Showing posts with label Dispassion. Show all posts
Showing posts with label Dispassion. Show all posts

Tuesday, March 21, 2023

निर्निमित्त वैराग्य | Untriggered Dispassion

 



निर्निमित्त वैराग्य म्हणजे काही निमित्ताशिवाय, कारणाशिवाय निर्माण झालेले वैराग्य होय.  आपण मागील वैराग्यप्रकरणामध्ये याचा विस्तारपूर्वक अर्थ पाहिला आहे.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सहजासहजी वैराग्य उत्पन्न होत नाही.  वैराग्याचे अनेक प्रकार आहेत.  पुष्कळ वेळेला प्रासंगिक, तात्कालिक, दुसऱ्याकडे पाहून किंवा नैराश्यामधून माणसाला वैराग्य येते.  म्हणून त्याला स्मशान वैराग्य असा शब्द वापरला जातो.  एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यावेळेस आपण स्मशानात जातो, तेथील शोकाकुल वातावरण पाहतो, त्यावेळी क्षणभर वाटते की, खरेच हे सगळे भोग आणि विषय व्यर्थ आहेत.  मनुष्य दुःखाने व्याप्त होतो.  त्याला काहीच खावेसे, उपभोगावेसे वाटत नाही.  परंतु अंत्यविधि झाले, स्मशानातून बाहेर पडले की, पुन्हा व्यवहार सुरु होतो.  मनुष्य पूर्ववत् विषयासक्त जीवन जगू लागतो.

 

किंवा काही वेळेस एखादा भयंकर प्रसंग घडला, संकट आले, तरीही मनामध्ये वैराग्यवृत्ति निर्माण होते.  परंतु हे वैराग्य दीर्घकाळ टिकत नाही.  प्रसंग निघून गेला की, वैराग्यही निघून जाते.  याला खरे वैराग्य म्हणत नाहीत, कारण हे सनिमित्त वैराग्य आहे.  म्हणजेच या वैराग्याच्या मागे एखादा प्रसंग, व्यक्ति, घटना यांपैकी काहीतरी निमित्त असते.  कशामुळेतरी वैराग्य येऊन मनुष्य काही काळापुरताच आध्यात्मिक झाल्यासारखा वाटतो.  परंतु नंतर पुन्हा तो मनुष्य पूर्ववत् संसारामध्ये आसक्त होऊन विषयांचा उपभोग घेऊ लागतो.  म्हणून याला सनिमित्त किंवा तात्कालिक वैराग्य म्हणतात.

 

असे स्पष्ट करून वसिष्ठ मुनि म्हणातात की, रामा !  तुझे वैराग्य मात्र निर्निमित्त आहे.  असे वैराग्य जन्मतःच लहानपणापासून निर्माण होते.  म्हणून वैराग्यसंपन्न साधु निर्माण करता येत नाही तर तो जन्मालाच यावा लागतो.  श्रीरामांच्या मनामध्ये ऐन तारुण्यावस्थेमध्ये असे अभिजात वैराग्य निर्माण झाले होते.  हे वैराग्य चारु म्हणजे अतिशय सुंदर होते.  जो मनुष्य सतत काहीतरी मागतो, असंतुष्ट असतो त्या मनुष्यापेक्षा समाधानी, तृप्त, शांत असलेला विरक्त मनुष्य चारु म्हणजे खूप सुंदर दिसतो.  कारण त्याच्यामध्ये निर्निमित्त वैराग्य असते.  त्याला वैराग्याचा वेगळा उपदेश देण्याची आवश्यकताच नसते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ–




Tuesday, July 8, 2014

मागे काहीही राहिलेले नाही | There is Nothing Left Behind


एका नगरीमध्ये एक साधु पुरुष राहायला येतात.  ते अत्यंत विरक्त व एकांतप्रिय असतात.  राजा रोज नियमितपणे साधूंच्याकडे जात राहतो.  सेवा करतो आणि उपदेश ग्रहण करीत असतो.  त्याची श्रद्धा वृद्धिंगत होते.  तो त्या साधूंसाठी सर्व काही करतो.  चांगले राहायला, खायला-प्यायला देतो.  साधूंचेही जीवन व्यास्थित चाललेले असते.

हे सर्व चालू असताना हळुहळू राजाच्याच मनात विकल्प येऊ लागतो.  “मी सर्व काही या साधूंना देत आहे, पण साधु या सर्वांना नको न म्हणता सर्व उपभोगत आहेत.  वस्तुतः हे साधु असतील तर मी जरी सर्व दिले तरी त्यांनी भोगांचा त्याग केला पाहिजे.  परंतु साधु सुद्धा या भोगांमध्ये रमलेले दिसतात.”  एक दिवस असह्य होऊन तो साधूंना स्पष्टपणे विचारतो “आपण स्वतःला ज्ञानी, साधु म्हणविता परंतु आपण सुद्धा आमच्याप्रमाणे भोगासक्त झालेले दिसता.  मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ?” साधूंना काय समजायचे ते समजते.  ते शांतच राहतात.

दुसऱ्या दिवशी सकाळीच येण्यास ते राजाला सांगतात.  राजा आल्यानंतर ते राजाला फिरायला घेऊन जातात.  एक तास, दोन तास गप्पा मारीत चालत राहतात.  शेवटी त्या राज्याची सीमा येते.  मग मात्र राजा असह्य होतो.  तो सांगतो – “साधु महाराज ! आपण खूप दूरवर आलेलो आहोत, आता परतायला हवे.”

साधु विचारतात “ अरे ! कशासाठी मागे परतायचे ? ” त्यावेळी राजा उत्तर देतो की, “ मला माझे राज्य आहे, माझी बायको, मुले, मंत्री, प्रधान माझी वाट बघत असतील. ”  त्यावेळी साधु त्या राजाला शांतपणे सांगात “ आता तू मागे जा.  परंतु मी साधु आहे, मी पुढे जातो.  कारण माझे असे मागे काहीही राहिलेले नाही.  मी सर्व भोग भोगत असलो, बहिरांगाने तुझ्यासारखे व्यावहारिक जीवन जगलो तरीही तू आणि मी यांत फार फरक आहे. ”


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ –

Monday, December 30, 2013

खरा संन्यासी | True Sanyaasi


संन्यासी अनेक प्रकारचे आहेत –

१. काही साधक आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने संन्यस्त वृत्तीने जगतात.  ते जिज्ञासु संन्यासी असल्याने त्यांना ‘विविदिशा संन्यासी’ म्हणतात.

२. काही साधक, मुमुक्षु शास्त्राच्या श्रवणमननाची साधना करून त्यामधून उदयाला आलेले ज्ञान यथार्थ, सम्यक आणि संशयविपर्ययरहित करण्यासाठी, म्हणजेच ज्ञाननिष्ठा प्राप्त करून स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होण्यासाठी शास्त्रविहित सर्व श्रौत व स्मार्त कर्मांचा त्याग करून संन्यास ग्रहण करतात.  हा संन्यास, निदिध्यासना म्हणजेच ब्रह्माभ्यास करण्यासाठी ग्रहण केलेला असतो.

३. काही संन्यासी ब्रह्मनिष्ठ होऊन स्वतःच साक्षात ब्रह्मस्वरूप झालेले आहेत.  भगवान त्यांचे वर्णन अनेक श्लोकांच्यामधून करतात - 
             सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |
             नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्  || (गीता अ. ५-१३)
सर्व कर्मांचा मनाने त्याग करून नवद्वारयुक्त शरीरामध्ये स्वतः काहीही न करता किंवा दुसऱ्यांच्याकडून कर्म न करविता अनायासाने आपल्या स्वस्वरूपामध्ये राहातो.

             विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि |
             शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः || (गीता अ. ५-१८)
विद्या व विनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा तसेच चंडाल या सर्व प्राणिमात्रांच्यामध्ये असे विद्वान, ब्रह्मज्ञानी संन्यासी समदृष्टीने पाहतात.

             यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति |
             तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति || (गीता अ. ६-३०)
जो पुरुष सर्व भूतांच्यामध्ये सर्वांचे आत्मस्वरूप असणाऱ्या मला - वासुदेवाला पाहतो आणि सर्व भूतांना माझ्यामध्ये – वासुदेवामध्ये पाहतो, त्याला ‘मी’ दूर नाही किंवा तो मला दूर नाही.  म्हणजेच ‘तो आणि ‘मी’ एकच आहे.

 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


 

- हरी ॐ –

Tuesday, November 12, 2013

स्वकर्तृत्वाचा अहंकार | Ego about one’s capability




थोडा विचार केला तर प्रश्न येतो की, कर्तृत्व करायला अंतरिक शक्ति, प्रेरणा, सामर्थ्य कोण देतो ?  मनुष्य स्वकर्तृत्वाने परमेश्वराच्या सत्तेशिवाय मातीचा कण तरी निर्माण करू शकतो का ?  नव्हे डोळ्यांची उघडझाप तरी करू शकतो का ?  ही त्या जगन्नियामक, सर्वशक्तिमान परमेश्वराची कृपा नाही का ?  म्हणून कार्य करायला शक्ति देणारा व कार्यसिद्धि करणारा तोच परमेश्वर आहे.  हे जाणून पुरुषप्रयत्नाने प्राप्त झालेली संपत्ति आपली स्वतःची नसून परमेश्वराचीच आहे, हे जाणावे व अहंकार सोडवा.  

