हे उदारबुद्धि रामा ! ज्ञानी पुरुष अनेक युक्तींच्या साहाय्याने जे ज्ञान
देतात, त्याची अवहेलना करणे अयोग्य आहे. युक्तिवादाचा
अनादर करून जे लोक युक्तिरहित गोष्टींचा आग्रह धरतात, त्यांना ज्ञाते लोक अज्ञानी समजतात.
याठिकाणी श्रीवसिष्ठ मुनि श्रीरामांना 'उदारबुद्धे'
असे संबोधन वापरतात. "हे रामा ! तुझी
बुद्धि निश्चितच संकुचित नसून उदार आहे."
केवळ तर्कट बुद्धीने युक्तिवाद ऐकता येत नाही.
कारण अशा वेळी तर्कट बुद्धीमुळे युक्तिवादाचे
रूपांतर कुतर्कामध्ये होऊ शकते. म्हणून ज्ञानी
पुरुषांच्याकडून युक्तिवाद ऐकावयाचा असेल तर आपली बुद्धि उदार व शुद्ध पाहिजे. शास्त्रामध्ये, पुराणांच्यामध्ये सांगितलेल्या सर्व
कथा आणि आख्याने ही युक्तियुक्त आहेत. ज्या कथांच्यामध्ये काही युक्ती, सार, तथ्य असते,
त्याच गोष्टी ऐकायला आपल्याला बरे वाटते. अन्यथा
युक्तिरहित असणाऱ्या गोष्टी केवळ भाकडकथा ठरतात. म्हणून ज्या गोष्टींमध्ये शास्त्र नाही, युक्ति नाही, श्रुति-स्मृति प्रमाण नाही, केवळ श्रोत्यांना
हसवायचे म्हणून किंवा रडवायचे म्हणून लालित्यपूर्ण पद्धतीने कथा रंगविल्या जातात, अशा
गोष्टी व्यर्थ आहेत.
म्हणून श्रीवसिष्ठ मुनि येथे सांगतात की, श्रुतिसंमत
युक्तिवादाचा अनादर करू नये. साधकाने दुस्तर्कापासून,
दुराग्रहापासून मात्र दूर राहावे. थोडक्यात,
ज्ञान घेताना केवळ भावनावश होऊन अंधतेने ज्ञान घेऊ नये. अथवा खूप तर्कट बुद्धीने ज्ञान घेऊ नये. तर श्रुतीला, वेदांना शास्त्राला संमत असणाऱ्या तर्काचे
ग्रहण करावे, असाच येथे अभिप्राय आहे.
म्हणून येथे श्रीवशिष्ठ मुनि सांगतात की,
"रामा ! आता यापुढे मी तुला युक्तियुक्त
असणारी सुंदर आख्याने-उपाख्याने सांगेन आणि त्यामधून सिद्ध करेन की, हे सर्व दृश्य
विश्व भासमान आहे. रामा ! तुला आता मी पोकळ कोरडे शाब्दिक ज्ञान न देता अतिशय
रसाळ वाणीने कथा सांगेन. त्यामधून गुह्य ज्ञान
उलगडून दाखवेन. ते तू मनापासून श्रवण करावेस."
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–