Showing posts with label Yoga. Show all posts
Showing posts with label Yoga. Show all posts

Tuesday, February 14, 2023

योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट | Practice-Failed and Behavior-Failed

 



योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट हे दोन्हीही भिन्न पुरुष आहेत.  कर्मभ्रष्ट पुरुष हा धर्माधर्म न जाणणारा, आचारधर्म न जाणणारा असतो.  तो अविवेकी, अविचारी असून कामांध झालेला असतो.  त्यामुळे तो स्वैर, अनियंत्रित, उच्छृंखल होतो.  स्वधर्म आणि सदाचार, सत्कर्माचा त्याग करुन अनाचार, पापाचरण आणि अधर्माचरण हेच त्याचे जीवन असते.  त्यामध्ये त्याला आवड असते.  तामसी उपभोगामध्येच तो रममाण होत असतो.  त्यामुळे त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होत नाही.

 

याउलट योगभ्रष्ट पुरुष हा निश्चितपणे दैवीगुणसंपन्न असून ब्रह्मचर्य, अहिंसा वगैरे तप अनुष्ठान केलेला तपस्वी, तसेच इंद्रियसंयमन, मनःसंयमन करून शमदमादि संपन्न पुरुष असतो.  तो विवेकवैराग्ययुक्त असून सदाचार, सत्कर्म आणि धर्मानुष्ठान करणारा असतो.  परंतु त्याला योगनिष्ठा प्राप्त झालेली नसते म्हणून तो योगभ्रष्ट आहे असे वाटते.  परंतु मृत्युनंतर त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होते आणि तेथे राहून पुण्यक्षय झाला की, पुन्हा मर्त्यलोकामध्ये आचारधर्माने संपन्न असलेल्या धार्मिक, पुण्यवान श्रीमंताच्या पोटी जन्माला येतो.

 

सत्त्वगुणामध्ये दृढ झालेले सात्त्विक उपासक ऊर्ध्वलोकात जातात.  तेथे दीर्घकाळ राहून पुण्यकर्माचे फळ स्वर्गादि भोग भोगून, पुण्यकर्मांचा क्षय झाल्यानंतर मर्त्यलोकामध्ये शुचिर्भूत असलेल्या श्रीमंत लोकांच्या कुळामध्ये जन्माला येतात.  म्हणजेच ज्याची योनि, कुळ आणि कर्म शुद्ध आहे अशा भाग्यवान श्रीमंत कुळामध्ये योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो.  परंतु कर्मभ्रष्ट पुरुष मात्र पुण्यवान ऊर्ध्वलोकांना प्राप्त तर होत नाहीत, इतकेच नव्हे तर शुचिर्भूत श्रीमंत कुळामध्येही जन्माला येत नाही.  कदाचित श्रीमंत कुळ असेल, परंतु त्याचे कुळ आणि आचार शुद्ध नसतील.  किंवा कुळ आणि आचार शुद्ध असतील तर तो श्रीमंत असेलच असे नाही.  म्हणून येथे विशेषकरून शुचिर्भूत श्रीमंत कुळ असे म्हटले आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ–




Tuesday, September 21, 2021

शांति आणि योगसाधना | Silence and Yog Sadhana

 




नीरव शांतस्वरूप आपल्या आतच आहे.  परंतु बहिर्मुख मनामुळे ते असूनही अनुभवायला येत नाही.  त्यासाठी सूर्यास्ताप्रमाणे मनामधील सर्व बहिर्मुख वृत्ति हळुहळू निवृत्त केल्या तर मनामध्येच असलेली परंतु मनाच्याही अतीत असलेली शांति अनुभवायला मिळेल.  सर्व वृत्तींचा निरोध करून मन निवृत्त करणे आणि स्वस्वरूपामध्ये स्थिर करण्यासाठीच योगसाधना आहे.

