मुमुक्षूने, साधकाने कोणता पुरुषार्थ
करावा ? देवर्षि नारद सांगतात माहात्म्यांचा
सत्संग करावा आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी साधकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा.
नव्हे, सर्व साधना करावी. म्हणून शास्त्रामध्ये जी साधने सांगितलेली
आहेत - पूजा, अर्चना, व्रत, वैकल्य, उपवास, उपासना, यज्ञ, याग, भजन, कीर्तन वगैरेदि
सर्व निःस्वार्थपणे सातत्याने करावीत. त्या
सर्वांचा परिपाक म्हणजे महात्माप्राप्ति होय. हेच सर्व साधनेचे फळ आहे. महात्मा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ईश्वरपूजा,
सेवा, ईश्वरउपासना, श्रद्धेने आणि निष्ठेने अखंड नियमित करावी, त्याचे फळ म्हणजे आपले
मन हळूहळू शुद्ध होते. अंतर्मुख होते आणि योग्य
वेळी आपल्या आयुष्यात महात्मा येतो. नव्हे
महात्मा आहे हे आपल्याला समजते.
शास्त्रकार म्हणतात आपण महात्म्याला
शोधावयास जाण्याची गरज नाही तर महात्मा आपोआप जीवनात येतो. त्यासाठी ततपूर्वी आपली योग्य तयारी असली पाहिजे
नाहीतर तो आला तरी समजण्याची पात्रता असणार नाही. म्हणून जेव्हा तयारी होते तेव्हा महात्मा भेटतो.
हृदयाला हृदय भिडते. शिष्याला गुरु आणि गुरूंना शिष्य भेटतो. त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की,
"हे परमेश्वरा ! मला सद्बुद्धि दे.
मला ऐश्वर्य नको, स्वर्ग नको, काहीही नको.
फक्त महात्म्यांचा सत्संग होऊ दे. माझ्याकडून त्यांची सेवा घडू दे. माझी श्रद्धा, निष्ठा, भक्ति त्यांच्यामध्ये राहू
दे. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींचा
मला विसर पडू दे. माझे लक्ष त्यांच्यातच राहू
दे. त्यांनी दिलेला उपदेश माझ्या मनावर ठासून
आत्मसात होऊ दे."
भगवान म्हणतात -
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन
सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः
|| (गीता
अ. ४-३४)
साधूंना अनन्य भावाने शरण जावे.
त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रसन्न करावे.
संतुष्ट करावे. म्हणजेच परमेश्वरही संतुष्ट होतो. त्यामुळे कृपा होऊन आमच्या अंतःकरणात परमेश्वराचे
अनन्य प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा उदय होईल. त्यांच्या कृपेनेच आमच्या जीवनात अंतरिक शांति, समाधान
येईल. जीवनाला पूर्णता येईल. म्हणून साधुसंग मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत.
साधना करावी.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –