आत्मज्ञान
प्राप्त होते याचा अर्थ असा नाही की, आत्म्याला ज्ञान प्राप्त होते. आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्यामध्ये
प्रत्यक्षात ज्ञान नाही किंवा अज्ञानही नाही. ज्ञान आणि अज्ञान हे बुद्धिनिष्ठ आहे. त्या बुद्धीच्या अवस्था आहेत. म्हणूनच ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, असे
म्हटले जाते. आत्मा अज्ञानाच्या विरोधी
नाही. जर आत्मा अज्ञानाच्या विरोधी आहे
असे म्हटले तर आत्मा नित्य असल्यामुळे अज्ञानाचे अस्तित्वच राहाणार नाही आणि
त्यामुळे अज्ञानाचा अभाव झाल्यामुळे जीवाला संसारच येणार नाही.
प्रत्येक
जीव जन्मतःच मुक्त होईल. शास्त्राची,
गुरूंची आणि अध्ययनाची गरजच भासणार नाही. इतकेच
नव्हे तर परमपुरुषार्थ सुद्धा नाही, कारण जीव हा जन्मतःच मुक्त होईल. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र प्रत्येक जीव
आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी असून संसारी आहे. याचाच अर्थ आत्मा ज्ञानस्वरूप असूनही जीवाला
मात्र अज्ञानाची अनुभूति आहे. म्हणून हे
अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे, हे सिद्ध होते. तसेच श्रवण, मनन, निदिध्यासनेच्या अभ्यासाने अंतःकरणामध्ये
आत्माकार वृत्ति उदयाला येऊन ती वृत्ति अज्ञानविरोधी असल्यामुळे अज्ञानाचा ध्वंस
होऊ शकतो.
समजा,
घट समोर असूनही जर दिसत नसेल तर दोष घटामध्ये नाही दृष्टीमध्ये आहे. मोतीबिंदु काढून टाकल्यानंतर घटाची साक्षात
प्रचीति येते. येथे आवृत्ति आणि अनावृत्ति
घटामध्ये नसून डोळ्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे
आत्मा स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशक असल्यामुळे आत्म्याला ज्ञानाची जरुरी नाही. तर अज्ञान बुद्धीमध्ये असल्यामुळे बुद्धीला
आत्मज्ञानाची जरुरी आहे.
तसेच
जर आत्मा अज्ञानी आहे असे मानले तर “मी आहे” हे ज्ञान होणार नाही, कारण
अज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये ज्ञानाची शक्यता नाही. तसेच अज्ञानाला अज्ञानाची जाणीव किंवा ज्ञान
सुद्धा शक्य नाही. याउलट आत्म्याला
अज्ञानाची जाणीव आहे. यावरून सिद्ध
होते की, आत्मा अज्ञानी नसून स्वयंसिद्ध ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञान व अज्ञान आत्म्यामध्ये
नसून बुद्धीमध्ये आहे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment