Showing posts with label Attitude. Show all posts
Showing posts with label Attitude. Show all posts

Saturday, October 28, 2017

सुंदर दृष्टि | Beautiful Vision




भगवान एक सुंदर दृष्टि सांगतात –
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते | प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ||  (गीता अ. २-६५)
चित्ताच्या प्रसन्नतेमुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा निरास होतो आणि प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धि लवकरच उत्तम प्रकारे स्थिर होते.  साधकाने जीवनामध्ये एका बाजूला आपले प्रत्येक कर्म सेवावृत्तीने ईश्वरार्पण करावे व दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या कर्माचे चांगले-वाईट, कमी-जास्त, अपेक्षित-अनपेक्षित फळ प्राप्त होईल तेव्हा ते फळ परमेश्वराचाच प्रसाद आहे, या वृत्तीने समाधानाने ग्रहण करावे.

ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जाऊन देवाला फळे, फुले, पेढे, पाणी अर्पण करतो.  मनोभावे प्रदक्षिणा घालतो व त्यानंतर पुजारी आपल्या हातामध्ये काहीतरी प्रसाद ठेवतो.  त्यामध्ये मग आपणच आणलेला पेढा असेल, खडीसाखर असेल किंवा पाणी असेल.  वस्तुतः बाजारातील खडीसाखर व आत्ता हातामध्ये आलेली खडीसाखर यात काही फरक झालेला नाही.  किंवा पाण्यामध्येही फरक झालेला नाही.  पाण्यामध्येही H2O आहे व तीर्थाचे पाणी सुद्धा H2O आहे.  मग फरक कुठे आहे ?  फरक बाहेर पदार्थामध्ये नाही.  तर फरक आपल्या मनामध्ये झालेला आहे.  तीच खडीसाखर, पेढा, पाणी किंवा वस्तु जेव्हा देवाला स्पर्श करून आपणास मिळते, तेव्हा आपण ती वस्तु न पाहता त्यामध्ये “प्रसाद” पाहतो.  

इतकेच नव्हे, तर त्यावेळी आपण आपल्याला काय प्रसाद मिळाला ?  किती मिळाला ?  हे न पाहता उलट आपल्याला प्रसाद मिळाला, आपण भाग्यवान आहोत, असे मानून जे काही असेल ते आनंदाने व प्रसन्न मनाने ग्रहण करतो.  स्वीकार करतो.  त्यामुळे तिथे मनामधील रागद्वेषादि प्रतिक्रिया संपतात.  आवडनावड संपते.  हेवेदावे, मत्सर, कपट, असूया, स्वार्थ, लोभ, अभिमान हे सर्वच दोष नाहीसे होतात.  सर्व प्रतिक्रिया संपतात.  मन रागद्वेषरहित, द्वंद्वरहित झाल्यामुळे शुद्ध, सत्वगुणप्रधान व प्रसन्न होते.  हेच प्रसादवृत्तीचे फळ आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ –

Tuesday, October 24, 2017

सेवा हा भाव आहे | Service is an Attitude


“सेवा” हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो.  सेवा ही मनापासून म्हणजेच प्रसन्न मनाने केली जाते.  सेवा करावयाची असेल तर प्रथम, ज्याची मी सेवा करतोय त्याविषयी मनामध्ये नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असला पाहिजे.  त्याशिवाय मी सेवा करूच शकत नाही.  त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक झाले पाहिजे.  तिथेच माझे व्यक्तिगत रागद्वेष, आवड-नावड, हेवे-दावे गळून पडतात.  माझ्यामधील अहंकार, अभिमानाची वृत्ति त्या स्थानामध्ये गळून पडते.  तिथेच मनुष्य नम्र, विनयशील होतो.  तिथेच पूर्णभावाने समर्पित होतो.  मग ते स्थान कोणतेही असो.  मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, राष्ट्रसेवा, ईश्वराची सेवा यांपैकी कोणतीही सेवा असेल.  

सेवा करताना आपणास व्यावहारिक दृष्टीने कितीही निकृष्ठ कर्म करावे लागले तरी आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये.  काया-वाचा-मनाने झोकून देऊन सेवा केली पाहिजे.  माझे प्रत्येक कर्म मी सेवेसाठीच केले पाहिजे.  

आई-वडिलांच्या सेवेसाठी भक्त पुंडलिकाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.  तसेच संपूर्ण जीवन गुरूंच्या चरणी समर्पित करणारे, गुरुमय जीवन जगणारे वैदिक काळापासून आजपर्यंत अनेक शिष्य आहेत.  भरतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करून तिला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्वस्व झोकून दिले, प्राणांची आहुति दिली, देशसेवेसाठी, राष्ट्रासाठी जीवनाचा शवासन् श्वास वेचला, असे कितीतरी भारतमातेचे थोर वीरपुत्र आहेत.  ईश्वराच्या प्राप्तीसाठी, दर्शनासाठी जन्म-जन्म सर्वसंगपरित्याग करून साधना करणारे, ईश्वरसेवा हेच ज्यांचे जीवन आहे, असे ईश्वराचे कितीतरी अनन्य भक्त या भूमातेच्या पोटी जन्माला आलेले आहेत.  

या सर्वांच्या जीवनामध्ये पाहिले तर त्यांचे श्रद्धास्थान जरी माता-पिता-गुरु-देश-राष्ट्र असे भिन्न-भिन्न असेल तरी त्यांच्या श्रद्धास्थानाविषयी असलेली त्यांची नितांत श्रद्धा, भक्ति, निष्ठा, धैर्य, दृढ विश्वास, अतुलनीय त्याग या सर्व गोष्टी समान दिसतात.  या सर्वांचेच चरित्र या त्यागामुळे, समर्पणामुळेच भव्य, दिव्य आणि उदात्त झालेले आहे.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ –


Tuesday, October 10, 2017

परमेश्वराची पूजा | Worship of God


अनेक वेळेला अनेक आध्यात्मिक साधक नित्य विग्रह पूजा गौण, निकृष्ठ साधना समजून देवाची पूजाच करीत नाहीत.  किंवा आज या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक घरांच्यामध्येही रोजची नित्य देवपूजाही होत नाही.  देव्हारा असतो.  देव असतात.  परंतु त्यांच्यावर धूळ पडलेली असते.  ही अत्यंत अयोग्य गोष्ट आहे.  असो.  साधकाच्या जीवनामध्ये पूजेला अतिशय महत्त्व आहे.  पूजेमध्ये प्रेमाचा उत्स्फूर्त भाव निर्माण होणे म्हणजे भक्ति आहे.  पूजा ही अशी एक साधना आहे की, त्यामध्ये आपली इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि या सर्वांचा समावेश होतो.  

देहाची शुद्धि करणे, षडंगादि न्यास करणे, मंत्राच्या साहाय्याने देवाला उपचार समर्पित करणे म्हणजे पूजा किंवा अर्चना होय.  गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे अर्पण करणे म्हणजे पंचोपचार पूजा होय.  तसेच पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नानीय, वस्त्र, आभूषण, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, पुन्हा आचमनीय, स्तोत्रपाठ, तर्पण, वंदन हे उपचार अर्पण करणे म्हणजे षोडशोपचार पूजा होय.  

याप्रमाणे पूजेचे अनेक प्रकार, उपचार, मंत्र, विधि असतील तरीही या सर्वांच्यामध्ये भक्तीचा भाव असणे आवश्यक आहे.  ज्याच्या अन्तःकरणामध्ये परमेश्वराविषयी भक्तीचा, प्रेमाचा भाव नाही, अशा मनुष्याने बहिरंगाने कितीही उपचारांनी पूजा केली तरी ती व्यर्थ आहे आणि याउलट भक्ताने भावाने केवळ पाणी जरी अर्पण केले तरी परमेश्वर त्याचे ग्रहण करतो.  

परमेश्वर हा आपल्याला सर्वस्व मानणाऱ्या धनहीन, दरिद्री, गरीब भक्तावरच प्रेम करतो, कारण अशा धनहीन, अनन्य भक्ताच्या निष्काम भक्तीमध्ये किती प्रेम व गोडी असते, हे तो रसज्ञ असणारा परमेश्वरच जाणू शकतो.  मात्र शास्त्र, ज्ञान, संपत्ति, कुळ व कर्माच्या मदाने उन्मत्त झालेले जे लोक संतांची निंदा करतात, संतांचा तिरस्कार करतात, अशा दुर्बुद्धि, दुष्ट पुरुषांनी केलेली पूजा परमेश्वर स्वीकारीत नाही.  यामुळे पूजा ही अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने केली पाहिजे.  पूजेमध्ये अन्य विधि किंवा उपचार हे निमित्तमात्र आहेत.  भाव हा सर्वश्रेष्ठ आहे.  परमेश्वर हा भावग्राही आहे.


