Tuesday, January 26, 2021

द्वैतप्रपंचात अद्वयाची सिद्धि | Seeking Non-Dualism in Manifestation

 



जोपर्यंत द्वैतप्रपंचाची निवृत्ति होत नाही, तोपर्यंत मग “अद्वैत आहे”, असे कसे शक्य आहे ?  म्हणजेच द्वैतप्रपंचाचा अनुभव येत असताना अद्वय आत्म्याची सिद्धि कशी काय होऊ शकेल ?  प्रपंच जर वास्तविक स्वरूपाने सत्य असेल तर ही शंका योग्य आहे.  परंतु प्रपंच हा वस्तुतः अस्तित्वामध्येच नसल्यामुळे ही शंका योग्य नाही.

 

ज्याप्रमाणे दोरीमध्ये दिसणारा साप हा केवळ कल्पित, भासात्मक आहे.  त्याचप्रमाणे हा द्वैतप्रपंच पूर्णतः काल्पनिक आहे.  समजा द्वैतप्रपंच म्हणजेच अनुभवायला येणारा हा संसार वास्तविक अस्तित्वात असला असता, तर तो निश्चितपणे निवृत्त होणारच !  परंतु असे प्रत्यक्षात मात्र नाही.  दोरीमध्ये आपणास सर्पाचा भास होतो.  तो साप विवेकाने नाहीसा होतो, असे जरी म्हटले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही.  दोरीवरील सापाचे निर्माण होणे व सापाचे निरास होणे, हे दोन्हीही मिथ्याच आहे.  प्रत्यक्षामध्ये साप निर्माणही होत नाही व सापाचा निरासही होत नाही.  जो साप निर्माणच झाला नाही, अशा नसणाऱ्या सापाची निवृत्ति कशी बरे होईल ?

 

याचप्रमाणे प्रपंचाची स्थिति आहे.  जसे वस्तुतः सर्प नाहीच, तसेच वस्तुतः प्रपंच ही नाहीच.  जसे एखादा जादुगार प्रेक्षकांची नजरबंदी करून जादु करतो.  काही मायिक पदार्थ निर्माण करतो.  प्रेक्षकांना ते पदार्थ सत्य वाटतात.  मात्र नजरबंदी सुटल्यावर, जादूचे प्रयोग संपल्यावर ते मायिक पदार्थ दिसत नाहीत.  मग प्रेक्षक असे म्हणत नाहीत की, ते मायिक पदार्थ खरे होते आणि आता ते नाहीसे झाले.

 

त्याचप्रमाणे द्वैतप्रपंच हा दिसला तरीही तो मायामात्र, मायिक आहे.  जसे दोरी हीच सत्य आहे.  किंवा जादुगार मायावी पुरुषाची माया, मायिक पदार्थ हे असत्, भासमान असून मायावी पुरुष मात्र सत्य आहे.  त्यामुळे कोणत्याही प्रपंचाची निर्मिति होत नाही किंवा प्रपंचाची निवृत्ति सुद्धा होत नाही.  केवळ अद्वय परमात्मा हाच पारमार्थिक सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त दिसणारे सर्वच दृश्य द्वैतात्मक जगात हे मायिक, मायाकार्य, भासमान, असत् स्वरूपाचे आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Wednesday, January 20, 2021

तुरीय आत्मा – दुःख निवारक | Transcendental Being – Grief Annihilator

 



तुरीय आत्मा हा सर्व दुःखे निवृत्त करण्यास समर्थ आहे.  म्हणून त्याला ‘ईशान’ असे म्हटले जाते.  ‘ईशान’ म्हणजेच समर्थ होय.  तोच ‘प्रभु’ या शब्दांचाही अर्थ आहे.

 

प्रत्येक जीव जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था अनुभवत असतो.  या अवस्थांच्यामध्ये विश्व-तैजस्-प्राज्ञ यांच्याशी तादात्म्य पावून जीव अनेक प्रकारच्या दुःखांचा अनुभव घेतो.  या तीन्हीही अवस्था दुःखस्वरूप आहेत.  जागृत व स्वप्नामध्ये विषय व इंद्रिये यांचा संनिकर्ष होऊन दुःखाची प्राप्ति होत असते.  सतत आपल्यासमोर काहीना काहीतरी दुःख उभे राहते.  ही सर्व दुःखे सुषुप्ति अवस्थेमध्ये बीजरूपाने, कारणरूपाने अस्तित्वात असतात.  थोडक्यात या तीनही अवस्था दुःखस्वरूप आहेत.  मात्र तुरीय आत्मा या सर्व दुःखांचे निवारण करतो, म्हणून तो ईशान ‘प्रभु’ आहे.

