Tuesday, August 25, 2026

सहा प्रकारची शरणागति | Six Types Of Surrender

 




भगवंताला दीनभाव अत्यंत प्रिय आहे. नारदमहर्षि म्हणतात - दैन्यप्रियत्वात् |       (नारदभक्तिसूत्र)

भक्त ज्यावेळी अत्यंत दीन, अगतिक होतो, त्याचवेळी तो परमेश्वराला अनन्यभावाने शरण येतो.  म्हणून भगवान म्हणतात -

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |  

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||                             (गीता अ. १८-६६)

किंवा -

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत |

तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ||                         (गीता अ. १८-६२)

हे अर्जुना !  तू अन्य सर्व आश्रयांचा त्याग करून फक्त मला - परमेश्वरालाच श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने शरण ये.  मी स्वतः तुझा या संसारसागरामधून उद्धार करेन.

 

परमेश्वराला शरण जाणे म्हणजे काय ?  शरणागति सहा प्रकारची आहे. शास्त्रकार सांगतात -

अनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् |

रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृत्वे वरणं तथा |

आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागतिः ||

१) परमेश्वराच्या अनुकूल राहण्याचा संकल्प करणे.

२) परमेश्वराच्या प्रतिकूल असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करणे.

३) परमेश्वर माझे रक्षण करेल हा दृढ विश्वास ठेवणे.

४) संकटकाळी परमेश्वरालाच रक्षणकर्ता म्हणून निवडणे.

५) आत्मसमर्पण करणे.

६) अंतःकरणामध्ये दीनभाव, व्याकुळता, दैन्यता निर्माण करणे.

 

अशा प्रकारे परमेश्वराला शरण गेले पाहिजे.  शरणागति ही शारीरिक क्रिया नाही.  शरणागति म्हणजेच स्वतःचे रागद्वेष, विकार, स्वतःचा अहंकार-ममकार, सर्वस्व अर्पण करणे होय.  स्वत्वाचाच त्याग झाला पाहिजे.  अर्पण एकदाच करता येते.  एकदा अर्पण केले की, आपले स्वतःचे काहीच राहात नाही.  


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