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ –


Tuesday, September 5, 2017

अन्नसेवनाची वृत्ति | Attitude while Partaking Food



गृहस्थाश्रमामध्ये प्रसादवृत्ति असावी.  अन्न सेवन करताना अन्नपूर्णेने दिलेली ती भिक्षा आहे अशी वृत्ति ठेवावी.  अन्न हे केवळ उपभोगासाठी नाही, कारण आपण औषध उपभोगत नाही.  अन्न हे सेवनासाठी आहे.  अन्नसेवनात गृहस्थाश्रमीने विशिष्ट भावना ठेवावी.  “अन्नं न निन्द्यात् तत् व्रतम् |”  अन्नाचे फार मोठे व्रत आहे.  बुभुक्षिताप्रमाणे, अधाशीपणे अन्न खाऊ नये.  उभे राहून अन्न सेवन करू नये.  शास्त्रनियमाप्रमाणे खाली बसून, शांतपणे, एकाग्र चित्ताने अन्नाचे सेवन करावे.  उभे राहून अन्नाचा उपभोग वर्ज्य करावा.

अन्नाची निंदा, तिरस्कार, द्वेष किंवा घृणा नसावी.  शास्त्रकार म्हणतात, तिरस्करणीय वृत्तीने अन्न ग्रहण करताना तो मनुष्य अन्न न खाता स्वतःची पापेच भक्षण करत असतो.  “पापं भुञ्जते |”  असे भगवान गीतेत स्पष्टपणे सांगतात.  अशा अन्नसेवनाने मनुष्याला कधीही समाधान व शांति मिळणार नाही.  “अन्नं ब्रह्मेति व्यजानात् |”  अन्न भोज्य म्हणून उपभोगण्याची वस्तु नसून ते ब्रह्मस्वरूप आहे हे जाणावे.  आपण ईश्वराला नैवेद्य दाखवितो व तो नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केल्यावर आपली वृत्ति शुद्ध होते.  अन्न हे एकट्याच्या, स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त होत नाही.  अनेक दृष्ट-अदृष्ट शक्ति व वैश्विक नियम, देवदेवता यांच्या साहाय्याने व कृपेने मनुष्याला अन्न मिळते.  त्यामुळे अन्नाबद्दल त्याची उपकृततेची भावना असावी.

गीतेत भगवान म्हणतात –
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः |
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ||
सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला ‘मी’ वैश्वानर अग्निरूप होऊन, प्राण व अपान यांनी युक्त होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो.  यात सर्व अन्न ‘मी’च आहे व ते भक्षण करणाराही ‘मी’च आहे असे भगवान म्हणतात.  म्हणून प्रेमाने, जिव्हाळ्याने अन्नसेवन करावे.  अन्न हा परमेश्वराचा प्रसाद आहे, या वृत्तीने अन्न ग्रहण करावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ –

Tuesday, July 8, 2014

मागे काहीही राहिलेले नाही | There is Nothing Left Behind


एका नगरीमध्ये एक साधु पुरुष राहायला येतात.  ते अत्यंत विरक्त व एकांतप्रिय असतात.  राजा रोज नियमितपणे साधूंच्याकडे जात राहतो.  सेवा करतो आणि उपदेश ग्रहण करीत असतो.  त्याची श्रद्धा वृद्धिंगत होते.  तो त्या साधूंसाठी सर्व काही करतो.  चांगले राहायला, खायला-प्यायला देतो.  साधूंचेही जीवन व्यास्थित चाललेले असते.

