अभ्यास म्हणजे काय ? ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा त्या विषयाची
पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक आवृत्ति करणे होय. म्हणजे त्याच स्वरूपाची अप्रतिबद्ध, अखंड वृत्ति
निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात. येथे अभ्यासाचा विषय आहे निर्गुण, निरुपाधिक,
निर्विशेष ब्रह्मस्वरूप ! त्याच्या अभ्यासासाठी
प्रथम साधकाने आपल्या चित्तवृत्ति सर्व विषयांच्यापासून निवृत्त केल्या पाहिजेत. साधकाने आपले मन भूतकाळातील प्रसंग आणि
विषयांच्या आठवणीने क्षुब्ध न करता आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या प्रसंगांनी चिंताग्रस्त
न होता संपूर्ण निवृत्त करावे.
साधकाने तीव्र विवेकजन्य वैराग्याचा अभ्यास
करावा. विवेकाच्या साहाय्याने विषयांच्या
सर्व मर्यादा जाणाव्यात. विषय हे
अनित्य, नाशवान असून सुखसंवर्धन करण्याऐवजी दुःखालाच कारण होतात. ते मनुष्याला शृंखलाप्रमाणे आसक्ति निर्माण करून
बद्ध करतात. हे समजेल, उमजेल त्याचवेळी
विषयांची तृष्णा कमी होईल. या सर्व
मानसिक बंधनामधून, संसारामधून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. थोडक्यात तीव्र वैराग्य आणि तीव्र मुमुक्षुत्वाची
आवश्यकता आहे.
अशा अंतर्मुख, विवेकवैराग्यसंपन्न आणि
एकाग्र चित्ताने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे. सद्गुरू हेच संसारामधून मुक्त करून मोक्षस्वरूपाची
निरतिशय शांति प्राप्त करून देणारे आहेत. तेच उद्धार करणारे आहेत. म्हणून त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून अनन्य
भावाने त्यांची काया-वाचा-मनाने अखंड सेवा करावी. साधकाचे मन संपूर्ण गुरुमय झाले पाहिजे. गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हीच
सेवा आणि गुरु हीच उपासना. अशा प्रकारच्या
प्रदीर्घ सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे चित्तामध्ये आत्मस्वरूपाची वृत्ति
निर्माण होते आणि अनात्मवृत्ति हळूहळू गळून पडते.
स्वयंप्रकाशमान, निर्गुण, निराकार,
जन्ममृत्युरहित, सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारा पुरुष प्राणरहित, मनरहित,
अत्यंत शुद्ध असून अव्यक्तस्वरूप असलेल्या अज्ञानाच्याही पलीकडे आहे. तमसः परमुच्यते | तो अज्ञानाच्या पलीकडे असलेला पुरुष ‘मी’ आहे. याप्रकारे अभ्यासाने पुन्हा पुन्हा प्रयत्न
करून अनात्मवृत्तीचा – देहात्मभावाचा तसेच अहंकार-ममकाराचा त्याग करून आत्मस्वरूपाची
वृत्ति निर्माण करावी. यालाच अभ्यास, योग
असे म्हटले आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param Poojya
Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–