Monday, July 11, 2022

सद्बुद्धि आणि सत् शास्त्र | Pure Intelligence And Pure Science

 



शुद्ध झालेल्या बुद्धीने सत्शास्त्राचे ज्ञान होऊन शास्त्राचे रहस्य, सार समजते आणि त्याचबरोबर सत्शास्त्राच्या सेवनाने, श्रवणानेच बुद्धि शुद्ध होते.  सत्शास्त्र व सद्बुद्धि यांचा असा परस्परसंबंध आहे.  सरोवरामध्ये किंवा एखाद्या जलाशयामध्ये ज्याप्रमाणे कमलपुष्प विकसित होते, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात सत्शास्त्राने सद्बुद्धीचा विकास होतो.

 

वसिष्ठ मुनि येथे सत्शास्त्र व सद्बुद्धि यांचा अन्योन्य संबंध सांगतात.  जसजसे मनुष्य सात्त्विक असणाऱ्या वेदांतशास्त्राचे गुरुमुखामधून श्रवण करेल, तसतसे त्याच्या मनामध्ये बदल होत जातो.  मन रागद्वेषरहित, विकाररहित, शुद्ध होते.  अशा मनामध्येच अमानित्वादि दैवी गुणांचा उदय होतो. सेवा, त्याग, समर्पण, भक्ति, शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व असे दैवी गुण वर्धन पावतात.  मन शांत होते.

 

मग हे कसे ओळखावे ?  तर मन शांत व शुद्ध झाल्यानंतर मनावर प्रसंगांचा परिणाम होत नाही.  मनामध्ये कामादि विकार उत्पन्न होत नाहीत.  मनामध्ये विषयांचे, उपभोगांचे, प्रसंगांचे, व्यक्तींचे विचार उत्पन्न न होता ईश्वरचिंतन, शास्त्रचिंतन होऊ लागते.  ईश्वराच्या सगुण-साकार सुंदर रूपामध्ये मन तल्लीन होते.  असे मन शास्त्राचा एकेक शब्द गुरुमुखामधून चातकाप्रमाणे श्रवण करते.  त्यावेळी मनामध्ये शास्त्रज्ञान प्राप्त होऊन शास्त्राचे संस्कार दृढ होतात आणि त्या ज्ञानाची अनुभूति येते.

 

याप्रमाणे स्वच्छ सरोवरामध्ये सुंदर कमळ उगवावे, त्याप्रमाणेच सत्शास्त्राच्या श्रवणामधून सद्बुद्धि उदयाला येते आणि सद्बुद्धीमध्येच शास्त्रज्ञान उदयाला येते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