Tuesday, September 8, 2020

ज्ञानातील मिथ्यात्व | The Futility of “Knowing”

 



आचार्य सुंदर दृष्टान्त देतात – दाह्यं इव दग्धुं अग्नेः दग्धुः न तु अग्नेः स्वरूपं एव |  जो जो दहनाचा विषय होतो, म्हणजेच जे जे दहनयोग्य, दाह्य आहे, त्यास अग्नि जाळतो.  सर्व दाह्य वस्तूंना अग्नि दग्ध करून भस्मसात करतो, कारण सर्व वस्तु या दहनाचा विषय होतात.  तसेच, त्या सर्व दाह्य वस्तु या दाहक असणाऱ्या अग्नीपासून भिन्न स्वरूपाच्या असतात.  म्हणून अग्नि त्यांना जाळू शकतो.  परंतु अग्नि स्वतःच स्वतःला मात्र जाळू शकत नाही.  दहन करण्यासाठी दाहक व दाह्य या दोन भिन्न वस्तूंची आवश्यकता आहे.

 

त्याचप्रमाणे, “मी ब्रह्मस्वरूप जाणतो” या विधानामध्ये विसंगति आहे.  ‘मी’ ‘मी’ ला कधीही जाणू शकत नाही.  अथवा ‘मी’ ‘मी’ ला स्वस्वरूपाला ज्ञानाचा विषय करू शकत नाही.  मी – ज्ञाता माझ्याव्यतिरिक्त असणाऱ्या विश्वामधील यच्चयावत् सर्व ज्ञेय, दृश्य विषयांचे ज्ञान घेऊ शकतो.  कारण त्या सर्व ज्ञेय वस्तु इंद्रियगोचर, दृश्य असून ज्ञात्यापासून भिन्न स्वरूपाच्या आहेत.  परंतु आत्मज्ञानाच्या बाबतीत ‘ज्ञाता’ ही ‘मी’ आहे व ‘ज्ञेय’ वस्तु सुद्धा ‘मी’च आहे.  येथे ‘ज्ञाता’ व ‘ज्ञेय’ हे अभिन्न, अद्वय स्वरूपाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये जाणण्याची क्रिया होऊ शकत नाही.  ‘मी’ ज्ञाता हा सर्वांना जाणणारा असून ‘मी’ स्वतःच, ज्ञानस्वरूप, परब्रह्मस्वरूप आहे.  हाच संपूर्ण वेदांताचा सुनिश्चित, निर्णयात्मक अर्थ आहे.  

 

म्हणूनच येथे – “मी ब्रह्मस्वरूप जाणतो” ही शिष्याची बुद्धि निरास करणेच योग्य आहे.  “मला ब्रह्मज्ञान झाले”, या भ्रमात शिष्य राहू नये, हीच आचार्यांची इच्छा आहे.  अन्यथा शिष्याला शास्त्राच्या श्रवणामधून “मी ब्रह्म आहे” असे तो म्हणेल व दुसऱ्याला प्रवचन सुद्धा देईल.  परंतु प्रत्यक्ष जीवन जगत असताना मात्र तो पूर्वीप्रमाणेच संसारी, दुःखी, निराश, उद्विग्न, द्वंद्वयुक्त, अतृप्त, अशांत राहील.  याला ज्ञान किंवा अनुभूति म्हणता येणार नाही.  म्हणूनच शिष्याला खरे ज्ञान, यथार्थ, सम्यक् व संशयविपर्यरहित तसेच अनुभवसहित ज्ञान देण्यासाठीच शिष्याची “मला ब्रह्मस्वरूप समजले”, ही मिथ्या बुद्धि निरास करणेच अत्यंत योग्य, युक्तिसंगत आहे.         

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