अनेक
वेळेला अनेक आध्यात्मिक साधक नित्य विग्रह पूजा गौण, निकृष्ठ साधना समजून देवाची
पूजाच करीत नाहीत. किंवा आज या धकाधकीच्या
जीवनामध्ये अनेक घरांच्यामध्येही रोजची नित्य देवपूजाही होत नाही. देव्हारा असतो. देव असतात. परंतु त्यांच्यावर धूळ पडलेली असते. ही अत्यंत अयोग्य गोष्ट आहे. असो. साधकाच्या
जीवनामध्ये पूजेला अतिशय महत्त्व आहे. पूजेमध्ये
प्रेमाचा उत्स्फूर्त भाव निर्माण होणे म्हणजे भक्ति आहे. पूजा ही अशी एक साधना आहे की, त्यामध्ये आपली
इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि या सर्वांचा समावेश होतो.
देहाची
शुद्धि करणे, षडंगादि न्यास करणे, मंत्राच्या साहाय्याने देवाला उपचार समर्पित
करणे म्हणजे पूजा किंवा अर्चना होय. गंध,
पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे अर्पण करणे म्हणजे पंचोपचार पूजा होय. तसेच पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नानीय,
वस्त्र, आभूषण, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, पुन्हा आचमनीय,
स्तोत्रपाठ, तर्पण, वंदन हे उपचार अर्पण करणे म्हणजे षोडशोपचार पूजा होय.
याप्रमाणे
पूजेचे अनेक प्रकार, उपचार, मंत्र, विधि असतील तरीही या सर्वांच्यामध्ये भक्तीचा
भाव असणे आवश्यक आहे. ज्याच्या
अन्तःकरणामध्ये परमेश्वराविषयी भक्तीचा, प्रेमाचा भाव नाही, अशा मनुष्याने
बहिरंगाने कितीही उपचारांनी पूजा केली तरी ती व्यर्थ आहे आणि याउलट भक्ताने भावाने
केवळ पाणी जरी अर्पण केले तरी परमेश्वर त्याचे ग्रहण करतो.
परमेश्वर
हा आपल्याला सर्वस्व मानणाऱ्या धनहीन, दरिद्री, गरीब भक्तावरच प्रेम करतो, कारण
अशा धनहीन, अनन्य भक्ताच्या निष्काम भक्तीमध्ये किती प्रेम व गोडी असते, हे तो
रसज्ञ असणारा परमेश्वरच जाणू शकतो. मात्र
शास्त्र, ज्ञान, संपत्ति, कुळ व कर्माच्या मदाने उन्मत्त झालेले जे लोक संतांची
निंदा करतात, संतांचा तिरस्कार करतात, अशा दुर्बुद्धि, दुष्ट पुरुषांनी केलेली
पूजा परमेश्वर स्वीकारीत नाही. यामुळे
पूजा ही अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने केली पाहिजे. पूजेमध्ये अन्य विधि किंवा उपचार हे
निमित्तमात्र आहेत. भाव हा सर्वश्रेष्ठ
आहे. परमेश्वर हा भावग्राही आहे.
- "भज
गोविंदम् |” या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment