Showing posts with label Transcendental. Show all posts
Showing posts with label Transcendental. Show all posts

Tuesday, July 21, 2026

सत् , असत् की अतीत ? | Real, Apparent Or Transcendental?

 




ज्यावेळी चैतन्य हे 'अहं' वृत्तीने युक्त होते, त्यावेळी त्याला 'जीव' अशी संज्ञा मिळते.  ज्यावेळी चैतन्य समुद्रामधील तरंगांच्याप्रमाणे विविध संकल्प, विकल्प, अनेक भ्रम यांच्या रूपाने स्फुरण पावते, त्यावेळी त्याला 'जग' असे म्हणतात.  चैतन्यमधून संकल्पविकल्पादि भ्रम निर्माण झालेले आहेत.  चैतन्यामधूनच सर्व विषयवृत्ति निर्माण होतात.  पदार्थ किंवा जग म्हणजे जणु काही चैतन्यला मिळालेले आकार आहेत.  म्हणून घटचैतन्य, पटचैतन्य, सूर्यचैतन्य असे सर्व जगच चैतन्यमय आहे.  दिसते ते सर्वच चैतन्य आहे.  चैतन्यापासून कोणताही पदार्थ भिन्न नाही किंवा चैतन्यापासून दूर ही नाही.  म्हणून विषय पाहणे म्हणजे चैतन्याचेच दर्शन आहे.  याप्रमाणे सर्वच चैतन्यस्वरूप आहे.

 

हे रामा !  या सृष्टीच्या पूर्वी चैतन्यच अस्तित्वामध्ये होते.  तेच चैतन्य सृष्टीचे कारण बनून सृष्टीच्या प्रारंभी सृष्टीची लीला निर्माण करते.  स्वतःमध्येच सृष्टि निर्माण करते.  म्हणजे चैतन्य स्वतःमध्येच विश्वरूपाने व्यक्त होते.  मात्र सृष्टि निर्माण झाल्यानंतरही चैतन्यामध्ये कोणताही बदल किंवा परिणाम होत नाही.  जसे दोरीमधून साप निर्माण होताना दोरीमध्ये कोणताही बदल होत नाही.  दोरी हालत नाही किंवा विषारीही होत नाही.  दोरी ही दोरीच राहते.  मात्र दोरी तिच्या स्वरूपामध्ये सर्परूपाने भासमान होते.  दोरीमध्ये दिसणारा सर्प हा वस्तुतः असत् असूनही सत् असल्यासारखा आपल्याला भासतो.

 

त्याचप्रमाणे जीव व जग हे प्रत्यक्ष असत् असूनही सत् असल्यासारखे भासते.  खरे तर त्याला सत् ही म्हणता येत नाही आणि असत् ही म्हणता येत नाही.  आत्मज्ञानाच्या प्रभावाने चैतन्य आपल्या जगद्रूपाचा स्वतःच निरास करते.  म्हणजे ज्ञानाने जगद्रूप चैतन्याचा निरास होऊन अधिष्ठानरूप चैतन्य शिल्लक राहते.  म्हणून चैतन्यस्वरूप हे सत् आणि असत् या दोन्हींच्या अतीत असून दोन्हींच्याही आत अधिष्ठानस्वरूपाने आहे.  याचे कारण जग आहे असे म्हणावे तर जगाचा निरास होतो आणि नाही असे म्हणावे तर हे जग डोळ्यांना दिसते.  म्हणून संस्कृतमध्ये म्हटले जाते - सत् चेत् न बाधेत असत् चेत् न प्रतीयेत |  वस्तु सत् स्वरूप असेल तर तिचा कधी निरास होत नाही आणि वस्तु असत् असेल तर त्याचा कधीही अनुभव येत नाही.  म्हणून विश्वरूपी असणारे चैतन्य हे सत् ही नाही आणि असत् ही नाही, तर ते या दोन्हींचेही अधिष्ठान आहे.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–


Tuesday, October 3, 2023

वैषयिक आणि निर्वैषयिक आनंद | Materialistic & Transcending Bliss

 



वसिष्ठ मुनि वैषयिक आनंद आणि निर्विषयक आनंद यामधील फरक सांगतात.  अज्ञानी मनुष्य मनामध्ये इंद्रजाल निर्माण करतो.  विषय पाहिले रे पाहिले की, जो विषय त्याला आवडतो तो त्याला हवाहवासा वाटतो.  त्या विषयाच्या दर्शनानेच मनामध्ये सुखवृत्ति निर्माण होते.  नंतर प्रयत्नाने तो विषय मिळविल्यावर म्हणजे तो विषय माझ्या मालकीचा झाल्यावर आणखी थोडे जास्त सुख मिळते.  त्यानंतर त्या विषयाचा प्रत्यक्ष उपभोग घेतल्यानंतर त्याहीपेक्षा जास्त सुख मिळते.

