Showing posts with label Free. Show all posts
Showing posts with label Free. Show all posts

Tuesday, August 22, 2023

निःसंग जीवन - एक फेरफटका | Unattached Life - An Easy Stroll

 



ज्ञानी पुरुष आत्मचिंतन करून देहात्म्याचा निरास करतो.  त्यानंतर निदिध्यासनेच्या साहाय्याने तो ज्ञाननिष्ठा प्राप्त करून ब्रह्मस्वरूपामध्ये दृढ होतो.  त्यावेळी अज्ञान पूर्णतः ध्वंस होऊन मोहाचाही निरास होतो आणि विपरीत ज्ञानही गाळून पडते.  भ्रांतिरूपी घनदाट मेघ निरस्त होतात.  ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये सत्-चित्-आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप, प्रकाशस्वरूप प्रकट होते.  तो आणि आत्मचैतन्य भिन्न न राहता तो स्वतःच परब्रह्मस्वरूप होतो.  त्याला एकत्वाची, अद्वैताची अभेद दृष्टि प्राप्त होते.  तो या शरीरामध्ये राहताना शरीरापासून अत्यंत अलिप्त व अस्पर्शित राहतो.

 

जसे आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो, तसेच तो स्वतःच्या शरीरामधये निःसंगपणाने राहतो.  भाड्याच्या घरात आपण आयुष्यभर राहिलो तरी आपल्याला माहीत असते की, हे आपले घर नाही.  ते राहायचे फक्त एक तात्पुरते स्थान आहे.  त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषाला अगदी निश्चित माहीत असते की, हे शरीर म्हणजे राहण्याचे फक्त स्थान आहे.  म्हणून तो शरीरापासून स्वतःला पूर्णतः निवृत्त करतो आणि अखंडपणे ब्रह्मस्वरूपामध्येच रममाण होतो.

 

म्हणून वसिष्ठ मुनि येथे फार सुंदर दृष्टांत देतात - धियो दृष्टे तत्त्वे रमणमटनं जागतमिदम् |  ज्ञानी पुरुषांचे जगात राहणे म्हणजे जणु काही सहज फेरफटका मारणे आहे.  जसे आपण कंटाळा आला म्हणून बागेत बाहेर फिरून येतो, तसेच जणु काही या विश्वामध्ये ज्ञानी पुरुष भ्रमण करतो.  विश्वामध्ये सर्वांच्यामध्ये असूनही तो कशानेही लिप्त होत नाही.  अज्ञानीपेक्षा ज्ञानी पुरुषच विश्वाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो.  त्याच्या दृष्टीने जग हे खेळण्याचे, फिरण्याचे एक स्थान आहे.  त्यामुळे ज्ञानी पुरुष या जगात येतो, काही काळ राहतो, निर्लिप्त मनाने सर्व अनुभवतो आणि प्रारब्ध संपले, या उपाधीचे प्रयोजन संपले की, तो या विश्वामधून निघून जातो.  असे सुंदर जीवन ज्ञानी पुरुष जगतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, October 11, 2016

आपण मुक्त का नाही आहोत ? | Why We are Not Free ?



आत्मस्वरूप सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये ‘अहं’ ‘अहं’ प्रत्ययाने अंतःस्फूर्तपणे स्पष्टपणे अनुभवाला येत असेल तर प्रयत्न न करता अनायासाने सर्व जीव मुक्तच का नाहीत ?  सर्व जीव स्वभावतः जन्मापासून मुक्त पाहिजेत.  परंतु वस्तुस्थिति पाहिली तर, सर्व जीव दुःखी, मर्त्य, संसारी दिसतात. असे का ?

सर्व जीव स्वतःला अहं प्रत्ययाच्या आलंबनाने जाणत असले तरीही त्यांच्या दृष्टीवर अज्ञानरूपी आच्छादन आल्यामुळे स्वतःला असंगचिदानन्दस्वरूपाने स्पष्टपणे जाणत नाहीत.  अहं अस्मि  ‘मी आहे’ हा सर्वांचा अनुभव आहे.  ‘मी’ या प्रत्ययाचे आलंबन देह होतो आणि देहाबरोबर ‘मी’ सुद्धा जन्ममृत्युयुक्त होतो.  यामधूनच ‘मी मर्त्य आहे’ ही भावना निर्माण होते.  थोडक्यात ‘मी आहे’ हे सर्वजण जाणत असले तरीही ‘मी सत्यस्वरूप आहे’ हे कोणीही जाणत नाही.  सत् म्हणजे नित्य अविनाशी होय.  त्रिकालेSपि तिष्ठति इति सत् |  भूत भविष्य, वर्तमान या तीन्हीही काळात सत्तास्वरूपाने असणाऱ्या स्वस्वरूपाची जाणीव असत नाही.

