Tuesday, October 6, 2026

आत्म्याची विशेषणे | Adjectives For The Supreme Being

 




श्रुति आत्म्याची अनेक विशेषणे सांगते –

१. पर्यगात् – आत्मचैतन्य नाही असे एकही स्थान नाही.  परंतु जाऊनही तो या सर्वांच्या अतीत, सर्वांच्यापासून अलिप्त, अपरिणामी, अस्पर्शित स्वरूपाने राहातो.

२. शुक्रम् – आत्मा हा शुक्रं म्हणजेच अत्यंत तेजस्वी, ओजस्वी असून शुद्ध, दीप्तिमान स्वयंप्रकाश-स्वरूप आहे.  त्याच्याच प्रकाशामध्ये अव्यक्तापासून स्थावरान्तपर्यंत सर्व विश्व प्रकाशमान होते.

३. अकायम् – आत्मा शरीररहित, उपाधीरहित आहे.  याठिकाणी शरीर म्हणजेच लिंगशरीर होय.  लिंग म्हणजेच सूक्ष्मशरीर.  तसेच आत्मा सूक्ष्मशरीराच्याही अतीत आहे.

४. अव्रणम् – ज्याला कोणताही व्रण म्हणजेच क्षति किंवा इजा नाही, त्याला ‘अव्रणम्’ असे म्हणतात.  आत्मा हा इजारहित, व्रणरहित आहे.

५. अस्नाविरम् – ज्याच्यामध्ये स्नायू, शिरा म्हणजेच नाडी, त्याचप्रमाणे मज्जा, अस्थि रक्त, मांस वगैरे धातु नाहीत, त्याला ‘अस्नाविरम्’ असे म्हणतात.  आत्मा स्थूल शरीराच्याही अतीत आहे.  

६. शुद्धम् – शुद्ध म्हणजे निर्मळ, अविद्यामलरहित स्वरूप होय.  म्हणजेच आत्मा हा कारण शरीराच्याही अतीत आहे.

७. अपापविद्धम् – आत्मस्वरूपामध्ये धर्मादि पाप-पुण्याचा अभाव आहे.  म्हणजेच आत्मा कर्म-कर्मफळाच्याही अतीत आहे.

८. कविः – कवी म्हणजेच क्रान्तदर्शी किंवा सर्वदर्शी होय.  जो ज्ञानाने सर्व पाहू शकतो, जणू शकतो, त्यास ‘कवी’ असे म्हणतात.

९. मनीषी – जो मनाला प्रेरणा देतो, तो सर्वज्ञ ईश्वर म्हणजेच चैतन्य होय.  आत्मचैतन्यच मनाला सत्ता आणि स्फूर्ति प्रदान करते.

१०. परिभूः – आत्मचैतन्य हे सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ, सर्वोत्तम असल्यामुळेच त्यास ‘परिभूः’ असे म्हणतात.

११. स्वयंभूः – जो स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने निर्माण होतो, त्यास ‘स्वयंभू’ असे म्हणतात.  आत्मचैतन्याला निर्माण होण्यासाठी अन्य कोणत्याही कारणाची आवश्यकताच नाही.  कारण नसल्यामुळे त्याचा जन्मही शक्य नाही.  म्हणूनच त्यास अजन्मा, जन्ममृत्युरहित असे म्हणतात.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ–