Showing posts with label Effort. Show all posts
Showing posts with label Effort. Show all posts

Tuesday, March 3, 2026

आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचे कष्ट किती ? | Efforts Required In Self Realization

 




जसे वाळवंटामध्ये वाळूवर पाणी दिसले तरी ते पाणी भासमान असते.  आकाशामध्ये दिसणारे ढग व त्यामधून निर्माण झालेले विविध आकार क्षणाक्षणाला बदलणारे असून ते काल्पनिक असतात.  केळीच्या खांबामध्ये आत-आत शोधत गेले तर त्यामध्ये काहीच सापडत नाही.  जागृत झाल्यानंतर स्वाप्निक पदार्थ प्रत्यक्ष अनुभवायला येत नाहीत.  किंवा दोरीमध्ये दिसणारा साप हा अत्यंत मिथ्या असतो.

 

याप्रमाणेच संसार हा अत्यंत भासमान, काल्पनिक, निःसार आहे हे समजले की, येथिल सुखदुःखांचा मनावर परिणाम होत नाही.  म्हणून सुखदुःखात्मक संसाराचा नाश करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे.  जसे चित्रामधील सर्पाचे सर्पत्व ज्ञानाने नष्ट होते, त्याचप्रमाणे संसाराला दिलेले सत्यत्व या ग्रंथाच्या ज्ञानाने नष्ट होते.

 

हे रामा !  संसाराचे हे मिथ्यात्व समजावून घेणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे ही अतिशय सोपी गोष्ट आहे. अरे रामा !  काही फुले हातात घेऊन चिरडून टाकायची असतील तरी सुद्धा काही प्रयत्न करणे आवश्यक आहे.  परंतु आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये तितकेही प्रयत्न लागत नाहीत.  फुले हातात घेतल्यावर त्यावर दुसऱ्या हाताचा जोर द्यावा लागतो.  थोडा प्रयत्न करावा लागतो.  परंतु मोक्षप्राप्तीसाठी स्थूल शरीराच्या लेशमात्र प्रयत्नांची आवश्यकता नसते.

 

अरे रामा !  मनुष्याला जेवायला सुद्धा थोडे कष्ट पडतात. झोपायचे असेल तरी थोडे कष्ट आहेत.  परंतु परमार्थाच्या प्राप्तीमध्ये इतके सुद्धा कष्ट लागत नाहीत रे !  इतकेच नव्हे तर एका क्षणामध्ये, क्षणाच्या अंशामध्ये सुद्धा परमार्थाची प्राप्ति होऊ शकते.  येथे इंद्रियांची, शरीराची थोडीही हालचाल करण्याची आवश्यकता भासत नाही.  थोडे सुद्धा कष्ट लागत नाहीत.  मात्र येथे बुद्धीचा निरोध करणे आवश्यक असते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–



Tuesday, September 9, 2025

साधकाचा पुरुषार्थ | Prime Effort Of A Seeker

 



मुमुक्षूने, साधकाने कोणता पुरुषार्थ करावा ?  देवर्षि नारद सांगतात माहात्म्यांचा सत्संग करावा आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी साधकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा.  नव्हे, सर्व साधना करावी.  म्हणून शास्त्रामध्ये जी साधने सांगितलेली आहेत - पूजा, अर्चना, व्रत, वैकल्य, उपवास, उपासना, यज्ञ, याग, भजन, कीर्तन वगैरेदि सर्व निःस्वार्थपणे सातत्याने करावीत.  त्या सर्वांचा परिपाक म्हणजे महात्माप्राप्ति होय.  हेच सर्व साधनेचे फळ आहे.  महात्मा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ईश्वरपूजा, सेवा, ईश्वरउपासना, श्रद्धेने आणि निष्ठेने अखंड नियमित करावी, त्याचे फळ म्हणजे आपले मन हळूहळू शुद्ध होते.  अंतर्मुख होते आणि योग्य वेळी आपल्या आयुष्यात महात्मा येतो.  नव्हे महात्मा आहे हे आपल्याला समजते.

 

शास्त्रकार म्हणतात आपण महात्म्याला शोधावयास जाण्याची गरज नाही तर महात्मा आपोआप जीवनात येतो.  त्यासाठी ततपूर्वी आपली योग्य तयारी असली पाहिजे नाहीतर तो आला तरी समजण्याची पात्रता असणार नाही.  म्हणून जेव्हा तयारी होते तेव्हा महात्मा भेटतो.  हृदयाला हृदय भिडते.  शिष्याला गुरु आणि गुरूंना शिष्य भेटतो.  त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की, "हे परमेश्वरा !  मला सद्बुद्धि दे.  मला ऐश्वर्य नको, स्वर्ग नको, काहीही नको.  फक्त महात्म्यांचा सत्संग होऊ दे.  माझ्याकडून त्यांची सेवा घडू दे.  माझी श्रद्धा, निष्ठा, भक्ति त्यांच्यामध्ये राहू दे.  त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींचा मला विसर पडू दे.  माझे लक्ष त्यांच्यातच राहू दे.  त्यांनी दिलेला उपदेश माझ्या मनावर ठासून आत्मसात होऊ दे."

 

भगवान म्हणतात -

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ||                         (गीता अ. ४-३४)

साधूंना अनन्य भावाने शरण जावे.  त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करावे.  संतुष्ट करावे.  म्हणजेच परमेश्वरही संतुष्ट होतो.  त्यामुळे कृपा होऊन आमच्या अंतःकरणात परमेश्वराचे अनन्य प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा उदय होईल.  त्यांच्या कृपेनेच आमच्या जीवनात अंतरिक शांति, समाधान येईल.  जीवनाला पूर्णता येईल.  म्हणून साधुसंग मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत.  साधना करावी.

 

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ –




Tuesday, June 28, 2022

शास्त्र, गुरू आणि स्वप्रयत्न | Science, Guru And Self-Efforts

 



साधकाच्या जीवनामध्ये शास्त्र, गुरु व स्वतःचे प्रयत्न या तीन गोष्टी आवश्यक आहेत.  शास्त्र व गुरुवाक्य हेच साधकासाठी प्रमाण आहे.  त्यानुसारच साधकाने नित्यनिरंतर प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक साधनेमध्ये प्रवृत्त झाले पाहिजे.  त्यासाठी शास्त्र व गुरूंच्यावर नितांत श्रद्धा हवी.  आदि शंकराचार्य व्याख्या करतात - शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणा |  सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तूपलभ्यते ||  शास्त्रवाक्य व गुरुवाक्य यावर पूर्ण विश्वास असणे, तीच वाक्ये सत्य आहेत, अशी बुद्धीची धारणा होणे, यालाच 'श्रद्धा' असे म्हणतात.  या नितांत श्रद्धेच्या साहाय्यानेच साधकाला आत्मवस्तूची प्राप्ति होते.

 

म्हणून साधकाच्या जीवनामध्ये एकच श्रद्धास्थान हवे.  जे काही सांगायचे, जे काही ऐकायचे, जे काही मार्गदर्शन घ्यायचे, ते एकच स्थान पाहिजे.  दोन-तीन-अनेक जणांना विचारून त्याचा काही उपयोग होत नाही.  तसेच गुरूंनी सांगितल्यावर त्यांचा शब्द प्रमाण मानून त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे.  त्याचबरोबर गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रद्धापूर्वक श्रवण करावे.  आत्मविद्या साधकाला केवळ स्वतःच्या बुद्धीने प्राप्त होत नाही.  बुद्धीने शास्त्राचे शाब्दिक ज्ञान होते.  परंतु शास्त्राची अनुभूति मात्र गुरुकृपेनेच येते.

 

याप्रमाणे येथे 'गुरु' हे प्रथम प्रमाण आहे.  येथे दुसरे प्रमाण 'शास्त्र' सांगितले आहे.  जगामध्ये अनेक प्रकारची शास्त्रे, विद्या व त्या त्या विद्यांचे गुरु आहेत.  त्यांपैकी ब्रह्मविद्या ही सर्वश्रेष्ठ असून त्यासाठी वेदांतशास्त्र हे प्रमाणभूत शास्त्र आहे.  वेदन्तो नाम उपनिषत् प्रमाणम् |  (वेदांतसार)  वेदांत म्हणजे उपनिषदे हीच आत्मविद्येसाठी प्रमाण आहेत.  याप्रमाणे साधकाने गुरु व शास्त्र यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून स्वतःचे प्रयत्न करावेत.  मनापासून सातत्याने साधना करावी.  अशा या पुरुषार्थानेच साधकाला आत्मसिद्धि प्राप्त होते.  दैवामुळे कधीही परमपुरुषार्थाची प्राप्ति होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–




Tuesday, April 5, 2022

प्रयत्न-पराक्रमाने दैव ही घाबरेल | Fate Fears Effort

 