विश्वातील सर्व विषयांचे ज्ञान मी घेतो.  म्हणजेच हे सर्व विश्व ज्ञेय आहे आणि मी त्या सर्वांचा ज्ञाता आहे.  परंतु दुर्दैवाने तो जितके बाह्य विश्वातील विषयांचे ज्ञान घेतो तितक्या प्रमाणात त्याला स्वतःच्या अज्ञानाची अधिक जाणीव होते.  तो स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणामुळे ‘मी’ ज्ञानस्वरूप आहे हे जाणत नाही.

स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणाने दृष्टि आवृत्त झाल्यामुळे मनुष्य ‘मी’लाच देह, इन्द्रिये, मन वगैरेदि म्हणवून घेतो.  या तादात्म्यामुळे त्यांचे सर्व विकार, गुणदोष, सुख-दुःख स्वतःवर आरोपित करतो.  ‘मी सुखी’, ‘मी दुःखी’, असे अविचाराने म्हणतो. यामधूनच तो सुखाचा शोध घेतो.  परंतु शेवटी त्याच्या वाट्याला दुःख, नैराश्य येते.  सतत असंतुष्ट राहातो.  स्वतःला दुःखी, अभागी म्हणवून घेतो.  हे चिरंतन, शाश्वत सुख, आनंद बाह्य विषयांच्यामध्ये नसून ते स्वतःचे स्वरूपच आहे.  दुर्दैवाने ते चिरंतन सुख आपल्या आतच आहे हे मनुष्याला माहीत नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

Tuesday, July 8, 2014

मागे काहीही राहिलेले नाही | There is Nothing Left Behind


एका नगरीमध्ये एक साधु पुरुष राहायला येतात.  ते अत्यंत विरक्त व एकांतप्रिय असतात.  राजा रोज नियमितपणे साधूंच्याकडे जात राहतो.  सेवा करतो आणि उपदेश ग्रहण करीत असतो.  त्याची श्रद्धा वृद्धिंगत होते.  तो त्या साधूंसाठी सर्व काही करतो.  चांगले राहायला, खायला-प्यायला देतो.  साधूंचेही जीवन व्यास्थित चाललेले असते.

हे सर्व चालू असताना हळुहळू राजाच्याच मनात विकल्प येऊ लागतो.  “मी सर्व काही या साधूंना देत आहे, पण साधु या सर्वांना नको न म्हणता सर्व उपभोगत आहेत.  वस्तुतः हे साधु असतील तर मी जरी सर्व दिले तरी त्यांनी भोगांचा त्याग केला पाहिजे.  परंतु साधु सुद्धा या भोगांमध्ये रमलेले दिसतात.”  एक दिवस असह्य होऊन तो साधूंना स्पष्टपणे विचारतो “आपण स्वतःला ज्ञानी, साधु म्हणविता परंतु आपण सुद्धा आमच्याप्रमाणे भोगासक्त झालेले दिसता.  मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ?” साधूंना काय समजायचे ते समजते.  ते शांतच राहतात.

दुसऱ्या दिवशी सकाळीच येण्यास ते राजाला सांगतात.  राजा आल्यानंतर ते राजाला फिरायला घेऊन जातात.  एक तास, दोन तास गप्पा मारीत चालत राहतात.  शेवटी त्या राज्याची सीमा येते.  मग मात्र राजा असह्य होतो.  तो सांगतो – “साधु महाराज ! आपण खूप दूरवर आलेलो आहोत, आता परतायला हवे.”

साधु विचारतात “ अरे ! कशासाठी मागे परतायचे ? ” त्यावेळी राजा उत्तर देतो की, “ मला माझे राज्य आहे, माझी बायको, मुले, मंत्री, प्रधान माझी वाट बघत असतील. ”  त्यावेळी साधु त्या राजाला शांतपणे सांगात “ आता तू मागे जा.  परंतु मी साधु आहे, मी पुढे जातो.  कारण माझे असे मागे काहीही राहिलेले नाही.  मी सर्व भोग भोगत असलो, बहिरांगाने तुझ्यासारखे व्यावहारिक जीवन जगलो तरीही तू आणि मी यांत फार फरक आहे. ”


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