 

परंतु असा एक विषयभोग भोगल्यानंतर मनुष्य तृप्त न होता दुसऱ्या विषयाची तृष्णा त्याच्या मनामध्ये निर्माण होते.  यावरून समजते की, विषय मनुष्याला कधीही पूर्ण सुखी किंवा पूर्ण तृप्त करू शकत नाहीत.  तसेच वैषयिक आनंद हा तरतमभावाने युक्त असतो.  म्हणजेच त्याचे प्रमाण कमी-अधिक होत असते.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैषयिक सुख हे येणारे-जाणारे, अनित्य व क्षणभंगुर असते.

 

ज्ञानी पुरुषाला मिळणारे निर्विषयक सुख मात्र विषयांच्यामधून निर्माण झालेले नसते.  त्यामुळे तो आनंद कमी-जास्त किंवा येणार-जाणारा नसतो.  तर ते सुख सर्व बाजूंनी परिपूर्ण स्वरूपाचे असते.  ते मिळाल्यानंतर आनंद मिळविण्यासाठी दुसरे काहीही करण्याची आवश्यकता राहत नाही.  ज्ञानी पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपामध्ये आनंदाने राहतो.

 

जसे पावसाळ्यात विहिरी, नद्या तलाव, पाण्याने भरून गेले व पाणी आपल्या दाराशीच आले, तर हातात कळशी घेऊन पाण्यासाठी कोणीही बाहेर जात नाही.  तसेच जो ज्ञानी पुरुष अंतरंगाने सुखस्वरूप झालेला असतो.  ज्याला सुखाचा सागर प्राप्त झालेला आहे, तो सुख मिळविण्यासाठी कोणत्याही बाह्य विषय किंवा उपभोगांमध्ये प्रवृत्त होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ–



Wednesday, January 20, 2021

तुरीय आत्मा – दुःख निवारक | Transcendental Being – Grief Annihilator

 



तुरीय आत्मा हा सर्व दुःखे निवृत्त करण्यास समर्थ आहे.  म्हणून त्याला ‘ईशान’ असे म्हटले जाते.  ‘ईशान’ म्हणजेच समर्थ होय.  तोच ‘प्रभु’ या शब्दांचाही अर्थ आहे.

 

प्रत्येक जीव जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था अनुभवत असतो.  या अवस्थांच्यामध्ये विश्व-तैजस्-प्राज्ञ यांच्याशी तादात्म्य पावून जीव अनेक प्रकारच्या दुःखांचा अनुभव घेतो.  या तीन्हीही अवस्था दुःखस्वरूप आहेत.  जागृत व स्वप्नामध्ये विषय व इंद्रिये यांचा संनिकर्ष होऊन दुःखाची प्राप्ति होत असते.  सतत आपल्यासमोर काहीना काहीतरी दुःख उभे राहते.  ही सर्व दुःखे सुषुप्ति अवस्थेमध्ये बीजरूपाने, कारणरूपाने अस्तित्वात असतात.  थोडक्यात या तीनही अवस्था दुःखस्वरूप आहेत.  मात्र तुरीय आत्मा या सर्व दुःखांचे निवारण करतो, म्हणून तो ईशान ‘प्रभु’ आहे.

 

तुरीयस्वरूप आत्म्याचे ज्ञान होताक्षणीच सर्व दुःखांची निवृत्ति होते.  कारण सर्व प्रकारची दुःखे ही अज्ञानामधून निर्माण होतात.  आत्मज्ञानाने अज्ञानाचाच नाश झाल्यामुळे अज्ञानजन्य दुःखांचाही निरास होतो.  तसेच तुरीय आत्मा हा अव्यय, व्ययरहित आहे.  तो स्वस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही.  त्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही.

 

तसेच हा तुरीयस्वरूप आत्मा अद्वयस्वरूप आहे.  जसे रज्जुमधील सर्प हा कल्पित, मिथ्या, अध्यस्त आहे.  सर्प धारा वगैरेदि भासांच्यामध्ये रज्जु जशी अद्वयस्वरूपाने राहते, त्याचप्रमाणे सर्व दृश्य पदार्थांच्यामध्ये तुरीय आत्मा अद्वयरूपाने, अभेदरूपाने स्थित राहतो.  तोच आत्मा ‘देव’ आहे.  द्योतनात्मकः इति देवः |  तुरीय आत्मा सर्व अवस्था, सर्व अध्यासाला प्रकाशमान करीत असल्यामुळे तोच प्रकाशस्वरूप, ‘देव’ आहे.  तो विश्व-तैजस्-प्राज्ञ या तीन चरणांपासून भिन्न असल्यामुळे तोच चतुर्थ म्हणजेच ‘तुरीय’ आत्मा असून तोच ‘विभु’ म्हणजे सर्वव्यापी आहे.  थोडक्यात तुरीय आत्मा हा सर्व दुःखांचे निवारण करणारा असून, अव्यय, अद्वय, प्रकाशस्वरूप, चतुर्थस्वरूप, सर्वव्यापी आहे.

 

 

- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016




- हरी ॐ -