अवतारकार्यात प्रभू रामचंद्रालाही अहंकार झाला होता, मग सामान्य अज्ञ मानवाची काय कथा ?  श्रीरामाची छोटीशी सुंदर कथा !  वानरसेना दगडावर रामाचे नाव लिहून सेतु तयार करण्यासाठी समुद्रात दगड टाकत होती व तो प्रत्येक दगड तरंगत होता.  रामाला ते पाहून गर्व झाला.  केवढा आपल्या नामाचा महिमा !  आपणही असाच दगड टाकावा.  पण रामाने टाकलेला दगड सरळ तळाला गेला.

हे सर्व त्याचा भक्त हनुमान पाहात होता.  त्यालाही मनातल्या मनात हसू आले.  काय आश्चर्य !  स्वतः अवतारी रामाने टाकलेला दगड तरंगला नाही, पण त्याच्या नावाने वानरांनी टाकलेले दगड मात्र तरंगत होते.  प्रत्यक्ष रामात कुठे सामर्थ्य होते ?  पण वानरांच्या रामावरील शुद्ध, निरतिशय श्रद्धेने व भक्तीने दगडही तरून गेले.

श्रद्धा व निष्ठा हीच ताकद व हेच सामर्थ्य !  या प्रचंड सामर्थ्याने अशक्यप्राय घटनाही सहज शक्य होतात.  मानवाला प्रदान केलेली मनाची शक्ति, श्रद्धा व निष्ठा ही सुद्धा परमेश्वराची संपत्ति आहे.  मानवाचे त्यात काही सुद्धा कर्तृत्व नाही.  तसेच विश्वही मानवाचे नाही.  मानवाला दिलेले सुंदर शरीर, इंद्रिय, मन, बुद्धि, विवेक व वैराग्य यांच्याबद्दल त्याने ईश्वराची कृतज्ञता मानावी व धन्य व्हावे.    
 

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
 

- हरी ॐ – 

Wednesday, September 11, 2013

विघ्नहर्ता - प्रतिबंधांच्यापासून रक्षण I Protection from Barriers

अव त्वं माम् |
 
श्रीगणेशाचा उपासक सर्व संकटांच्यापासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहे, कारण साधनेतील सर्व प्रतिबंध संकटांच्याप्रमाणेच असतात.  हे प्रतिबंध मनामध्ये साधनेच्या प्रतिकूल वृत्ति निर्माण करून सन्मार्गापासून परावृत्त करतात.  श्रद्धा व निष्ठा डळमळीत करतात.  त्यामुळे साधनेतील सातत्य नाहीसे होते.  म्हणून ही प्रार्थना आहे.  साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात –
 
पहिला प्रतिबंध – बाह्य विषय मोह निर्माण करतात.  त्यामुळे सारासार विवेक नाहीसा होऊन मनुष्यामध्ये विषयांची कामना निर्माण होते.  मन बहिर्मुख होते.  विषयाची व्याकुळता, विक्षेप निर्माण होतात.  मनाची अत्यंत तडफड होते आणि मनुष्य विषय उपभोगण्यासाठी वेडा होतो.
 
दुसरा प्रतिबंध – आपले शरीर व इंद्रिये.  इंद्रिये इतकी बलवान आहेत की, ती पुन्हा पुन्हा शरीराला अस्वस्थ करून व्याकूळ करतात.  पुन्हा पुन्हा वैषयिक उपभोगामध्ये प्रवृत्त करतात.
 
तिसरा प्रतिबंध – अनेक जन्मांच्यामध्ये मनावर झालेले विषयांचे संस्कार इतके प्रभावी असतात की, शास्त्राचे श्रवण, मनन करीत असताना, अनेक प्रसंगांच्या अनुषंगाने विषयांच्या वृत्ति पुन्हा पुन्हा मनामध्ये उफाळून येतात.  मन विक्षेपयुक्त, द्वन्द्वात्मक होऊन क्षुब्ध होते.  मनाचा तोल जातो.  विवेक नाहीसा होतो.  दैवीगुणसंपत्तीचा तात्कालिक नाश झाल्यासारखा दिसतो.
 
चवथा प्रतिबंध – अहंकार मनुष्याला कधीही संपूर्ण समर्पण होऊ देत नाही.  उपासना करताना किंवा ज्ञानसाधना करताना अहंकाराची सतत जाणीव होते.  ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.
 
म्हणून तत्त्वजिज्ञासु साधक, उपासक विघ्नहर्त्या श्रीगणेशाला या सर्व प्रतिबंधांच्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहे.  तसेच ज्ञाननिष्ठेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानवैराग्यप्राप्तीसाठी व अंतःकरणशुद्धीसाठी प्रार्थना करतो.

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010
 
 
 
 
- हरी ॐ –