 

तुरीयस्वरूप आत्म्याचे ज्ञान होताक्षणीच सर्व दुःखांची निवृत्ति होते.  कारण सर्व प्रकारची दुःखे ही अज्ञानामधून निर्माण होतात.  आत्मज्ञानाने अज्ञानाचाच नाश झाल्यामुळे अज्ञानजन्य दुःखांचाही निरास होतो.  तसेच तुरीय आत्मा हा अव्यय, व्ययरहित आहे.  तो स्वस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही.  त्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही.

 

तसेच हा तुरीयस्वरूप आत्मा अद्वयस्वरूप आहे.  जसे रज्जुमधील सर्प हा कल्पित, मिथ्या, अध्यस्त आहे.  सर्प धारा वगैरेदि भासांच्यामध्ये रज्जु जशी अद्वयस्वरूपाने राहते, त्याचप्रमाणे सर्व दृश्य पदार्थांच्यामध्ये तुरीय आत्मा अद्वयरूपाने, अभेदरूपाने स्थित राहतो.  तोच आत्मा ‘देव’ आहे.  द्योतनात्मकः इति देवः |  तुरीय आत्मा सर्व अवस्था, सर्व अध्यासाला प्रकाशमान करीत असल्यामुळे तोच प्रकाशस्वरूप, ‘देव’ आहे.  तो विश्व-तैजस्-प्राज्ञ या तीन चरणांपासून भिन्न असल्यामुळे तोच चतुर्थ म्हणजेच ‘तुरीय’ आत्मा असून तोच ‘विभु’ म्हणजे सर्वव्यापी आहे.  थोडक्यात तुरीय आत्मा हा सर्व दुःखांचे निवारण करणारा असून, अव्यय, अद्वय, प्रकाशस्वरूप, चतुर्थस्वरूप, सर्वव्यापी आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016




हरी ॐ -



Tuesday, January 12, 2021

जागृत-स्वप्न-सुषुपत्यावस्थेचे मिथ्यात्व | Futility of Wake-Dream-Sleep States

 



जागृतपुरुष, स्वप्नपुरुष, सुषुप्तपुरुष हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येत असताना रज्जूमधील सर्प वगैरेदि भासाप्रमाणे यांना असत्, मिथ्या, अध्यस्त का बरे मानावे ?  दोरीमधील सर्पाचा निरास झाल्यावर तो सर्प मिथ्या, असत् हे आम्हास मान्य आहे.  परंतु ‘अन्तःप्रज्ञ’ वगैरे यांना ‘असत्’ का मानावे ?

 

यावर आचार्य उत्तर देतात की, अन्तःप्रज्ञ-बहिष्प्रज्ञ-प्रज्ञानघन यांच्या ‘ज्ञ’ स्वरूपामध्ये म्हणजेच ज्ञातृत्वामध्ये भेद नसेल तरी यांच्यामध्ये रज्जुमध्ये भासमान होणाऱ्या साप, जलधारा वगैरेदि विकल्पांच्याप्रमाणेच एकमेकांचा व्यभिचार होत असतो.  दोरीमध्ये ज्याला सापाचा भास होतो त्याला तेथे पाण्याची धार दिसत नाही किंवा ज्याला पाण्याची धार दिसते, त्याला साप दिसत नाही.  येथे व्यभिचार आहे, म्हणजेच एकाचा भास होत असेल, तर तेथे दुसऱ्या भासाचा अभाव असतो.

 

त्याचप्रमाणे एकाच आत्मस्वरूपामध्ये अन्तःप्रज्ञ-बहिष्प्रज्ञ-प्रज्ञानघन यांचा भास होतो.  त्यावेळी त्यांच्या परस्परांच्यामध्ये व्यभिचार असतो.  ज्यावेळी आत्म्यामध्ये बहिष्प्रज्ञत्व असते तेव्हा तेथे अन्तःप्रज्ञत्व व प्रज्ञानघनत्व यांचा अभाव असतो.  जेव्हा अन्तःप्रज्ञत्व असते तेव्हा अन्य दोन्हींचा अभाव असतो.  तसेच जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था सुद्धा एकमेकांचा व्यभिचार करूनच उदयाला येतात.  स्वप्न-सुषुप्तीचा अभाव होऊन जागृतावस्था येते.  सुषुप्ति व जागृतीचा अभाव होऊन स्वप्नावस्था येते तर जागृत व स्वप्नाचा अभाव होऊन सुषुप्तिअवस्था येते.  एका अवस्थेचा भाव म्हणजेच दुसऱ्या दोन अवस्थांचा अभाव होय.  त्यामुळेच या सर्व अवस्था आणि अन्तःप्रज्ञ वगैरेदि आत्मे हे सर्व सर्पभ्रांतीप्रमाणेच मिथ्या, असत् स्वरूपाचे आहे, हे सिद्ध होते.

