संभूतीच्या, कार्यब्रह्माच्या उपासनेने साधकाला
सिद्धि प्राप्त झाल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ति होऊन त्याच्या अहंकाराचे वर्धन होते. त्यामुळेच तो घोर अंधकारात प्रवेश करतो, म्हणजेच
अधःपतित होतो. कारणब्रह्माची उपासना ही
प्रकृतिलयाची उपासना असल्यामुळे प्रकृति स्वतःच जड, अचेतन, अविद्यास्वरूप
असल्यामुळे अशा अविद्येच्या उपासनेमुळे साधक अत्यंत घनघोर अशा अंधकारात प्रवेश
करतो.
म्हणून या दोन्हीही उपासना अविद्वान,
अज्ञानी, कामुक पुरुषाला सांगितलेल्या आहेत. जो विवेकी, ज्ञानी पुरुष आहे, तो कधीही जडत्वप्राप्तीसाठी
उपासना करणार नाही. मात्र अविद्वान, कामुक
पुरुषच या अविद्याजन्य उपासनांच्यामध्ये प्रवृत्त होतो. वस्तुतः उपासकाला या उपासानांचे फळ प्रत्यक्ष
प्रकृति देऊ शकत नाही, कारण प्रकृति ही स्वतःच जडस्वरूप आहे. तसेच आणिमादि सिद्धि सुद्धा उपासकाला कोणतीही
कुट्टीदेवता देऊ शकत नाही, कारण या देवताही कल्पित, अध्यस्त, अविद्याजन्य आहेत.
या सर्व उपासकांना प्रत्यक्ष परमेश्वरच फळ
देत असतो.
भगवान म्हणतात –
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति |
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ||
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते |
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ||
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् |
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि || (गीता अ. ७–२१,२२,२३)
जो साधक ज्या देवतेवर श्रद्धा ठेवतो, त्याला
ती अचल श्रद्धा मी परमात्माच प्रदान करतो. त्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या त्या देवतेची
उपासना करतो. त्यामुळे त्याला जे जे फळ
प्राप्त होते, ते फळही मी परमात्माच त्याला देतो. परंतु हे सर्व फळ कर्मजन्य असल्यामुळे ते सर्व
नाशवान, क्षणिक असते. म्हणून मला –
परमात्म्याला शरण येणारे लोक माझ्या परमात्मस्वरूपालाच प्राप्त होतात. मात्र देवातांना भजणारे लोक देवतालोकाला प्राप्त
होतात.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–