अनेक विद्वान लोक शास्त्रशुद्ध ध्यानपद्धती
समजावून न घेता सामान्य लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करतात. आजकाल तर Meditation चे प्रस्थच
माजलेले आहे. कोणीही उठतो आणि जगाला ध्यान
शिकवितो. इतकेच नव्हे, तर प्रत्येकाने
आपापली ध्यानपद्धती develop केलेली आहे, त्याला एक-एक सुंदर नाव दिलेले आहे. पुष्कळ लोक मनाच्या लयावस्थेलाच ध्यान असे
समजतात.
परंतु मनाची लयावस्था म्हणजे ध्यानावस्था
नव्हे किंवा समाधिवस्था देखील नव्हे, तर ती अव्याकृताची, अज्ञानाची अवस्था आहे. म्हणून त्या अवस्थेमध्ये सुद्धा सुषुप्तिप्रमाणे
अज्ञानाचाच अनुभव येतो. जसे, गाढ
झोपेमध्ये मी सुखाचा अनुभव घेतो. म्हणूनच
उठल्यानंतर मी म्हणतो की – सुखेन अहं अस्वाप्सम् | सुखेन
मया निद्रा अनुभूयते | “मला छान झोप लागली होती, मी
सुखाने झोपलो होतो.” तेथे दुखांचा अभाव
होतो.
मनोलयाच्या अभ्यासामध्ये एक क्षण जरी मनोलय
झाला तरी तेथे दुःखांचा अभाव झाल्यामुळे आपोआपच क्षणभर सुखाचा आभास निर्माण होतो
आणि त्यालाच तथाकथित विद्वान लोक ‘आत्मसाक्षात्कार’ असे नाव देतात. याच अनुभवाला सामान्य लोक भुलतात. वस्तुतः या अनुभवामध्ये प्रत्यक्ष त्या ध्यान
शिकाविणाऱ्याचा काहीही पुरुषार्थ नसतो. कारण
मनोलय झाला की, तो अनुभव कोणालाही, कोठेही येऊ शकतो. एक क्षणभर दिव्य सुखानुभूति येते. शरीरामधील, मनामधील सर्व ताण-तणाव नाहीसे होतात.
मन एकदम relax होते. दुःखाने ग्रस्त झालेल्या, पीडित झालेल्या
सामान्य, अज्ञानी मनुष्याला हा मनोलयाचा क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा काहीतरी दैवी
चमत्कार वाटतो.
शास्त्रशुद्ध ध्यानपद्धति समजावून न
घेतल्यामुळे सामान्य मनुष्य त्या मनोलयाच्या अवस्थेलाच आत्मसाक्षात्कार,
आत्मप्रचिती असे नाव देतो. परंतु तो दिव्य
अनुभव एक क्षणापुरता टिकतो आणि पुन्हा उत्थानसमयी दुःख, यातना, शोक-मोहादि संसार
प्रचीतीला येतो. मनोलयाच्या
अवस्थेमध्ये सुषुप्तीप्रमाणे निदान काही क्षण आनंद, सुख प्राप्त होते. म्हणून त्या अवस्थेला गौण अर्थाने, गौण
दृष्टीनेच श्रुतीने अमृतस्वरूप असा शब्द वापरलेला आहे.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–