 

मात्र या सर्वांचे अधिष्ठान, तुरीय आत्मस्वरूप अव्यभिचारी असल्यामुळे तेच एकमेव सत्य आहे.  तुरीय आत्मस्वरूपाच्या ‘ज्ञ’ स्वरूपाचा कधीही, कोणत्याही अवस्थेमध्ये व्यभिचार, अभाव होत नाही.  म्हणूनच ते अव्यभिचारी स्वरूप आहे.  जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था येतात आणि जातात.  परंतु या सर्व अवस्थांच्यामध्ये नित्य-निरंतर, अखंडपणे, आत्मचैतन्यस्वरूप अव्यभिचारी स्वरूपाने विद्यमान असते.  तेच चैतन्यस्वरूप तीनही अवस्थांना प्रकाशमान करते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ




Thursday, January 7, 2021

रज्जुसर्पाचा विवेक | Rope-Snake Discrimination

 



ज्ञान हेच संसारनिवृत्तीचे यथायोग्य साधन आहे.  अन्य कोणतेही साधन नाही.  म्हणून जिज्ञासु साधकाने या मार्गामध्ये अन्य प्रमाणांचा विनाकारण शोध घेत बसू नये.  याचे कारण, जसे रज्जुसर्पाचा विवेक झाला की, त्याचवेळी रज्जुमधून सर्पाची निवृत्ति हे फल प्राप्त होताक्षणीच आपणास रज्जूचे ज्ञान होते.  आपण व्यवहारात ही गोष्ट अनेक वेळा अनुभवतो.  अंधुकशा प्रकाशात दोरी पडलेली असते.  ती पाहताक्षणी, हा साप आहे, असे आपल्याला वाटते.  ही कल्पना निर्माण होताक्षणीच आपल्या छातीत धस्स होते.  आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो.  सर्वांगाला घाम येतो.  आपण भीतिग्रस्त होतो.

 

त्यानंतर थोड्यावेळाने आपण त्या सापाचे निरीक्षण करायला लागतो.  खरच तो साप आहे की आणखी काही ?  निरखून काळजीपूर्वक पाहिले की, तो साप नाही.  हाच विवेकाचा उदय आहे.  या विवेकामुळे रज्जुमधील भासमान सर्पाची निवृत्ति होते.  हेच विवेकाचे फळ आहे.  सर्पभ्रमाची निवृत्ति झाली रे झाली की, आपोआपच अधिष्ठानाचे ज्ञान होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.  अध्यस्त वस्तूचा निरास होणे म्हणजेच अधिष्ठानाचे यथार्थ ज्ञान होणे होय.

 

त्याचप्रमाणे येथे अन्तःप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ, प्रज्ञानघन असे एकाच आत्म्याचे तीन विकल्प सांगितले.  या तिन्हीही अध्यस्त आत्म्यांचा निरास होणे म्हणजेच तुरीय आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे होय.  या अध्यासाचा निरास करण्यासाठी विवेकाची प्रक्रिया आवश्यक आहे.  तसेच ही विवेकप्रक्रिया स्वतःच्या बुद्धीने करावयाची नाही.  कारण आपली बुद्धि ही मर्यादित व रागद्वेषादि दोषांनी युक्त आहे.

 

म्हणून वेदांतशास्त्राच्या प्रमाणाच्या साहाय्यानेच साधकाने हा विवेक करावा.  वेदांतशास्त्रप्रमाणजनित विवेकाच्या साहाय्याने अध्यासाचा निरास केला की, अधिष्ठानभूत असणारे चतुर्थ, तुरीय, निर्विशेष, शुद्ध आत्मचैतन्यस्वरूप प्रकट होते.  

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ




Tuesday, December 29, 2020

अभ्यासयोग | Meaning of “Abhyas Yog”

 



अभ्यास म्हणजे काय ?  ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा त्या विषयाची पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक आवृत्ति करणे होय.  म्हणजे त्याच स्वरूपाची अप्रतिबद्ध, अखंड वृत्ति निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  येथे अभ्यासाचा विषय आहे निर्गुण, निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूप !  त्याच्या अभ्यासासाठी प्रथम साधकाने आपल्या चित्तवृत्ति सर्व विषयांच्यापासून निवृत्त केल्या पाहिजेत.  साधकाने आपले मन भूतकाळातील प्रसंग आणि विषयांच्या आठवणीने क्षुब्ध न करता आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या प्रसंगांनी चिंताग्रस्त न होता संपूर्ण निवृत्त करावे.

