Showing posts with label Abhyas. Show all posts
Showing posts with label Abhyas. Show all posts

Tuesday, December 17, 2024

अभ्यास योगाची साधना | Means of “Abhyas Yog”

 




प्रत्येक साधक हा धार्मिक, श्रद्धावान, आध्यात्मिक असेल तरीही त्याचे मन परमेश्वरामध्ये लगेचच एकाग्र होत नाही.  याचे कारण आज मनामध्ये अनेक विषयांच्याच वृत्ति आहेत.  अजुनही मनामध्ये विषयांच्याबद्दल प्रचंड मोठे आकर्षण आहे.  विषयांचे महत्व आहे.  यामुळे विषयांच्यामध्ये सत्यत्वबुद्धि निर्माण होऊन मनामध्ये कामना निर्माण होतात.  पुन्हा पुन्हा ते मन विषयांच्यामध्ये रुळते, रममाण होते.  यामुळे परमेश्वरामध्ये मन एकाग्र करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये अनेक प्रतिबंध निर्माण होतात.  यासाठीच भगवान या श्लोकात ‘अभ्यासयोगाची’ साधना देतात.

 

मग अभ्यासयोग म्हणजे काय ?  आचार्य सांगतात –

विपरीतप्रत्ययान्तिरस्कृत्य सजातीयप्रत्ययावृत्तिरभ्यासः |  सर्व विपरीत - विजातीय वृत्तींचा निरास करून जाणीवपूर्वक, सातत्याने, अखंडपणे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  भगवान म्हणतात -

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् |

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ||                    (गीता अ. ६-२६)

जसजसे मन विषयांच्याकडे जाईल तसतसे त्यावर नियंत्रण करावे.  केवळ मन दाबून, ओढून एकाग्र होत नाही.  तर त्यासाठी विवेकाने विषयदोषदर्शन करावे.  म्हणजेच विषयांच्या अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं, मिथ्यात्वं या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषयांचे खरे स्वरूप पाहावे.  यामुळे मन आपोआपच त्यांच्यापासून निवृत्त होईल.  त्या त्या प्रमाणात विषयांचे संस्कार कमी होतील.

 

या संस्कारांचा प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराच्या उपासनेचा संस्कार वाढवावा.  जाणीवपूर्वक, सावधानतेने, मनाला विषयासक्तीमधून निवृत्त करून उपासना करावी.  परमेश्वराची वृत्ति पुन्हा-पुन्हा निर्माण करावी.  सुरुवातीला खूप अवघड वाटेल.  यामध्ये विषयांच्या वृत्ति आल्यामुळे विरल चिंतन होईल.  परंतु सातत्याने दीर्घकाळ उपासना केल्यानंतर सरलचिंतन होऊन परमेश्वराचीच वृत्ति म्हणजे सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण होईल.  यालाच ‘अभ्यास’ असे म्हटले आहे.  या अभ्यासयोगामुळे क्रमाने चित्तशुद्धि होऊन ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–



Tuesday, December 29, 2020

अभ्यासयोग | Meaning of “Abhyas Yog”

 



अभ्यास म्हणजे काय ?  ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा त्या विषयाची पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक आवृत्ति करणे होय.  म्हणजे त्याच स्वरूपाची अप्रतिबद्ध, अखंड वृत्ति निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  येथे अभ्यासाचा विषय आहे निर्गुण, निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूप !  त्याच्या अभ्यासासाठी प्रथम साधकाने आपल्या चित्तवृत्ति सर्व विषयांच्यापासून निवृत्त केल्या पाहिजेत.  साधकाने आपले मन भूतकाळातील प्रसंग आणि विषयांच्या आठवणीने क्षुब्ध न करता आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या प्रसंगांनी चिंताग्रस्त न होता संपूर्ण निवृत्त करावे.

 

साधकाने तीव्र विवेकजन्य वैराग्याचा अभ्यास करावा.  विवेकाच्या साहाय्याने विषयांच्या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषय हे अनित्य, नाशवान असून सुखसंवर्धन करण्याऐवजी दुःखालाच कारण होतात.  ते मनुष्याला शृंखलाप्रमाणे आसक्ति निर्माण करून बद्ध करतात.  हे समजेल, उमजेल त्याचवेळी विषयांची तृष्णा कमी होईल.  या सर्व मानसिक बंधनामधून, संसारामधून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे.  थोडक्यात तीव्र वैराग्य आणि तीव्र मुमुक्षुत्वाची आवश्यकता आहे.

 

अशा अंतर्मुख, विवेकवैराग्यसंपन्न आणि एकाग्र चित्ताने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  सद्गुरू हेच संसारामधून मुक्त करून मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त करून देणारे आहेत.  तेच उद्धार करणारे आहेत.  म्हणून त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून अनन्य भावाने त्यांची काया-वाचा-मनाने अखंड सेवा करावी.  साधकाचे मन संपूर्ण गुरुमय झाले पाहिजे.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हीच सेवा आणि गुरु हीच उपासना.  अशा प्रकारच्या प्रदीर्घ सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे चित्तामध्ये आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण होते आणि अनात्मवृत्ति हळूहळू गळून पडते.

 

स्वयंप्रकाशमान, निर्गुण, निराकार, जन्ममृत्युरहित, सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारा पुरुष प्राणरहित, मनरहित, अत्यंत शुद्ध असून अव्यक्तस्वरूप असलेल्या अज्ञानाच्याही पलीकडे आहे.  तमसः परमुच्यते |  तो अज्ञानाच्या पलीकडे असलेला पुरुष ‘मी’ आहे.  याप्रकारे अभ्यासाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अनात्मवृत्तीचा – देहात्मभावाचा तसेच अहंकार-ममकाराचा त्याग करून आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण करावी.  यालाच अभ्यास, योग असे म्हटले आहे.  

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–