Showing posts with label Sleep. Show all posts
Showing posts with label Sleep. Show all posts

Tuesday, May 13, 2025

योगी पुरुषाची अंतरंगाची अवस्था | Internal State Of A Yogi

 



योगी पुरुष हा व्यवहार करूनही सुषुप्तीप्रमाणे शांत असतो.  कारण सर्व दृश्यरूपी आभास जेथून उत्पन्न होतात, अशा आभासरहित ब्रह्मामध्ये तो स्थित असतो.  योगी पुरुष बहिरंगाने शरीर, इंद्रियादि उपाधींच्या साहाय्याने सर्व प्रकारचे व्यवहार करीत असतो.  परंतु त्याची बुद्धि मात्र एकाद्या झोपलेल्या मनुष्याप्रमाणे अत्यंत शांत असते.

 

ज्याला शांत झोप लागली आहे, अशा मनुष्यांच्या जागृत व स्वप्नामधील व्यवहार पूर्णतः थांबलेला असतो.  गाढ झोपलेल्या मनुष्याला कोणतेही विकार सतावत नाहीत.  त्याला बाह्य विषयांचे भान राहत नाही.  कामक्रोधादींचा प्रभाव क्षीण होतो. झोपल्यावर अहंकार आणि ममकारही राहत नाही.  बाह्य विषयांची तसेच स्वतःच्या शरीराची सुद्धा जाणीव संपते.

 

अशा या सुप्त मनुष्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषांची अंतरंगाची अवस्था असते.  त्यामुळे ज्ञानी पुरुष बाहेरून व्यवहार करीत असेल तरी त्याची बुद्धि मात्र अतिशय शांत व निर्विकार असते.  याचे कारण त्याचे मन ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित असते.  खरे तर ब्रह्मस्वरूपामधूनच सर्व आभास म्हणजे सर्व दृश्य, समष्टि विश्व आणि व्यष्टि जीव उत्पन्न होतात.  परंतु तरीही ब्रह्मस्वरूप मात्र निराभास म्हणजे आभासरहित, विकाररहित असते.  दृश्य जगताचा कोणताही परिणाम ब्रह्मस्वरूपावर होत नाही.  अशा या निर्विकार चैतन्यामध्ये ज्ञानी पुरुष नित्यनिरंतर स्थिर झाल्यामुळे बहिरंगाने सर्व क्रिया करूनही तो निष्क्रिय, निर्विकार, अलिप्त व अस्पर्शित राहतो.  हाच येथे अभिप्राय आहे. 

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–




Monday, April 29, 2024

अविचाररूपी निद्रा | The Stupor of Indiscrimination

 



हे राघवा !  अविचाररूपी निद्रा ही काजळाप्रमाणे काळी असून तिच्यामध्ये मदिरेचे धर्म आहेत.  म्हणून हे रामा !  तुझ्यामधून अशा निद्रेचा नाश होवो.  जसे मनुष्याला झोपेमध्ये काहीच कळत नाही, तसेच अविचार ही सुद्धा मनुष्याला दीर्घकाळ लागलेली निद्रा आहे.  एक वेळ रोजची झोप बरी !  कारण त्यामधून सकाळी मनुष्य जागृत होतो.  परंतु अविचाररूपी निद्रेमध्ये झोपलेल्या मनुष्याला असे वाटत असते की, आपल्याला सर्व काही समजते.  परंतु वस्तुतः त्याला काहीही समजत नसते.  अशी ही निद्रा काजळाप्रमाणे अत्यंत गडद म्हणजे अंधारमय, अज्ञानमय आहे.  तसेच मदिरेचे सर्व गुणधर्म या अविचाररूपी निद्रेमध्ये आहेत.  मदिरा प्याली की, जसे मनुष्याला धुंदी चढते, त्याला कसलीच शुद्ध राहत नाही.  मनुष्य विवेकभ्रष्ट झाल्यामुळे आपण काय बोलतो, काय करतो, याचे भान त्याला राहत नाही.  असे आचरण अविचारी पुरुषाचे असते.  म्हणून साधकामध्ये अविचाराचा एक अंश सुद्धा राहू नये.