 

साधकाने तीव्र विवेकजन्य वैराग्याचा अभ्यास करावा.  विवेकाच्या साहाय्याने विषयांच्या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषय हे अनित्य, नाशवान असून सुखसंवर्धन करण्याऐवजी दुःखालाच कारण होतात.  ते मनुष्याला शृंखलाप्रमाणे आसक्ति निर्माण करून बद्ध करतात.  हे समजेल, उमजेल त्याचवेळी विषयांची तृष्णा कमी होईल.  या सर्व मानसिक बंधनामधून, संसारामधून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे.  थोडक्यात तीव्र वैराग्य आणि तीव्र मुमुक्षुत्वाची आवश्यकता आहे.

 

अशा अंतर्मुख, विवेकवैराग्यसंपन्न आणि एकाग्र चित्ताने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  सद्गुरू हेच संसारामधून मुक्त करून मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त करून देणारे आहेत.  तेच उद्धार करणारे आहेत.  म्हणून त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून अनन्य भावाने त्यांची काया-वाचा-मनाने अखंड सेवा करावी.  साधकाचे मन संपूर्ण गुरुमय झाले पाहिजे.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हीच सेवा आणि गुरु हीच उपासना.  अशा प्रकारच्या प्रदीर्घ सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे चित्तामध्ये आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण होते आणि अनात्मवृत्ति हळूहळू गळून पडते.

 

स्वयंप्रकाशमान, निर्गुण, निराकार, जन्ममृत्युरहित, सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारा पुरुष प्राणरहित, मनरहित, अत्यंत शुद्ध असून अव्यक्तस्वरूप असलेल्या अज्ञानाच्याही पलीकडे आहे.  तमसः परमुच्यते |  तो अज्ञानाच्या पलीकडे असलेला पुरुष ‘मी’ आहे.  याप्रकारे अभ्यासाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अनात्मवृत्तीचा – देहात्मभावाचा तसेच अहंकार-ममकाराचा त्याग करून आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण करावी.  यालाच अभ्यास, योग असे म्हटले आहे.  

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, December 22, 2020

अंतःकाळी परमेश्वराचे स्मरण | Remembering God at the End

 



जो यति अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करून देहत्याग करतो, तो परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होतो.  येथे या विधानाचा शाब्दिक अर्थ घेता येणार नाही.  अंतकाळी केवळ मुखाने ‘नारायण’ किंवा ‘श्रीराम’ वगैरे शब्द उच्चारणे म्हणजे परमेश्वराचे स्मरण होत नाही.  स्मरण करणे हे ओठांचे कार्य नाही तर मनाचे लक्षण आहे.  म्हणून स्मरण करतेवेळी ज्या विषयांचे आपण स्मरण करतो त्या विषयाची वृत्ति अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे.  तरच ते स्मरण होऊ शकते.

 

अज्ञात वस्तूचे कधीही स्मरण करता येत नाही.  जी वस्तु आयुष्यामध्ये कधीही अनुभवलेली नाही किंवा ज्या वस्तूचे ज्ञान नाही, अशा वस्तूचे स्मरण करता येत नाही.  अंतकाळी परमेश्वराचे नाम ओठावर आले म्हणजे मोक्ष मिळतो असे नाही, तर त्या नामाचा मनावर संस्कार व्हावा लागतो.  आत्यंतिक ओढ, निरतिशय प्रेम असल्याशिवाय कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची अगर विषयाची तळमळ मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही.

 

अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करण्यापूर्वी त्यापूर्वी जन्मभर अखंडपणे परमेश्वराबद्दल आत्यंतिक ओढ, निस्सीम प्रेम निर्माण होणे आवश्यक आहे.  तरच अंतकाळी परमेश्वराचे स्मरण होऊ शकेल.  म्हणून परमेश्वर हाच शाश्वत, नित्य असून अन्य सर्व विषय अनित्य, नाशवान असल्यामुळे परमेश्वरावरच प्रेम करावे.  पूजन, भजन कीर्तन, सेवा यामधून जन्मभर परमेश्वराचे प्रेम, भक्ति उत्कर्षित करण्याचा अभ्यास करावा.  यासाठीच महात्म्यांचा किंवा ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  या सर्वांचा परिपाक म्हणजे अन्य सर्व विषयांविषयी तुच्छ वृत्ति निर्माण होऊन परमेश्वराच्या स्वरूपाची वृत्ति दृढ व्हावयाला लागेल.  काया-वाचा-मनाने नित्य-निरंतर परमेश्वराचा ध्यास लागेल आणि अंतकाळी अनायासाने परमेश्वराचे स्मरण होऊ शकेल.

