Tuesday, November 19, 2024

मयि बुद्धिं निवेशय | Invest Your Intellect in Me

 




मयि बुद्धिं निवेशय |  जी अंतःकरणाची वृत्ति वस्तूच्या स्वरूपाचा निश्चितपणे, संशयविपर्यरहित निर्णय घेते अशा निश्चयात्मक वृत्तीलाच बुद्धि असे म्हणतात.  अशी बुद्धि परमेश्वरामध्ये स्थिर करावी.  म्हणजेच या बुद्धीच्या साहाय्याने सतत परमेश्वराचेच अनुसंधान करावे.

 

येथे भगवान साधकांना अंतरंग साधनेचा उपदेश देत आहेत.  बाह्य कोणतीही कर्मप्रधान, शरीरप्रधान साधना न सांगता मन आणि बुद्धीलाच येथे साधना दिलेली आहे.  याप्रकारे मनाने व बुद्धीने परमेश्वराचे अखंड चिंतन केल्यामुळे काय फळ मिळते ?  भगवान स्वतःच दुसऱ्या चरणामध्ये सांगतात – निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः |  मन आणि बुद्धि परमेश्वरामध्ये ठेवल्यामुळे मनामधील इतर विषयवृत्तींचा निरास होईल.  अंतःकरणामधील भोगवासनांचा प्रभाव कमी होऊन वृत्ति अत्यंत शुद्ध, सात्त्विक होईल.  यामुळे तो भक्त माझ्या स्वरूपामध्येच निवास करेल.

 

याचा अर्थ अंतःकरणशुद्धि झाल्यामुळे या साधकाला गुरुप्राप्ति होऊन श्रवणादि साधनेच्या साहाय्याने आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ति होईल.  देहात्मबुद्धि गळून पडेल आणि तो साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होईल.  किंवा, दुसरा अर्थ – हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञानी पुरुष प्रारब्धाप्रमाणे जीवन जगेल.  प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर म्हणजेच देहपातानंतर त्याला विदेहकैवल्यावस्था प्राप्त होईल.  तो निर्विशेष परब्रह्मस्वरूपामध्येच निवास करेल.  पुन्हा या जन्ममृत्युयुक्त संसारात येणार नाही.  यामध्ये कोणताही संदेह नाही.

 

म्हणून अर्जुना !  तू तुझे मन व बुद्धि माझ्यामध्ये ठेव.  मोक्षप्राप्तीसाठी तू माझाच आश्रय घे.  अत्यंत श्रद्धेने, भक्तीने तू माझी उपासना कर.  त्यामुळे तुला चित्तशुद्धि प्राप्त होऊन क्रमाने गुरुप्राप्ति, ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.  यामध्ये कोणतीही शंका घेऊ नकोस.  निःसंशय होऊन ही श्रेष्ठ असणारी अंतरंग साधना तू कर.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