आपण स्वतः केलेला शास्त्रविहित प्रयत्न आणि अन्य कोणीतरी म्हणजे दैवाने केलेला पुरुषार्थ या दोघांमध्ये दोन एडक्यांप्रमाणे युद्ध चाललेले असते.  त्यामध्ये ज्याची शक्ति जास्त तोच जिंकतो.  श्रीवसिष्ठ मुनि सांगतात की, आपल्या जीवनामध्ये आपण जसा प्रयत्न-पुरुषार्थ करीत असतो, चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपले दैव सुद्धा आपल्या प्रयत्नांच्याबरोबर लढण्यासाठी, आपली परीक्षा पाहण्यासाठी तेथे येते.  आपल्या प्रयत्नांना शक्तिहीन करण्याचा प्रयत्न करते.  त्यामुळे प्रयत्न आणि दैव मनुष्यासमोर सारख्याच शक्तीने येतात.  एका बाजूला आहे पुरुषार्थ आणि दुसऱ्या बाजूला आहे दैव !

 

अशा वेळी विवेकी मनुष्य अथक प्रयत्न करून धैर्याने, दृढ विश्वासाने, उत्साहाने व सातत्याने प्रयत्न करून दैवाचा प्रभाव कमी करतो.  याउलट अविवेकी मनुष्य मात्र त्याच्यासमोर घोर दैव प्राप्त झाले असताना गोंधळून जातो.  त्याची बुद्धि भ्रमिष्ट होते.  त्यावेळी त्याला पुरुषार्थ दिसतच नाही.  आपण प्रयत्न करू शकतो, हे विसरून तो निष्क्रीय होऊन बसतो.  प्रयत्नांचा त्याग करून मनुष्य निष्क्रीय झाला की, त्याचे दैव आणखीनच बलवत्तर होते.

 

दैव समोर आले रे आले, एखादा वाईट प्रसंग, एखादे संकट आले की, आपण, "काय माझे नशीब ?"  असे म्हणून भयभीत होतो.  आपलेच दैव ज्यावेळेस आपली अशी अवस्था पाहते, त्यावेळेस ते दैव आपल्या मनावर अधिक प्रभाव गाजवते.  त्यामुळे मनुष्य हताश, निराश, उद्विग्न होतो.

 

दैव आणि पुरुषार्थ ज्यावेळेस आपल्यासमोर येतील, त्यावेळी आपण प्रयत्नांचे सामर्थ्य वाढविले तर आपल्याला दैवही घाबरेल.  रघुवंशामध्ये असे थोर राजे होऊन गेले की, त्यांच्यापुढे दैवही घाबरत होते.  ज्यावेळी शत्रूप्रमाणे संकटांशी मी दोन हात कारेन, दैवासमोर दुर्दम्य आत्मविश्वासाने मनुष्य उभा राहील, त्यावेळी संकटे सुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतात.  प्रत्यक्ष मृत्यु सुद्धा ज्ञानी पुरुषाला प्रणाम करतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–




Tuesday, March 22, 2022

शास्त्रविहित आणि शास्त्रहीन पुरुषार्थ | Pro and Anti Shaastra Efforts

 



शास्त्रविहित पुरुषार्थ आणि शास्त्रहीन पुरुषार्थ, असे पुरुषार्थाचे दोन प्रकार आहेत.  त्यांपैकी शास्त्रहीन पुरुषार्थ अनर्थाला कारण होतो, तर शास्त्रविहित पुरुषार्थ परमार्थाचे साधन होतो.  येथे शास्त्रीय - शास्त्रविहित पुरुषार्थ म्हणजेच धर्माचरण होय आणि अशास्त्रीय पुरुषार्थ म्हणजे अधर्म होय.  हेच सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर म्हणता येईल की, चालल्या कर्माचे चांगले फळ मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.  आपण ज्या प्रतीचे बीज पेरू त्याप्रमाणेच धान्य उगवते.  तसेच "जसे कर्म - तसे फळ" हा लोकप्रसिद्ध न्याय आहे.

 

मनुष्याला कर्म तर केलेच पाहिजे.  करावे किंवा करू नये, यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाही.  कर्माशिवाय मनुष्य एक क्षणभरही राहू शकत नाही.  मात्र कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये यामध्ये स्वातंत्र्य आहे.  जन्मल्यापासून मृत्युपर्यंत मनुष्याला कोणते ना कोणते तरी कर्म हे केलेच पाहिजे.  कर्म करायचेच असेल तर वाईट करण्यापेक्षा चांगले कर्म करावे.  कर्म चांगले की वाईट हे ठरविताना शास्त्रालाच प्रमाण मानावे.  कार्य-अकार्य, धर्म-अधर्म यांचा न्यायनिवाडा करताना वेदशास्त्र हेच प्रमाण असून मनुष्याने शास्त्रविहित कर्मच करावे.

 

पुष्कळ वेळेला मनुष्याला शास्त्रविधान माहीत असते.  चांगले-वाईट कर्मही कळत असते.  परंतु ज्यावेळेस चित्तामध्ये काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर-स्वार्थ असे विकार उत्पन्न होतात, त्यावेळी मनुष्य सत्कर्मांचा त्याग करून अधर्मामध्ये प्रवृत्त होतो.  अन्याय, भ्रष्टाचार, हिंसा, व्यभिचार अशी भयंकर कृत्ये त्याच्या हातून घडतात.  म्हणून मनुष्याचा विवेक सतत जागृत पाहिजे.

 

वेद मनुष्याला अनेक आदेश देतात - मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |  अतिथिदेवो भव |  स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् |  देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् |  सत्यं वद |  धर्मं चर |  हिंसा न कुर्यात् |  कलजं न भक्षयेत् |  सुरां न पिबेत् |  अशा सर्व वेदाज्ञा मनुष्याने पालन केल्या तर याच धर्माचरणाच्या अनुष्ठानाने साधकाचे मन दैवीगुणसंपन्न, शुद्ध होऊन त्याला क्रमाने मोक्षप्राप्ति होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–




Tuesday, February 22, 2022

दैवावर मात | Overcoming the Fate

 



श्रीवसिष्ठ मुनि सांगतात की, या वर्तमान जन्मामध्ये मनुष्याने जर विशेष प्रयत्न केला, दृढ अभ्यास, विवेक आणि उत्साह यांनी युक्त होऊन सातत्याने पुरुषार्थ केला तर मनुष्य आपल्या मागच्या जन्मातील दैवही नाहीसे करू शकतो.  जेथे मेरू पर्वत सुद्धा नष्ट करता येतो, तेथे प्राक्तनाची काय कथा ?  बलवान पुरुषार्थ दैवावर मात करू शकतो, असेच येथे वसिष्ठांना सूचित करावयाचे आहे.

 

वस्तुतः नियमाप्रमाणे दैव बदलणे कोणालाही शक्य नाही.  पण तरीही वसिष्ठांनी येथे असे सांगितले असेल तर त्यामागे काही अर्थ आहे.  आपल्या जीवनात काही वेळेस खूप वाईट प्रसंग आले तर आपण 'दैव' म्हणून निराश होतो.  एकामागून एक प्रतिकूल प्रसंग आले, सगळ्या बाजूंनी विरोध व संकटेच दिसायला लागली की, मनुष्याचे धैर्य खचते.  "माझे नशीबच वाईट" असे म्हणून तो निष्क्रीय व्हायला लागतो.  पुरुषार्थाचा, प्रयत्नांचा त्याग करतो.  स्वस्थ बसून राहतो.  त्यामुळे वर्तमान पुरुषार्थाचा त्याग केल्यामुळे त्याचे भविष्यकाळातील प्रारब्धही नीट घडू शकत नाही.

 

अशा निष्क्रीय बनलेल्या मनुष्याला वसिष्ठ मुनि येथे चेतावणी देतात आणि सांगतात की, अरे !  आताचे दैव कितीही भयंकर असेल तरी एका बाजूला ते भोगत असताना दुसऱ्या बाजूला तुझ्या हातात वर्तमानकाळाचा पुरुषार्थ आहे.  तू ऊठ, दृढ अभ्यास कर, योग्यायोग्याचा विचार कर आणि उत्साहाने सत्कर्मामध्ये प्रवृत्त हो.  कारण सत्कर्म तुझे भवितव्य उज्ज्वल करणार आहे.  तुझे कर्म तू इतके उत्कृष्ठ आणि उदात्त कर की, त्यापुढे आत्ताचे वाईट प्रारब्धही निष्प्रभ ठरावे !

 

आत्ता उत्तम पुरुषार्थ करून वाईट प्रारब्धाचा प्रभाव नष्ट करण्यास मनुष्य समर्थ आहे.  या जगात अशक्य असे काहीच नाही.  मेरू पर्वतासारखा महाकाय पर्वतही मनुष्याने ठरविले तर मुळासकट उपटून टाकता येतो.  त्यामुळे वाईट दैवाचा म्हणजे वाईट दैवाच्या प्रभावाचा नाश आत्ताच्या उत्तम पुरुषार्थाने करता येतो.  यामध्ये कोणताही संदेह नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–