 

सद्गुरूंच्या कृपेने वेदान्तशास्त्राच्या उपदेशाचे एकाग्र चित्ताने श्रवण करावे आणि मननाने सर्व संशायांचा निरास करावा.  ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ ही वृत्ति दृढ करावी.  याचा परिपाक म्हणजे स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक सुस्थिति प्राप्त होते.  असाच यति अंतकाळी अभेदरूपाने स्मरण करून शरीराचा त्याग करतो आणि माझ्या स्वरूपाला म्हणजेच निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो.  त्याला विदेहकैवल्य प्राप्त होते.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, December 15, 2020

अध्यात्म म्हणजे काय ? | Meaning of “Adhyatma”

 



ज्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडाला सूर्य प्रकाशमान करतो.  त्याप्रमाणे देहापासून बुद्धिपर्यंत सर्व प्रकाशमान करण्यासाठी अधिष्ठानस्वरूपाने जो राहातो त्याला ‘अध्यात्म’ म्हणतात.  किंवा – आत्मानं देहं अधिकृत्य प्रत्यगात्मतया प्रवृत्तं परमार्थब्रह्मावसानं वस्तु स्वभावः अध्यात्मम् उच्यते |  आत्म्याला म्हणजेच शरीराला आश्रय करून प्रत्यगात्मस्वरूपाने जो राहातो आणि शेवटी पारमार्थिक ब्रह्मस्वरूपच आहे, त्याला अध्यात्म म्हटले जाते.  यावरूनच अध्यात्मविद्या किंवा अध्यात्मशास्त्र हे शब्द प्रचलित झाले.

 

आत्मानं अधिकृत्य प्रत्यगात्मतया यत् प्रवृत्तं विद्या सा अध्यात्मविद्या |  जी विद्या आत्म्याचा म्हणजे शरीराचा आश्रय घेऊन प्रत्यगात्मस्वरूपाच्या वस्तूचे ज्ञान देते, त्या विद्येला अध्यात्मविद्या म्हणतात.  म्हणून अध्यात्म म्हणजे शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, अहंकार किंवा अज्ञान नाही, तर या सर्वांच्या पलीकडे असलेले स्वयंप्रकाशमान प्रत्यगात्मस्वरूप होय.  ते स्वरूप प्रकट करण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे.

 

शरीर हे स्वभावतः जड, अचेतन आहे.  या जड प्रकृतीला, कार्यकारणसंघाताला चेतना देण्यासाठी जो शरीरामध्ये आहे, परंतु जो शरीरापासून भिन्न आहे, तो कार्यकारणसंघाताचा एक अवयव किंवा भाग होत नाही.  तो सर्वांच्यापासून भिन्न आहे.  त्याच्या केवळ सत्तेमुळे अंतःकरणाला सत्ता आणि स्फूर्ति किंवा चेतना मिळते.  हे चेतनयुक्त अंतःकरण स्थूल शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे शरीराला चेतना मिळते.  शरीर जिवंत असल्यासारखे वाटते.  तप्यायः पिण्डवत् |  ज्याप्रमाणे लोखंडाचा थंड, अचेतन गोळा अग्नीच्या संसर्गामुळे तेजःपुंज दिसतो.  त्याचप्रमाणे अचेतन, जड शरीराला जो चेतना देणारा आहे, तो प्रत्यगात्मा म्हणजेच अध्यात्म होय.  म्हणून अध्यात्म हे करावयाचे नसते, जाणवायचे असते.

 

अध्यात्म हेच परब्रह्माचे स्वरूप आहे.  स्वभाव आहे.  स्वभाव म्हणजेच अध्यात्म.  स्वस्य आत्मनः भावः इति स्वभावः |  स्वतःच्या स्वरूपाच्या भाव म्हणजे स्वभाव होय.  जो स्वयंसिद्ध असतो तोच स्वभाव आहे आणि जो स्वभाव आहे तेच स्वरूप असते.  तेच तत्त्व सर्वांच्या हृदयामध्ये समाविष्ट आहे.  

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