ईश्वराचे स्वरूप कृपामय आहे. तो सर्व प्राणिमात्रांच्यावर कृपाच करतो. मग तो महान असो किंवा यःकश्चित जीव असो. तो सर्वांच्यावर सारखीच कृपा करीत असतो. मग तो चांगला आनंदवर्धन करणारा प्रसंग
असो, किंवा अनपेक्षित संकट, प्रतिकूल परिस्थिति आणि दुःख देणारा प्रसंग असो, निंदा,
नालस्ती, अवहेलना असेल किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल, जीवनामध्ये उत्कर्षाचे
दिवस असतील किंवा विनाशाचे असतील. त्या सर्व
प्रसंगांच्यामध्ये परमेश्वराची कृपा ही आहेच. सूर्याचे किरण हे सर्व विश्वाला भेदभाव न करता
प्रकाशमान करतात. त्या प्रकाशाचा कोण, कसा उपयोग करेल हे माहीत नाही. एखादा विधायक काम करेल तर दुसरा विघातक काम करेल.
एखादा धर्माचे रक्षण करेल दुसरा धर्मनाशाचा
विचार करेल. त्याच प्रकाशात एखादा माणसाचे
जीवन वाचवील तर दुसरा जीव घेईल. मग हा दोष
कोणाचा ? सूर्याच्या प्रकाशाचा की मनुष्याचा
? सूर्याचे किरण सर्वांनाच एकसारखा प्रकाश
देणारे, मार्गस्थ करणारे आहेत. त्यात कोणत्याही
प्रकारचा भेदभाव दिसत नाही.
परमेश्वराने आपल्याला काय दिले नाही ? सर्व विश्व फक्त मनुष्याच्या तैनातीलाच निर्माण झाले
आहे असे म्हटले पाहिजे. इतकेच नव्हे, तर मनुष्याला
भावना आणि विचार करण्याची बुद्धि दिलेली आहे. विश्वामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या तीन शक्ति
- ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति - मनुष्याला दिलेल्या आहेत. यांच्या साहाय्याने नानाविध विश्वाचे निरीक्षण
करून अनेक विषयांचे ज्ञान संपादन करून तो ज्ञानसमृद्ध होतो. ऐहिक उत्कर्षासाठी संकल्पशक्तीने भविष्याच्या इच्छा
निर्माण करून त्या पूर्ण करण्यासाठी असामान्य कर्तृत्वशक्ति मनुष्याला दिलेली आहे.
थोडक्यात जीवनाचा सर्वांगीण विकास करावा, विश्व
आणि विषयांच्या साहाय्याने मोहक, सुंदर जीवन तयार करावे, जीवनातील ऐहिक आनंद लुटावा.
याच्याही पलीकडे जाऊन विश्वाच्या
मागे, जीवनाच्या मागे काही तत्त्व आहे का ? याचा बुद्धीने शोध घ्यावा. सर्व विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तसेच अदृश्य,
अव्यक्त गूढ तत्त्वाचा शोध किंवा जीवनाचे गूढ रहस्य शोधून काढण्याचे सामर्थ्य मानवाला
दिलेले आहे. त्या
तत्त्वाच्या अनुभूतीने मनुष्य मन आणि मनाच्या विकारांच्यावर विजय मिळवून जीवनाची पूर्णता,
कृतकृत्यता मिळवू शकेल. थोडक्यात परमेश्वराने
मनुष्याला सर्व काही दिले आहे. ही त्याची अनंत
अपार कृपा आहे. खरे पाहाता - अनंत हस्ते कमलावराने
देता किती घेशील दो कराने । अशी स्थिति आहे.
-
"नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "Narad
Bhaktisutra" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006
- हरी ॐ –