ध्यानाचे प्रयोजन हे मनाची एकाग्रता करणे
नाही, सिद्धि, दर्शन हे नाही, तर स्वतःच्या स्वरूपाची सुस्थिति प्राप्त करणे,
स्वस्थ होणे होय. भगवान
प्रत्यक्ष ध्यानप्रक्रिया स्पष्ट करतात –
शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया |
आत्मसंस्थं मनः क्रुत्वा न किञ्चिदपि
चिन्तयेत् || (गीता अ. ६-२५)
क्रमाने मन सर्व बाह्य विषयांच्यापासून
निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर करणे, यालाच ‘ध्यान’ असे म्हणतात. भगवान येथे साधकाला क्रमाने लयच
करायला सांगतात. परंतु मनाचा लय करताना
सुद्धा विशिष्ट क्रम आहे. स्थूल वस्तूचा
लय सूक्ष्म वस्तुमध्ये, सूक्ष्माचा सूक्ष्मतरामध्ये आणि सूक्ष्मतर वस्तूंचा लय
सूक्ष्मतम वस्तूंमध्ये करावा. म्हणजेच
कार्याचा लय कारणामध्ये, कारणाचा लय त्याच्या कारणामध्ये, त्या कारणाचा लय त्याच्याही
कारणामध्ये करावा.
यच्छेद्वाम्ङनसि प्राज्ञस्तद्यच्छेज्ज्ञान
आत्मनि |
ज्ञानमात्मनि महति नियच्छेत्तद्यच्छेच्छान्त
आत्मनि || (कठ उप. १-३-१३)
प्राज्ञ म्हणजे विद्वान पुरुषाने सर्व
इंद्रिये मनामध्ये, मन बुद्धीमध्ये, बुद्धि महत्तत्त्वामध्ये आणि महत्तत्त्व शांतस्वरूप
असणाऱ्या अविकारी, निर्विशेष आत्म्यामध्ये क्रमाने लय करावे.
विवेकी पुरुषाने वाणीचा उपसंहार करावा. वाणी हा शब्द सर्व इंद्रियांचे उपलक्षण आहे. इंद्रियांचा उपसंहार मनामध्ये करावा. त्या मनाचा ज्ञानरूपी बुद्धीमध्ये, प्रकाशस्वरूप
बुद्धीमध्ये लय करावा, कारण बुद्धीच मन वगैरेदि इंद्रियांना व्याप्त करते. त्यामुळेच ती मन, इंद्रियांचा आश्रय, अधिष्ठान
आहे. ती बुद्धि मग प्रथमज असलेल्या
महदात्म्यामध्ये, हिरण्यगर्भामध्ये लय करावी. म्हणजेच हिरण्यगर्भाचा जसा स्वभाव आहे, स्वच्छ
स्वभाव, रागद्वेषविकाररहित, अमलिन, तसा स्वभाव व्यष्टि बुद्धीने प्राप्त करावा. नंतर त्या हिरण्यगर्भाचा अव्याकृतात लय न
करता निर्विकार स्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा. तो महदात्मा, हिरण्यगर्भ शांतस्वरूपाच्या मुख्य
आत्म्यामध्ये, नीरव शांतस्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा. ज्याठिकाणी सर्व विकार, विशेष प्रत्ययांचा निरास
होतो, संकल्पविकल्पांचा निरास होतो. सर्वांच्या
आत अधिष्ठानस्वरूपाने असणारा निर्विकार, सर्व बुद्धिप्रत्ययांचा साक्षी असणाऱ्या
मुख्य आत्म्यामध्ये लय करावा. हीच
निदिध्यासना, ब्रह्माभ्यास, बाधितसमाधि, ज्ञानसमाधि आहे.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–