मूढ लोकं
अविद्येमध्येच अनेक प्रकाराने रममाण होतात. ते स्वतःलाच कृतार्थ मानतात. “ आम्ही आमच्या जीवनाचे प्रयोजन, इतिकर्तव्य
पूर्ण केलेले आहे ”, असा ते अभिमान
निर्माण करतात. ती सर्व लहान बाळे आहेत. लहान मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या
कल्पनाविलासामध्येच रममाण होतात. स्वतःला
हुशार समजतात. पण ते खऱ्या अर्थाने अज्ञानी, अजाण असतात. त्याचप्रमाणे संसाराला इतिकर्तव्य मानणारे, महान
गृहस्थाश्रमी लोक सुद्धा लहान बालकेच आहेत.
याचे कारण त्यांना
असे वाटते की, व्यावहारिक असणारी कर्तव्ये पूर्ण केली की, आपण कृतार्थ, परिपूर्ण
झालो. कनक-कांचन-कामिनी यामध्येच इतिकर्तव्यता
मानणारे, कर्म-कर्मफळाच्या विषयामध्ये आसक्त झालेले असे हे अज्ञानी लोक
तत्त्वस्वरूप जाणत नाहीत. त्यामुळे ते
अत्यंत दुःखी, कष्टी, निराश आणि हताश होतात.
स्वयंभू ब्रह्माजीने
जन्मतःच सर्व इंद्रिये बहिर्मुख करून जणु काही नाश केलेला आहे. आपली सर्व इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख आहेत.
त्यामुळे सर्व जीव बाह्यविषयांनाच पाहतात.
स्वस्वरूपाला मात्र जाणत नाहीत. दुर्दैवाने सर्वच जीव अज्ञानाने आवृत्त
होतात. स्वतःविषयीच्या, विषयांबद्दलच्या, अन्य व्यक्तींबद्दलच्या कल्पने करतात आणि
त्याच कल्पनाविश्वामध्ये जीवनभर वावरतात. इतकेच नव्हे, तर त्याच कल्पना, अपेक्षा, महत्वाकांक्षा
पूर्ण करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतात. लोकरूढीप्रमाणे भोगमय, स्वैर, उच्छृंखल, वैषयिक
जीवन जगतात. त्यांनाच याठिकाणी ‘बालाः’ असे म्हटले आहे.
जशी लहान मुले
क्रीडेमध्ये, खेळामध्येच रममाण होतात, तसेच हे सर्व जीव बाह्य प्रवृत्तीमध्येच रममाण
झालेले असतात. कर्मफळाचा क्षय झाला की, कर्मकर्मफळाच्या नियमाप्रमाणे
ते मर्त्य लोकामाध्येच किंवा त्याहीपेक्षा नीच, निकृष्ट योनीमध्ये, तिर्यक् योनीमध्ये प्रवेश करतात.
- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, मार्च
२००७
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment