जो यति अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करून देहत्याग
करतो, तो परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होतो. येथे या विधानाचा शाब्दिक अर्थ घेता येणार नाही.
अंतकाळी केवळ मुखाने ‘नारायण’ किंवा ‘श्रीराम’
वगैरे शब्द उच्चारणे म्हणजे परमेश्वराचे स्मरण होत नाही. स्मरण करणे हे ओठांचे कार्य नाही तर मनाचे लक्षण
आहे. म्हणून स्मरण करतेवेळी ज्या
विषयांचे आपण स्मरण करतो त्या विषयाची वृत्ति अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. तरच ते स्मरण होऊ शकते.
अज्ञात वस्तूचे कधीही स्मरण करता येत नाही. जी वस्तु आयुष्यामध्ये कधीही अनुभवलेली नाही
किंवा ज्या वस्तूचे ज्ञान नाही, अशा वस्तूचे स्मरण करता येत नाही. अंतकाळी परमेश्वराचे नाम ओठावर आले म्हणजे
मोक्ष मिळतो असे नाही, तर त्या नामाचा मनावर संस्कार व्हावा लागतो. आत्यंतिक ओढ, निरतिशय प्रेम असल्याशिवाय
कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची अगर विषयाची तळमळ मनामध्ये निर्माण होऊ शकत
नाही.
अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करण्यापूर्वी
त्यापूर्वी जन्मभर अखंडपणे परमेश्वराबद्दल आत्यंतिक ओढ, निस्सीम प्रेम निर्माण
होणे आवश्यक आहे. तरच अंतकाळी परमेश्वराचे
स्मरण होऊ शकेल. म्हणून
परमेश्वर हाच शाश्वत, नित्य असून अन्य सर्व विषय अनित्य, नाशवान असल्यामुळे
परमेश्वरावरच प्रेम करावे. पूजन, भजन
कीर्तन, सेवा यामधून जन्मभर परमेश्वराचे प्रेम, भक्ति उत्कर्षित करण्याचा अभ्यास
करावा. यासाठीच महात्म्यांचा किंवा ईश्वरनिष्ठ
पुरुषांचा संग करावा. या सर्वांचा परिपाक
म्हणजे अन्य सर्व विषयांविषयी तुच्छ वृत्ति निर्माण होऊन परमेश्वराच्या स्वरूपाची
वृत्ति दृढ व्हावयाला लागेल. काया-वाचा-मनाने
नित्य-निरंतर परमेश्वराचा ध्यास लागेल आणि अंतकाळी अनायासाने परमेश्वराचे स्मरण
होऊ शकेल.
सद्गुरूंच्या कृपेने वेदान्तशास्त्राच्या
उपदेशाचे एकाग्र चित्ताने श्रवण करावे आणि मननाने सर्व संशायांचा निरास करावा. ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘सर्वं खल्विदं
ब्रह्म’ ही वृत्ति दृढ करावी. याचा
परिपाक म्हणजे स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक सुस्थिति प्राप्त होते. असाच यति अंतकाळी अभेदरूपाने स्मरण करून शरीराचा
त्याग करतो आणि माझ्या स्वरूपाला म्हणजेच निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूपाला
प्राप्त होतो. त्याला विदेहकैवल्य
प्राप्त होते.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–