 

विचाररहित, अज्ञानी मनुष्यामध्ये पुरुषाची बुद्धि अतिशय विकल, अशक्त होते.  बुद्धिमान पुरुषाच्या अंतःकरणामध्ये विवेकरूपी चंद्रप्रकाशामुळे सर्वच स्पष्ट दिसते.  परंतु अविचारी मनुष्याला मात्र कोणत्याच गोष्टीचे स्पष्टपणे ज्ञान होत नाही.  जसे लहान मुलाला अंधारात वेताळाची भीति दाखविली तर त्याला सगळीकडे वेताळच दिसायला लागतो.  त्यामुळे ते मूल भयग्रस्त होते.  तसेच अविचारी मनुष्याला सुंदर चंद्र सुद्धा एखाद्या दगडाप्रमाणे भासू लागतो.  थोडक्यात, विचारभ्रष्ट मनुष्य चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले मानू लागतो.

 

अविचारी मनुष्याचे मन म्हणजे दुःखरूपी धान्याचे कोठार असते.  जसे कोठारे धान्याने गच्च भरलेली असतात, त्याचप्रमाणे अविवेकी मनुष्याच्या मनात अनेक दुःखे असतात.  त्याच्यासमोर कोणी आले तर तो आपले दुःखचरित्र सांगण्यास सुरुवात करतो.  अशा या मनुष्यावर अनेक संकटे येतात.  अविचारी मनुष्याचे मन हे संकटरूपी लता-वेलींना वाढविणाऱ्या वसंत ऋतुप्रमाणे असते.  जेथे अविचार आहे, तेथे दुःख व संकटे येतात.  वसंत ऋतुमध्ये जशा लता-वेली बहरतात तसेच अविचारी मनुष्यावर दुःखांचा व संकटांचा वर्षाव होतो.  म्हणून हे रामा !  अशा अविवेकाचा व अविवेकी लोकांचा साधकाने दुरूनच त्याग करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ–




Tuesday, January 12, 2021

जागृत-स्वप्न-सुषुपत्यावस्थेचे मिथ्यात्व | Futility of Wake-Dream-Sleep States

 



जागृतपुरुष, स्वप्नपुरुष, सुषुप्तपुरुष हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येत असताना रज्जूमधील सर्प वगैरेदि भासाप्रमाणे यांना असत्, मिथ्या, अध्यस्त का बरे मानावे ?  दोरीमधील सर्पाचा निरास झाल्यावर तो सर्प मिथ्या, असत् हे आम्हास मान्य आहे.  परंतु ‘अन्तःप्रज्ञ’ वगैरे यांना ‘असत्’ का मानावे ?

 

यावर आचार्य उत्तर देतात की, अन्तःप्रज्ञ-बहिष्प्रज्ञ-प्रज्ञानघन यांच्या ‘ज्ञ’ स्वरूपामध्ये म्हणजेच ज्ञातृत्वामध्ये भेद नसेल तरी यांच्यामध्ये रज्जुमध्ये भासमान होणाऱ्या साप, जलधारा वगैरेदि विकल्पांच्याप्रमाणेच एकमेकांचा व्यभिचार होत असतो.  दोरीमध्ये ज्याला सापाचा भास होतो त्याला तेथे पाण्याची धार दिसत नाही किंवा ज्याला पाण्याची धार दिसते, त्याला साप दिसत नाही.  येथे व्यभिचार आहे, म्हणजेच एकाचा भास होत असेल, तर तेथे दुसऱ्या भासाचा अभाव असतो.

 

त्याचप्रमाणे एकाच आत्मस्वरूपामध्ये अन्तःप्रज्ञ-बहिष्प्रज्ञ-प्रज्ञानघन यांचा भास होतो.  त्यावेळी त्यांच्या परस्परांच्यामध्ये व्यभिचार असतो.  ज्यावेळी आत्म्यामध्ये बहिष्प्रज्ञत्व असते तेव्हा तेथे अन्तःप्रज्ञत्व व प्रज्ञानघनत्व यांचा अभाव असतो.  जेव्हा अन्तःप्रज्ञत्व असते तेव्हा अन्य दोन्हींचा अभाव असतो.  तसेच जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था सुद्धा एकमेकांचा व्यभिचार करूनच उदयाला येतात.  स्वप्न-सुषुप्तीचा अभाव होऊन जागृतावस्था येते.  सुषुप्ति व जागृतीचा अभाव होऊन स्वप्नावस्था येते तर जागृत व स्वप्नाचा अभाव होऊन सुषुप्तिअवस्था येते.  एका अवस्थेचा भाव म्हणजेच दुसऱ्या दोन अवस्थांचा अभाव होय.  त्यामुळेच या सर्व अवस्था आणि अन्तःप्रज्ञ वगैरेदि आत्मे हे सर्व सर्पभ्रांतीप्रमाणेच मिथ्या, असत् स्वरूपाचे आहे, हे सिद्ध होते.

 

मात्र या सर्वांचे अधिष्ठान, तुरीय आत्मस्वरूप अव्यभिचारी असल्यामुळे तेच एकमेव सत्य आहे.  तुरीय आत्मस्वरूपाच्या ‘ज्ञ’ स्वरूपाचा कधीही, कोणत्याही अवस्थेमध्ये व्यभिचार, अभाव होत नाही.  म्हणूनच ते अव्यभिचारी स्वरूप आहे.  जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था येतात आणि जातात.  परंतु या सर्व अवस्थांच्यामध्ये नित्य-निरंतर, अखंडपणे, आत्मचैतन्यस्वरूप अव्यभिचारी स्वरूपाने विद्यमान असते.  तेच चैतन्यस्वरूप तीनही अवस्थांना प्रकाशमान करते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ–




Tuesday, March 17, 2020

सुषुप्तीमधील आनंद | Bliss in Deep Sleep




सुषुप्तीमधील आनंद कसा आहे ?  आचार्य येथे दृष्टांत देतात.  ज्याप्रमाणे आपण व्यवहारात पाहतो की, एखादा मनुष्य आयासरहित, निरायास, काहीही कष्ट, परिश्रम न करता बसत असेल तर आपण त्याच्याविषयी बोलतो की, “व्वा !  काय छान बसला आहे.  याला काही काम नाही.  कष्ट नाहीत.  परिश्रम नाहीत.  सुखी प्राणी आहे !”  याचप्रमाणे सुषुप्ति अवस्था अनुभवणारा जीव हा आयासरहित, दुःखरहित असल्यामुळे त्याला येथे ‘आनंदभुक्’, ‘आनंदाचा भोक्ता’ असे म्हटले आहे.  

गाढ सुषुप्ति अवस्थेमध्ये प्रत्येकाला सुखाचा – आनंदाचा अनुभव येतो.  म्हणून तरी प्रत्येक मनुष्य दिवसभर खूप दमला, थकला, वैतागला की, आपण केव्हा झोपायला जाऊ, असे त्याला वाटते.  आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला खूप श्रम झाले की, आपण झोपेचा मार्ग स्वीकारतो.  सहज झोप येत नसेल तर झोपेची गोळी खातो किंवा पोट भर जेवतो.  शरीर सुंद झाले की, मन ही क्रमाने सुंद होते व आपल्याला गाढ झोप लागते.  सकाळी झोपेमधून उठलो की आपण म्हणतो – “मला खूप छान झोप लागली होती.  मी सुखाने झोपलो होतो.”  

यावरून सिद्ध होते की, सुषुप्ति अवस्थेमध्ये जीवाला आयास नसतात.  म्हणूनच तेथे जीव सुख भोगतो.  निद्रा संपवून जागृतावस्थेत येताक्षणीच मात्र द्वैतव्यवहार, मनाचे व्यापार प्रारंभ झाल्यामुळे जीवाला पुन्हा संसाराची, दुःखांची प्रचीति येऊ लागते.  जागृति व स्वप्न संपल्यानंतर जीव पुन्हा सुषुप्ति अवस्थेमध्ये जाऊन तेथे आनंदाचा भोक्ता होतो.  तोच या जीवाचा श्रेष्ठ आनंद आहे.  म्हणून प्रत्येक जीव झोपेवर प्रेम करतो.  

सुषुप्ति अनुभवणारा प्रज्ञानघन हा आनंदमय असेल तरी तो आनंदस्वरूप मात्र नाही, कारण हा आनंद स्वस्वरूपाचा, निरतिशय आनंद नाही.  तर ती अज्ञानाची अवस्था असून तेथे दुःखांचा अनुभव नाही.  म्हणून केवळ त्या अवस्थेला ‘आनंदमय’ म्हटले आहे, इतकेच !  गाढ निद्रेमधील आनंद हा आत्यंतिक निरतिशय होऊ शकत नाही.  



- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ–