Tuesday, December 10, 2013

सेवा वृत्ती | Attitude of Dedication



प्रत्येक कर्म मनुष्याला सुखदुःखांचे अनुभव देऊन कर्म-कर्मफलामध्येच बद्ध करते.  तरी तेच कर्म त्यामागील भाव (Attitude) बदलून केले तर रागद्वेषांचा पगडा आणि त्याचे मनावर होणारे सुखदुःखांचे परिणाम कमी होतात.  म्हणजेच कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये मन शांत, स्थिर व प्रसन्न राहाते.

यासाठी प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे –
ईश्वरार्पितं नेच्छया कृतम् |  चित्तशोधकं मुक्तिसाधकम् ||

कर्मफलाची अपेक्षा न ठेवता परमेश्वराला अर्पण केलेले कर्म चित्त शुद्ध होण्यासाठी साधन होते आणि शुद्ध चित्त मोक्षप्राप्तीसाठी साधनीभूत होते.  म्हणून प्रत्येक कर्म परमेश्वराला, कर्मफलाची अपेक्षा न ठेवता अर्पण करावे.  मग परमेश्वराला कर्म अर्पण करणे म्हणजे काय? आणि ते अर्पण कसे करावे?

उदा. एखादा सेल्समन मॅनेजरने दिलेल्या आज्ञेप्रमाणे काम करतो.  गिऱ्हाईकाला आपल्या कंपनीच्या मालाचे महत्व पटवून देऊन कंपनी कशी चांगली आहे हे समजावून सांगतो.  तसेच मनाने आपल्या कंपनीची भरभराट कशी होईल, ती कशी वाढेल याचाच विचार करीत असतो.  म्हणजेच तो शारीरिक, वाचिक व मानसिक कर्म कंपनीसाठीच करीत असतो. यालाच सेवाबुद्धि किंवा समर्पण बुद्धि म्हणतात.

या सेवावृत्तीमुळे अनेक फायदे होतात.  स्वतःचा अहंकार किंवा ‘मी करतो’ ही कर्तृत्वभावना कमी होते. दुसऱ्यासाठी काम करण्याची सेवावृत्ति वाढते.  त्यामुळे मनाची तन्मयता, एकाग्रता वाढते आणि मालकासाठीच काम करीत असल्यामुळे कर्मफलाची अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणारा अपेक्षाभंग, निराशा वगैरे कमी होतात.  याप्रमाणे कर्म करीत असताना प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करून सेवावृत्तीने जगावे.


- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010


- हरी ॐ

No comments:

Post a Comment