांनीच शुद्ध प्रेम केलेले आहे. आपल्या प्रेमळ शब्दांच्या हळुवार स्पर्शाने लाखो
जीवांची आसवे पुसलेली आहेत. त्यांना या
दुःखसागरामधून बाहेर काढलेले आहे. याचे
कारण साधु पुरुषाच्या मनामधून राग, द्वेष, कामुकता, स्वार्थ या सर्व वृत्ति
गळून पडलेल्या असतात. तोच निःस्वार्थ,
निष्काम प्रेम करतो. म्हणून साधूंच्या
सहवासात शुद्ध आनंदाची प्राप्ति होते. त्यांच्या
प्रेमवृक्षाच्या छायेमध्ये सर्व दुःखी-कष्टी जीव आनंदी, प्रसन्न होतात.
यासाठीच
साधकाने अहंकार-ममकार, राग-द्वेष यांचा त्याग करून हिंसात्मक वृत्तीच्या
विरुद्ध असणारी प्रतिपक्षभावना म्हणजेच “प्रेमवृत्ति” आत्मसात केली पाहिजे. म्हणजे आपोआपच “अहिंसावृत्ति” आत्मसात होईल. या शुद्ध, शांत मनामध्येच ज्ञानाचा उदय होईल. म्हणून “अहिंसा” हा स्वभाव झाला पाहिजे.
- "दिव्यत्वाचा
मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment