Showing posts with label Puja. Show all posts
Showing posts with label Puja. Show all posts

Tuesday, October 17, 2017

पूजा का करावी ? | How Worship Helps ?


आज आपल्याला सतत विश्वामधील दृश्य विषय व भोग पाहण्याचीच इंद्रियांना सवय लागलेली आहे.  त्यामुळे मन सतत विषयाभिमुख व बहिर्मुख होते.  मनामध्ये रागद्वेषादि विकार निर्माण होतात.  परंतु पूजेसारख्या साधनांनी मन क्रमाक्रमाने ईश्वराभिमुख होऊ लागते.  मनाने निदान काही काळ तरी ईश्वरचिंतन होऊ लागते.  

श्रीमद्भागवतामध्ये भगवान स्वतःच उद्धवाला मनाच्या शुद्धीसाठी पूजा व पूजेला अनुकूल असणारी अनेक कर्म व साधना यांचे वर्णन करतात.  भगवान उद्धवास मोठ्या प्रेमाने सांगतात की, उद्धवा !  भक्ताने सर्वांना माझ्या अवताराच्या – जन्माच्या व लीलांच्या कथा सांगाव्यात.  माझी जयंती वगैरे उत्सवांच्यामध्ये आनंदाने व उत्साहाने भाग घ्यावा.  गायन, नृत्य, वादन, कथा यांच्या साहाय्याने मंदिराच्यामध्ये माझे उत्सव साजरे करावेत.  वार्षिक पर्वकाळांच्यामध्ये सर्व ठिकाणी तीर्थयात्रा करून विधिपूर्वक पूजा कराव्यात.  

वेदविहित व तंत्रोक्त दीक्षा घेऊन त्याप्रमाणे मत्परायण होऊन व्रतांचे अनुष्ठान करावे.  माझ्या मूर्तिस्थापनेमध्ये पूर्ण श्रद्धा ठेवावी.  स्वतः तसेच सर्वांनी मिळून उद्याने व माझ्या सुंदर मंदिरांचे निर्माण करावे, तसेच माझ्या मंदिरातील केर काढावा, सडा घालावा, जमीन गोमयाने सारवून घ्यावी, त्यावर सुंदर रांगोळी घालावी.  अशा प्रकारे एखाद्या दासाप्रमाणे, सेवकाप्रमाणे माझ्या गृहाची – मंदिराची निष्कपट भावाने सेवा करावी.  

ही सर्व कर्मे भक्तिभावाने करणारे भक्त परमेश्वराला अतिशय प्रिय होतात.  अशा पूजेमध्ये मनही तल्लीन होते.  मन रागद्वेषरहित, विकाररहित, अत्यंत शुद्ध व निर्मळ होते.  विश्वाचे भान, विषयांचे भान संपते.  भोगासक्ति कमी होऊन विषयांबद्दल वाटणारे आकर्षण कमी-कमी व्हायला लागते.  मन त्या चैतन्यमय असणाऱ्या सगुण रूपाशी एकरूप होते.  तिथे मी व परमेश्वर इतकेच शिल्लक राहते.  कारण तिथे परमेश्वर म्हणजे केवळ एक विग्रह न राहता तो भक्तासाठी साक्षात चैतन्याचा पुतळा होतो.  ती चैतन्यस्वरूपाचीच पूजा होते.  भक्ताला समोर, बाहेर, आत सर्व ठिकाणी चैतन्यस्वरूपाचे दर्शन होते.  


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ –



Tuesday, October 10, 2017

परमेश्वराची पूजा | Worship of God


अनेक वेळेला अनेक आध्यात्मिक साधक नित्य विग्रह पूजा गौण, निकृष्ठ साधना समजून देवाची पूजाच करीत नाहीत.  किंवा आज या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक घरांच्यामध्येही रोजची नित्य देवपूजाही होत नाही.  देव्हारा असतो.  देव असतात.  परंतु त्यांच्यावर धूळ पडलेली असते.  ही अत्यंत अयोग्य गोष्ट आहे.  असो.  साधकाच्या जीवनामध्ये पूजेला अतिशय महत्त्व आहे.  पूजेमध्ये प्रेमाचा उत्स्फूर्त भाव निर्माण होणे म्हणजे भक्ति आहे.  पूजा ही अशी एक साधना आहे की, त्यामध्ये आपली इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि या सर्वांचा समावेश होतो.  

देहाची शुद्धि करणे, षडंगादि न्यास करणे, मंत्राच्या साहाय्याने देवाला उपचार समर्पित करणे म्हणजे पूजा किंवा अर्चना होय.  गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे अर्पण करणे म्हणजे पंचोपचार पूजा होय.  तसेच पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नानीय, वस्त्र, आभूषण, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, पुन्हा आचमनीय, स्तोत्रपाठ, तर्पण, वंदन हे उपचार अर्पण करणे म्हणजे षोडशोपचार पूजा होय.  

याप्रमाणे पूजेचे अनेक प्रकार, उपचार, मंत्र, विधि असतील तरीही या सर्वांच्यामध्ये भक्तीचा भाव असणे आवश्यक आहे.  ज्याच्या अन्तःकरणामध्ये परमेश्वराविषयी भक्तीचा, प्रेमाचा भाव नाही, अशा मनुष्याने बहिरंगाने कितीही उपचारांनी पूजा केली तरी ती व्यर्थ आहे आणि याउलट भक्ताने भावाने केवळ पाणी जरी अर्पण केले तरी परमेश्वर त्याचे ग्रहण करतो.  

परमेश्वर हा आपल्याला सर्वस्व मानणाऱ्या धनहीन, दरिद्री, गरीब भक्तावरच प्रेम करतो, कारण अशा धनहीन, अनन्य भक्ताच्या निष्काम भक्तीमध्ये किती प्रेम व गोडी असते, हे तो रसज्ञ असणारा परमेश्वरच जाणू शकतो.  मात्र शास्त्र, ज्ञान, संपत्ति, कुळ व कर्माच्या मदाने उन्मत्त झालेले जे लोक संतांची निंदा करतात, संतांचा तिरस्कार करतात, अशा दुर्बुद्धि, दुष्ट पुरुषांनी केलेली पूजा परमेश्वर स्वीकारीत नाही.  यामुळे पूजा ही अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने केली पाहिजे.  पूजेमध्ये अन्य विधि किंवा उपचार हे निमित्तमात्र आहेत.  भाव हा सर्वश्रेष्ठ आहे.  परमेश्वर हा भावग्राही आहे.


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ –