जोपर्यंत द्वैतप्रपंचाची निवृत्ति होत नाही,
तोपर्यंत मग “अद्वैत आहे”, असे कसे शक्य आहे ? म्हणजेच द्वैतप्रपंचाचा अनुभव येत असताना अद्वय
आत्म्याची सिद्धि कशी काय होऊ शकेल ? प्रपंच जर वास्तविक स्वरूपाने सत्य असेल तर ही
शंका योग्य आहे. परंतु प्रपंच हा वस्तुतः
अस्तित्वामध्येच नसल्यामुळे ही शंका योग्य नाही.
ज्याप्रमाणे दोरीमध्ये दिसणारा साप हा केवळ
कल्पित, भासात्मक आहे. त्याचप्रमाणे हा
द्वैतप्रपंच पूर्णतः काल्पनिक आहे. समजा
द्वैतप्रपंच म्हणजेच अनुभवायला येणारा हा संसार वास्तविक अस्तित्वात असला असता, तर
तो निश्चितपणे निवृत्त होणारच ! परंतु असे
प्रत्यक्षात मात्र नाही. दोरीमध्ये आपणास
सर्पाचा भास होतो. तो साप विवेकाने नाहीसा
होतो, असे जरी म्हटले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. दोरीवरील सापाचे निर्माण होणे व सापाचे निरास
होणे, हे दोन्हीही मिथ्याच आहे. प्रत्यक्षामध्ये
साप निर्माणही होत नाही व सापाचा निरासही होत नाही. जो साप निर्माणच झाला नाही, अशा नसणाऱ्या
सापाची निवृत्ति कशी बरे होईल ?
याचप्रमाणे प्रपंचाची स्थिति आहे. जसे वस्तुतः सर्प नाहीच, तसेच वस्तुतः प्रपंच
ही नाहीच. जसे एखादा जादुगार
प्रेक्षकांची नजरबंदी करून जादु करतो. काही
मायिक पदार्थ निर्माण करतो. प्रेक्षकांना
ते पदार्थ सत्य वाटतात. मात्र नजरबंदी
सुटल्यावर, जादूचे प्रयोग संपल्यावर ते मायिक पदार्थ दिसत नाहीत. मग प्रेक्षक असे म्हणत नाहीत की, ते मायिक
पदार्थ खरे होते आणि आता ते नाहीसे झाले.
त्याचप्रमाणे द्वैतप्रपंच हा दिसला तरीही तो
मायामात्र, मायिक आहे. जसे दोरी हीच सत्य
आहे. किंवा जादुगार मायावी पुरुषाची माया,
मायिक पदार्थ हे असत्, भासमान असून मायावी पुरुष
मात्र सत्य आहे. त्यामुळे कोणत्याही
प्रपंचाची निर्मिति होत नाही किंवा प्रपंचाची निवृत्ति सुद्धा होत नाही. केवळ अद्वय परमात्मा हाच पारमार्थिक सत्य
आहे. त्याव्यतिरिक्त दिसणारे सर्वच दृश्य
द्वैतात्मक जगात हे मायिक, मायाकार्य, भासमान, असत् स्वरूपाचे आहे.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, December 2016
- हरी ॐ–