श्रुति शब्द वापरते – तत् दूरे तद्वन्तिके – ते
स्वरूप दूर आहे आणि ते स्वरूप अत्यंत समीप आहे. मग याठिकाणी शंका येईल की, आत्मस्वरूप खरोखरच
दूर आहे की जवळ आहे ? कारण दूर म्हटल्याबरोबर
आपण लगेच विचार करू की, चला आता आपल्याला दूर आत्म्यापर्यंत जावयाचे आहे. प्रथम विवेक, नंतर वैराग्य याप्रकारे हळुहळू
त्या दूर असणाऱ्या आत्म्यापर्यंत पोहोचावे, असा विचार करू. परंतु श्रुति लागेचच दुसराही शब्द वापरते –
आत्मा दूर नसून आत्मा अत्यंत समीप, जवळ आहे.
भाष्यकार दूर याचा अर्थ स्पष्ट करतात – वर्षकोटिशतैः अपि | शेकडो, कोट्यवधी वर्षे झाली तरी अज्ञानी, अविवेकी, मूढ लोकांना
आत्मप्राप्ति शक्य नाही. श्रुति अशा
लोकांसाठीच आत्मा दूर आहे असे सांगते. कारण बहुतांशी लोक श्रुतीने सांगितल्याप्रमाणे –
अन्धेन तमसावृताः | अज्ञानानेच आवृत्त झालेले आहेत. अत्यंत स्थूल, प्राकृत बुद्धीचे
असून “यत् दृष्टं तत् सत्यम् |” असे मानून विश्वालाच घट्ट
पकडणारे आहेत. कनक-कांचन-कामिनी
यामध्येच आसक्त झालेले कामक्रोधलोभमोहमदमत्सरादि विकारयुक्त असणारे, अहंकार ममकार
प्रत्ययांनी युक्त असणारे असे जे लोक आहेत, त्यांच्यापासून आत्मा फार फार दूर आहे.
यावर पुन्हा शंका येईल की, “आत्मस्वरूप
आपल्यापासून अत्यंत दूर असेल तर ते आपल्याला कसे काय प्राप्त होईल ? त्यापेक्षा त्यासाठी प्रयत्न न करणेच चांगले,” असा विचार करून साधक साधनेपासून च्युत होतील. पुन्हा पूर्ववत भोगमार्गामध्ये प्रवृत्त होतील. अशा
साधकांना आत्मस्वरूपप्राप्तीची खात्री देण्यासाठी श्रुति लगेचच सांगते की, आत्मा
हा - तत् अन्तिके | तुझ्या अत्यंत जवळ आहे. भाष्यकार याचे स्पष्टीकरण करतात – तत् अन्तिके समीपे अत्यन्तं एव विदुषां आत्मत्वात् न केवलं दूरे अन्तिके च |
या श्रुतीमध्ये केवढे सौंदर्य आहे ! केवढा अलौकिक अर्थ भरलेला आहे ! श्रुति सांगते की, आत्मा तुझ्यापासून अजिबात दूर
नाही. तू जेथे आहेस, तेथेच आत्मा आहे. जवळ म्हटल्याबरोबर साधक शोधायला सुरुवात करेल. म्हणून भाष्यकार लगेचच सांगतात की, आत्मा हा
अज्ञानी मनुष्याला दूर आहे, परंतु ज्ञानी पुरुषाला मात्र अत्यंत समीप आहे. त्यामुळे अज्ञानी पुरुषाला आत्म्याची समीपता
अनुभवायची असेल तर त्यानेही ज्ञानी झाले पाहिजे. ज्ञानी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–

