Tuesday, September 29, 2015

अविनय | Impoliteness



मनुष्य विश्वामध्ये व्यवहार करीत असताना अन्य व्यक्ति, विषय, सृष्टि यांच्याशी तर उद्धटपणे वागतोच.  परंतु मनुष्याचा सर्वात जास्त अविनय हा स्वतःशीच आहे.  मनुष्य सर्वात जास्त उद्धट स्वतःबरोबर आहे.

मनुष्य बुद्धि, मन, इंद्रिये व वाणी या चार स्तरांच्यावर जीवन जगत असतो.  प्रत्येक मनुष्याला स्वभावतःच सद्सद्विवेकबुद्धि प्राप्त झालेली आहे.  योग्य-अयोग्य, चांगले-वाईट, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, नीति-अनीति यांचा निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये असते.  आपण बुद्धीच्या साहाय्याने निर्णय घेतो.  मात्र तोच निर्णय जेव्हा मनाच्या स्तरावर येतो, तेव्हा आपणच त्या निर्णयावर संकल्प-विकल्प करतो.  उदा. आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुद्धीने रोज सकाळी लवकर उठण्याचा निर्णय घेतो.  मात्र आपलेच मन त्यावर दुसऱ्या क्षणी विकल्प करते.  खरोखरच आपल्याला जमेल का ?  त्यापेक्षा ठरवायलाच नको.  याप्रमाणे आपले मन आपल्या बुद्धीच्या निर्णयाची सर्व शक्ति काढून घेते.  माझेच मन माझ्याच बुद्धीला आदर देत नाही.  हाच मोठा अविनय आहे.  मन माझ्या बुद्धीशी उद्धटपणे वागते.

कळतं पण वळत नाही. माझ्या बुद्धीचा निर्णय माझंच मन ऐकत नाही.  माझे मन माझ्याच आज्ञा उल्लंघून टाकते.  हा माझ्यामधील फार मोठा स्वतःशीच असलेला अविनय व उद्धटपणा आहे.  माझ्यामधील हा अभिमान माझ्या बुद्धीला झुगारून देतो.  सर्व तत्त्वज्ञान बाजूला ठेवतो.  मन मानेल तसे वागतो.

मनुष्याच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या अनंत कामना, विषयभोगवासना, कनक-कांचन-कामिनी यांचा लोभ आणि या सर्वांच्या मागे असणारा अभिमान मनुष्याला धर्मापासून च्युत करतो.  मनुष्याला एका तत्त्वनिष्ठ चांगल्या जीवनापासून दूर घेऊन जातो.  म्हणूनच आचार्य प्रार्थना करतात – अविनयं अपनय विष्णो |  हे सर्वव्यापक असणाऱ्या विष्णो !  माझ्यामधील अभिमान दूर कर.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013


- हरी ॐ

No comments:

Post a Comment