Tuesday, June 21, 2022

ज्ञानयुक्त प्रेम | Knowledge Based Affection

 गोपींना ज्ञान झाले होते का ?  कारण गोपींनी फक्त श्रीकृष्णावर एकनिष्ठ प्रेम केले.  त्या संपूर्ण समर्पण झाल्या होत्या.  प्रेमाने त्या धुंद, वेड्या झालेल्या होत्या.  त्यांना स्वतःची नव्हे घरादाराची सुद्धा शुद्ध नव्हती.  परंतु हा प्रश्न भक्तीमध्ये निर्माण होत नाही.  प्रेमात ज्ञान हे गृहीत आहे.

 

व्यवहारात आपण पाहतो की, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीची प्रथम ओळख होते आणि नंतर हळूहळू त्याच्या गुणांची, ज्ञानाची प्रगल्भता कळते तसे त्याच्यावरचे प्रेम वाढू लागते.  म्हणजेच प्रेम आणि ज्ञान भिन्न नसून परस्पर आश्रित आहे.  श्रद्धा आणि प्रेमाशिवाय ज्ञान असेल तर ते अहंकार, दंभ, दर्प, उद्धटपणा वगैरे निर्माण करेल आणि ज्ञानाशिवाय प्रेम असेल तर ती फक्त उचंबळून येणारी भावना राहील.  त्यात फक्त शारीरिक आकर्षणाचा भाग अधिक असेल.  त्या प्रेमामध्ये कामुकता निर्माण होऊन उपभोगण्याची वासना निर्माण होईल.  प्रेमाचा उत्कर्ष होण्याऐवजी प्रेम हळूहळू कमी होईल.  तसेच प्रेम आनंदवर्धक होण्याऐवजी दुःखवर्धन करण्यास कारण ठरेल.

 

व्यवहारात आपण मंदिर दिसले की मूर्तीला बघून नमस्कार करतो.  भक्त तो केवळ दगड पाहात नाही तर त्याठिकाणी ईश्वरत्व पाहातो.  म्हणूनच त्याची श्रद्धा, भावना त्या पिंडाशी निगडित झालेल्या असतात.  त्यामुळे डोळ्यांना जरी तो दगड दिसत असला तरी अंतःचक्षूंना परमेश्वराचे सगुण, साकार रूप दिसते.  याचाच अर्थ त्याला माहात्म्यज्ञान आहे.  हे माहात्म्य, दिव्यता, भव्यता डोळ्यांना दिसत नाही तर मनाला प्रचीतीला येते.

 

याप्रमाणे गोपींना सुद्धा माहात्म्यज्ञान होते.  म्हणूनच त्यांचे प्रेम कामनारहित, शुद्ध प्रेम होते.  त्यांच्यात अहंकार, दंभ, दर्प वगैरेचा लेशमात्रही दोष नव्हता.  त्या अनन्यभावाने परमेश्वराला समर्पण झालेल्या होत्या.  त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अध्यात्मज्ञानाचा उपदेश दिला होता.  गोपींच्या अनुभूतीमध्ये अद्वैताचे, एकत्वाचे ज्ञान होते.  त्यांची भक्ति परमप्रेमस्वरूपाची, अमृतस्वरूपाची होती.  यामुळेच त्यांचे जीवन पूर्ण, तृप्त झाले होते.  कृतकृत्य झाले होते.  अनन्य भक्तीने त्या मुक्त झालेल्या होत्या.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006- हरी ॐ