हे सर्व चालू असताना हळुहळू राजाच्याच मनात विकल्प येऊ लागतो.  “मी सर्व काही या साधूंना देत आहे, पण साधु या सर्वांना नको न म्हणता सर्व उपभोगत आहेत.  वस्तुतः हे साधु असतील तर मी जरी सर्व दिले तरी त्यांनी भोगांचा त्याग केला पाहिजे.  परंतु साधु सुद्धा या भोगांमध्ये रमलेले दिसतात.”  एक दिवस असह्य होऊन तो साधूंना स्पष्टपणे विचारतो “आपण स्वतःला ज्ञानी, साधु म्हणविता परंतु आपण सुद्धा आमच्याप्रमाणे भोगासक्त झालेले दिसता.  मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ?” साधूंना काय समजायचे ते समजते.  ते शांतच राहतात.

दुसऱ्या दिवशी सकाळीच येण्यास ते राजाला सांगतात.  राजा आल्यानंतर ते राजाला फिरायला घेऊन जातात.  एक तास, दोन तास गप्पा मारीत चालत राहतात.  शेवटी त्या राज्याची सीमा येते.  मग मात्र राजा असह्य होतो.  तो सांगतो – “साधु महाराज ! आपण खूप दूरवर आलेलो आहोत, आता परतायला हवे.”

साधु विचारतात “ अरे ! कशासाठी मागे परतायचे ? ” त्यावेळी राजा उत्तर देतो की, “ मला माझे राज्य आहे, माझी बायको, मुले, मंत्री, प्रधान माझी वाट बघत असतील. ”  त्यावेळी साधु त्या राजाला शांतपणे सांगात “ आता तू मागे जा.  परंतु मी साधु आहे, मी पुढे जातो.  कारण माझे असे मागे काहीही राहिलेले नाही.  मी सर्व भोग भोगत असलो, बहिरांगाने तुझ्यासारखे व्यावहारिक जीवन जगलो तरीही तू आणि मी यांत फार फरक आहे. ”


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ –

Tuesday, December 10, 2013

सेवा वृत्ती | Attitude of Dedication



प्रत्येक कर्म मनुष्याला सुखदुःखांचे अनुभव देऊन कर्म-कर्मफलामध्येच बद्ध करते.  तरी तेच कर्म त्यामागील भाव (Attitude) बदलून केले तर रागद्वेषांचा पगडा आणि त्याचे मनावर होणारे सुखदुःखांचे परिणाम कमी होतात.  म्हणजेच कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये मन शांत, स्थिर व प्रसन्न राहाते.

यासाठी प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे –
ईश्वरार्पितं नेच्छया कृतम् |  चित्तशोधकं मुक्तिसाधकम् ||

कर्मफलाची अपेक्षा न ठेवता परमेश्वराला अर्पण केलेले कर्म चित्त शुद्ध होण्यासाठी साधन होते आणि शुद्ध चित्त मोक्षप्राप्तीसाठी साधनीभूत होते.  म्हणून प्रत्येक कर्म परमेश्वराला, कर्मफलाची अपेक्षा न ठेवता अर्पण करावे.  मग परमेश्वराला कर्म अर्पण करणे म्हणजे काय? आणि ते अर्पण कसे करावे?

उदा. एखादा सेल्समन मॅनेजरने दिलेल्या आज्ञेप्रमाणे काम करतो.  गिऱ्हाईकाला आपल्या कंपनीच्या मालाचे महत्व पटवून देऊन कंपनी कशी चांगली आहे हे समजावून सांगतो.  तसेच मनाने आपल्या कंपनीची भरभराट कशी होईल, ती कशी वाढेल याचाच विचार करीत असतो.  म्हणजेच तो शारीरिक, वाचिक व मानसिक कर्म कंपनीसाठीच करीत असतो. यालाच सेवाबुद्धि किंवा समर्पण बुद्धि म्हणतात.

या सेवावृत्तीमुळे अनेक फायदे होतात.  स्वतःचा अहंकार किंवा ‘मी करतो’ ही कर्तृत्वभावना कमी होते. दुसऱ्यासाठी काम करण्याची सेवावृत्ति वाढते.  त्यामुळे मनाची तन्मयता, एकाग्रता वाढते आणि मालकासाठीच काम करीत असल्यामुळे कर्मफलाची अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणारा अपेक्षाभंग, निराशा वगैरे कमी होतात.  याप्रमाणे कर्म करीत असताना प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करून सेवावृत्तीने जगावे.


- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010


- हरी ॐ –