Tuesday, May 19, 2026

काम-क्रोधादींपासून रक्षण | Defence Against Desire & Rage

 




मनुष्य म्हणतो की, विश्व बघण्यासाठी आहे. मग काहीही पाहिले तर त्यात काय पाप आहे ?  डोळ्यावर पट्टी बांधून फिरावयाचे का ?  बघावयास लागला की मनामध्ये विचार येतो की, "समोर आलेल्या व्यक्तीबरोबर दोन शब्द बोलण्यामध्ये काय दोष आहे ?"  कोणी भेटले तर दोन गोष्टी बोलणे हा शिष्टाचार आहे.  मन आणखी पुढे जाते आणि म्हणते त्यांच्याशी संबंध ठेवला म्हणून काय झाले ?  लोकांशी संबंध ठेवावयाचा नाही तर कोणाशी ठेवावयाचा ?  याप्रमाणे अनर्थ फुलत जातो आणि मनुष्याचे अधःपतन होते.  आपणच आपले मन क्षुब्ध, संतप्त, विक्षेपयुक्त करतो आणि मनाची शांति, स्थिरता, शुद्धता, संयमन नाहीसे करतो.  हे नाना तऱ्हेचे विचार, पूजा, जप, उपासना वगैरे साधना करताना आपला पिच्छा सोडत नाहीत.  नव्हे, मंत्रजपाच्या वृत्तीच्या ऐवजी अन्य सर्व विचार येत राहातात. हा फार मोठा प्रतिबंध आहे.  म्हणून साधकाने, भक्ताने अधिक सावधान, दक्ष राहिले पाहिजे की ज्यामुळे मनामध्ये पाप संकल्पाचा तरंगच उठणार नाही.

 

दद्यान्नावसरं किञ्चित् कामादीनाम् मनागपि |  कामक्रोधादींना कधीही मनामध्ये येण्याचा यत्किंचित् सुद्धा अवसर देता कामा नये.  इतकी सावधानता, दक्षता मनात सतत ठेवली पाहिजे.  म्हणून तर यमराज सर्व साधकांना आदेश देतात - अप्रमत्तः भव |  म्हणजेच - प्रमादं न कुर्यात् |  साधना करीत असताना साधकाने कोणत्याही प्रकारचा प्रमाद, निष्काळजीपणा, चालढकलपणा करू नये.  अत्यंत दक्ष आणि सावधान राहून मनातील सर्व वृत्तींचे निरीक्षण केले पाहिजे आणि पुसटसा सुद्धा विषयाचा संकल्प आणू देता कामा नये.  आला तर तेथेच काढून टाकण्याचा अभ्यास करावा.

 

आज आमची स्थिति अशी आहे की, आमच्या मनात काय विचार येतात, ते कोणत्या विषयाचे आहेत याची बिलकुल जाणीव नाही.  मन स्वैर, भरकटलेले, कल्पनाविलासामध्ये रमणारे आहे.  यामुळे आपण काय विचार करतो, काय बोलतो, कोठे बोलतो, कोणाला बोलतो याचा परिणाम काय होईल, काय करतो याची यत्किंचित् सुद्धा जाणीव नाही.  सुकाणु किंवा शीड नसलेल्या बोटीप्रमाणे मन मानेल तसे दिशाहीन, स्वैर, अनियंत्रित, उच्छ्रंखल जीवन आहे.  म्हणून येथे म्हटले आहे की कामादि संकल्पांना थोडीही अजाणतेने संधि देता कामा नये.  उलट साधकाने अत्यंत दक्ष राहून मनातील प्रत्येक वृत्तीचे निरीक्षण करावे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