 

याचा अर्थ शांति बाह्य विषयांमध्ये नाही किंवा घटपटादिप्रमाणे एखादा विषय नाही.  ती आपल्या आतच आहे.  ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावर एकामागे एक समुद्राच्या लाटा सतत येत असतात, त्यामुळे आपल्याला खळखळाट दिसतो.  इतकेच नव्हे, तर एखादा मनुष्य पोहायला लागला तर सतत आघात होणाऱ्या लाटांच्यामुळे हेलकावे खात राहातो.  परंतु त्याच लाटांच्या खाली समुद्राच्या तळाशी गेले तर तेथे लाटांचे आघात होत नाहीत, हेलकावे नाहीत.  याउलट आपल्याला नीरव शांत स्थिति अनुभवायला येते.  त्याचप्रमाणे आपण सर्व मनाच्या अवस्थेमध्येच जगत आहोत.  त्यामुळे, लाटांच्याप्रमाणे मनामध्ये निर्माण होणाऱ्या विषयांच्या वृत्ति, रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचे आघात सतत होत असतात.  असा एकही क्षण नाही की, त्यावेळी रागद्वेष नाहीत, द्वंद्व नाहीत, विक्षेप नाहीत.  या सर्व ऊर्मींच्यामुळे आपण मनाबरोबर हेलकावे अनुभवतो.  आपल्यामधील शांति, सुख हरवून बसतो.  हेच मन स्वरूपाच्या शांतीपासून वंचित करते.

 

म्हणून जर आपल्याला खरोखरच नीरव शांतस्वरूप अनुभवायचे असेल तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनाच्या अतीत जाण्याचा अभ्यास केला पाहिजे.  मनाच्या अंतरंगामध्ये शांतीचा शोध घेतला पाहिजे.  जसे आपण अंतरंगामध्ये आत जावू त्या प्रमाणामध्ये मनामध्ये वर वर दिसणारे सर्व विक्षेप, संकल्प-विकल्प, द्वंद्व, रागद्वेषांचे परिणाम कमी कमी होतील आणि मन तणावरहित होईल.  मनानेच निर्माण केलेले विचारांचे दडपण कमी होईल.  हळूहळू शांतीचा उत्कर्ष होईल.  यासाठीच योगसाधना आहे.  थोडक्यात मनानेच मनातील सर्व वृत्तींचा त्याग करून मनाने निर्माण केलेल्या सर्व काल्पनिक बंधनांच्यामधून मुक्त होऊन स्वस्वरूपाच्या नीरव शांत स्थितीमध्ये स्वस्थ राहाणे हीच योगाची परमोच्च अवस्था आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–


Tuesday, December 29, 2020

अभ्यासयोग | Meaning of “Abhyas Yog”

 



अभ्यास म्हणजे काय ?  ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा त्या विषयाची पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक आवृत्ति करणे होय.  म्हणजे त्याच स्वरूपाची अप्रतिबद्ध, अखंड वृत्ति निर्माण करणे यालाच ‘अभ्यास’ असे म्हणतात.  येथे अभ्यासाचा विषय आहे निर्गुण, निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूप !  त्याच्या अभ्यासासाठी प्रथम साधकाने आपल्या चित्तवृत्ति सर्व विषयांच्यापासून निवृत्त केल्या पाहिजेत.  साधकाने आपले मन भूतकाळातील प्रसंग आणि विषयांच्या आठवणीने क्षुब्ध न करता आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या प्रसंगांनी चिंताग्रस्त न होता संपूर्ण निवृत्त करावे.

 

साधकाने तीव्र विवेकजन्य वैराग्याचा अभ्यास करावा.  विवेकाच्या साहाय्याने विषयांच्या सर्व मर्यादा जाणाव्यात.  विषय हे अनित्य, नाशवान असून सुखसंवर्धन करण्याऐवजी दुःखालाच कारण होतात.  ते मनुष्याला शृंखलाप्रमाणे आसक्ति निर्माण करून बद्ध करतात.  हे समजेल, उमजेल त्याचवेळी विषयांची तृष्णा कमी होईल.  या सर्व मानसिक बंधनामधून, संसारामधून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे.  थोडक्यात तीव्र वैराग्य आणि तीव्र मुमुक्षुत्वाची आवश्यकता आहे.

 

अशा अंतर्मुख, विवेकवैराग्यसंपन्न आणि एकाग्र चित्ताने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  सद्गुरू हेच संसारामधून मुक्त करून मोक्षस्वरूपाची निरतिशय शांति प्राप्त करून देणारे आहेत.  तेच उद्धार करणारे आहेत.  म्हणून त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून अनन्य भावाने त्यांची काया-वाचा-मनाने अखंड सेवा करावी.  साधकाचे मन संपूर्ण गुरुमय झाले पाहिजे.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हीच सेवा आणि गुरु हीच उपासना.  अशा प्रकारच्या प्रदीर्घ सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे चित्तामध्ये आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण होते आणि अनात्मवृत्ति हळूहळू गळून पडते.

