Tuesday, March 20, 2018

अज्ञानामुळे बौद्धिक अधःपतन | Intellectual Degradation due to Ignorance





अज्ञानी पुरुषाला ज्ञाननिष्ठा, ज्ञान, आत्माकार वृत्ति, सजातीय वृत्तिप्रवाह, समाधिअभ्यास या सर्व गोष्टी अशक्यप्राय असल्यामुळे काल्पनिक वाटतात.  रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रवृत्तीमुळे त्याचे मन कधीही शास्त्रश्रवणामध्ये तन्मय, एकाग्र होऊ शकत नाही. तो एका बाजूला कानाने शास्त्र श्रवण करतो, परंतु मनाने मात्र काल्पनिक विषय निर्माण करून काल्पनिक उपभोग घेतो. इतकेच नव्हे, तर त्याच्या अंतःकरणामध्ये काम-क्रोध-मद-मोह-मत्सर-स्वार्थ-असूया-द्वेष-कपट असे विकार क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येतात.  त्यामुळे श्रवण करूनही त्याच्या मनावर शास्त्राचा परिणाम होत नाही.  

कामना करून आणि कर्म करून करून त्याची बुद्धि इतकी जड आणि तमोगुणप्रधान झालेली असते की, त्या बुद्धीला दृश्य विषय, भोग याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही.  रात्रंदिवस कसे मी जास्तीत जास्त भोग आणि विषय मिळवेन, कसे मी उच्छृंखल भोग घेईन, याचेच सतत चिंतन केल्यामुळे त्याची बुद्धि अत्यंत जड, मंद झालेली असते.  यत् दृष्टं तत् सत्यम् |  जे दिसते म्हणजेच जे माझ्या पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आहे, तेवढेच सत्य असे झाल्यामुळे ती बुद्धि अत्यंत स्थूल, प्राकृत आणि वैषयिक असते.  

म्हणून आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीला एक ठराविक आकलन शक्ति आहे.  प्रत्येकाची ग्रहणशक्ति कमीजास्त फरकाने आहे.  एखाद्याला पटकन समजते आणि एखाद्याला दहादहा वेळेला सांगूनही साध्या गोष्टीही समजू शकत नाहीत.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे या बुद्धीला आज जड विषयांचे ज्ञान घेण्याची आणि निकृष्ट विषय भोगण्याचीच सवय लागलेली आहे.  

कामना करणे, विषय प्राप्त करणे, विषयांचा संग्रह करणे आणि इंद्रियांच्या साहाय्याने स्वैर उपभोग घेणे याव्यतिरिक्त आपण आपल्या जीवनात काहीही केलेले नाही.  आयुष्याच्या संध्याकाळी तर विषयांचा विचार करून करून बुद्धि इतकी थकते की, त्या बुद्धीला साध्या साध्या गोष्टीही जमत नाहीत.  बुद्धीला आयुष्यभर ताणच न दिल्यामुळे बुद्धीवर गंज चढतो.  बुद्धीने सारासार विचार केला नाही तर बुद्धीवर तमोगुणाचे आवरण येते.  म्हणून रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव कमी करून मन सत्वगुणप्रधान करण्यासाठीच निष्काम कर्मयोग हे साधन आहे.  
  
    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


                                                                      - हरी ॐ                 

No comments:

Post a Comment