Tuesday, September 5, 2017

अन्नसेवनाची वृत्ति | Attitude while Partaking Foodगृहस्थाश्रमामध्ये प्रसादवृत्ति असावी.  अन्न सेवन करताना अन्नपूर्णेने दिलेली ती भिक्षा आहे अशी वृत्ति ठेवावी.  अन्न हे केवळ उपभोगासाठी नाही, कारण आपण औषध उपभोगत नाही.  अन्न हे सेवनासाठी आहे.  अन्नसेवनात गृहस्थाश्रमीने विशिष्ट भावना ठेवावी.  अन्नं न निन्द्यात् तत् व्रतम् |”  अन्नाचे फार मोठे व्रत आहे.  बुभुक्षिताप्रमाणे, अधाशीपणे अन्न खाऊ नये.  उभे राहून अन्न सेवन करू नये.  शास्त्रनियमाप्रमाणे खाली बसून, शांतपणे, एकाग्र चित्ताने अन्नाचे सेवन करावे.  उभे राहून अन्नाचा उपभोग वर्ज्य करावा.

अन्नाची निंदा, तिरस्कार, द्वेष किंवा घृणा नसावी.  शास्त्रकार म्हणतात, तिरस्करणीय वृत्तीने अन्न ग्रहण करताना तो मनुष्य अन्न न खाता स्वतःची पापेच भक्षण करत असतो.  पापं भुञ्जते |”  असे भगवान गीतेत स्पष्टपणे सांगतात.  अशा अन्नसेवनाने मनुष्याला कधीही समाधान व शांति मिळणार नाही.  अन्नं ब्रह्मेति व्यजानात् |”  अन्न भोज्य म्हणून उपभोगण्याची वस्तु नसून ते ब्रह्मस्वरूप आहे हे जाणावे.  आपण ईश्वराला नैवेद्य दाखवितो व तो नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केल्यावर आपली वृत्ति शुद्ध होते.  अन्न हे एकट्याच्या, स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त होत नाही.  अनेक दृष्ट-अदृष्ट शक्ति व वैश्विक नियम, देवदेवता यांच्या साहाय्याने व कृपेने मनुष्याला अन्न मिळते.  त्यामुळे अन्नाबद्दल त्याची उपकृततेची भावना असावी.

गीतेत भगवान म्हणतात –
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः |
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ||
सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला ‘मी’ वैश्वानर अग्निरूप होऊन, प्राण व अपान यांनी युक्त होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो.  यात सर्व अन्न ‘मी’च आहे व ते भक्षण करणाराही ‘मी’च आहे असे भगवान म्हणतात.  म्हणून प्रेमाने, जिव्हाळ्याने अन्नसेवन करावे.  अन्न हा परमेश्वराचा प्रसाद आहे, या वृत्तीने अन्न ग्रहण करावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
- हरी ॐ

No comments:

Post a Comment