 

स्वयंप्रकाशमान, निर्गुण, निराकार, जन्ममृत्युरहित, सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करणारा पुरुष प्राणरहित, मनरहित, अत्यंत शुद्ध असून अव्यक्तस्वरूप असलेल्या अज्ञानाच्याही पलीकडे आहे.  तमसः परमुच्यते |  तो अज्ञानाच्या पलीकडे असलेला पुरुष ‘मी’ आहे.  याप्रकारे अभ्यासाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अनात्मवृत्तीचा – देहात्मभावाचा तसेच अहंकार-ममकाराचा त्याग करून आत्मस्वरूपाची वृत्ति निर्माण करावी.  यालाच अभ्यास, योग असे म्हटले आहे.  

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–




Tuesday, September 3, 2019

योग आणि सुख-दुःख | Yoga and Joy & Grief



दुःखसंयोगरहित असणारी अवस्था म्हणजे योग, हे सांगताना दुःख या शब्दाच्या अनुषंगाने असलेले विषयसुख हे सुद्धा गृहीत आहे.  याचे कारण ज्यावेळी इंद्रियांचा विषयांशी सन्निकर्ष होतो त्यावेळी त्या सन्निकर्षामधून अनुकूल आणि प्रतिकूल अंतःकरणवृत्ति निर्माण होते.  अनुकूल वृत्ति सुखवर्धन करणारी, सुखाची अनुभूति देणारी असते आणि प्रतिकूल वृत्ति दुःखवर्धन करणारी, दुःखाची अनुभूति देणारी असते.  त्यामुळे दुःख हा शब्द आपोआपच सुखाचा निर्देश करतो.  

सुखाशी होणारा संयोग तात्कालिक असल्यामुळे कोणतेही सुख शेवटी दुःखालाच कारण होते म्हणून इंद्रियसन्निकर्षाने प्राप्त होणारे सर्व सुख-दुःख हे दुःखस्वरूपच आहे असे समजावे.  या सुखदुःखाशी होणारा संयोग म्हणजेच संसार होय आणि सुखदुःखाशी होणाऱ्या संयोगाचा वियोग म्हणजे योग होय.

बाह्य सुखदुःखादि प्रसंगांना प्रकाशित न करण्याची अंतःकरणाची जी विशेष अवस्था आहे, त्या अवस्थेला योग असे म्हणावे.  इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग झाला की, अंतःकरणामध्ये अनुकूल-प्रतिकूल वृत्ति निर्माण होऊन सुखदुःखांचा अनुभव येतो.  ज्या अवस्थेमध्ये या सुखदु:खांचा अनुभव येत नाही, म्हणजेच जी सुखदुःखरहित, संकल्पविकल्परहित अवस्था प्राप्त होते, ती अंतरिक अवस्था ही आत्मस्वरूपाची सुस्थिति होय.  याच अवस्थेला ‘योग’ असे म्हणतात.

यामध्ये योगाभ्यासाच्या साधनेने प्रथम सुखदु:खांचा आवेग आणि त्यामागे असणाऱ्या रागद्वेषांचा प्रभाव हळुहळू कमी होतो आणि बाह्य परिस्थिति अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्यामध्ये मन चलबिचल न होता मनाचे संतुलन कायम राहाते.  यामुळे वृत्ति अंतर्मुख होऊन श्रवणादि साधनेमध्ये एकाग्र होते.  त्यानंतर योगाभ्यासाने वृत्ति ब्रह्माकार होते.  कालांतराने दीर्घ अभ्यासाने वृत्ति परिपक्व होऊन ब्रह्मस्वरूप होते.  त्या अवस्थेमध्ये सुखदुःखांशी झालेला संयोग पूर्णपणे नाहीसा होतो.  ही स्वस्वरूपामध्ये राहण्याची जी विशेष अवस्था, त्यालाच योग असे म्हणावे.  त्यालाच योगारूढ असे म्हणतात.  ही मनाची अवस्था नसून स्वस्वरूपाची स्थिति आहे.  अशी ही योगाची परमोच्च अवस्था प्राप्त झाली म्हणजे साधकाला अखंड नित्य आत्मतृप्ति मिळते.

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ –