Tuesday, August 18, 2026

विषयरूपी वाऱ्याने अस्वस्थ | Tossed-up By Sense Objects

 



साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर व शांत होतो.  त्यावेळी त्याच्या चित्तामधील सर्व इच्छा गळून पडतात.  मन, बुद्धी, इंद्रिये शांत होतात. ज्ञा नी पुरुष वासनाशून्य झाल्यामुळे त्याची कर्मे सुद्धा क्षीण होतात.

 

ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राचे बटन दाबले कि यंत्र चालू होते व पुन्हा दाबले कि ते बंद होते.  यंत्राला शक्ति मिळाली नाही की, आपोआपच शांत होऊन बंद पडते.  त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये वासना किंवा इच्छा उत्पन्न होत नसल्यामुळे ज्ञानी पुरुषाच्या क्रिया शांत होतात.  तसेच त्याला जगताचे मिथ्यात्व समजल्यामुळे शरीरयात्रार्थ कर्मे करूनही तो अकर्ताच राहतो.  ती कर्मे त्याला बद्ध करीत नाहीत.  सर्व शरीर प्रारब्धाला समर्पित करून तो शांतीने आणि आनंदाने राहातो.

 

पूर्वीच्या काळी एडक्यांचा खेळ होता.  दोरीच्या दोन टोकांना एडके बांधले जायचे.  त्यांच्यामध्ये एक नळी असायची.  नळीमधील दोरी जसजशी हलेल, तसतसे ते एडके हलायचे.  त्याप्रमाणेच हे रामा !  हे मनरूपी यंत्र चालण्यासाठी विषयभोगवासना हीच कारण आहे.  वासनाच मनुष्याच्या मनाला आयुष्यभर खेळवितात.  वासनांच्यामुळे मनुष्याचे मन सतत अस्वस्थ व अस्थिर होते.

 

हे रामा !  ज्याप्रमाणे वाऱ्याची हालचाल ही  वाऱ्यामध्येच होत असते, त्याचप्रमाणे विषयांच्या ज्ञानामध्येच इंद्रियांची हालचाल होत असते.  इंद्रियांचे सर्व व्यापार विषयोपभोगांमध्ये होतात.  म्हणून विषयरूपी वारा आला की, अज्ञानी लोकांचे मन अस्वस्थ व विकारयुक्त होते.  

 

परंतु याउलट आत्मज्ञान मात्र अत्यंत शुद्ध ज्ञान आहे.  जसजसे, अंतःकरणामध्ये आत्मज्ञान उदयाला येते, तसतसे ज्ञानी पुरुष अंतर्मुख होतो आणि त्याला सर्व पदार्थ, सर्व दिशा, सर्व काळ, या सर्वांचे दर्शन आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये होते.  म्हणजेच  तो संपूर्ण दृश्य विश्व आत्मचैतन्यस्वरूपामध्ये पाहतो.  हे संपूर्ण दृश्य विश्व भासमान व मिथ्या असून वस्तुतः आत्मस्वरूपामध्येच अधिष्ठित आहे, याचे त्याला ज्ञान असते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