अज्ञानी पुरुष सतत सुख-दुःख या
द्वंद्वांच्यामध्येच जीवन जगत असतो. काही
वेळेला सुखी तर पुष्कळ वेळेला मनुष्य दुःखीच असतो. कारण अज्ञानी पुरुषाचे सुख-दुःख हे विषयांच्यावर,
भोगांच्यावर तसेच बाह्य प्रसंग व परिस्थितीवर अवलंबून असते. विषयासक्त, कामुक, भोगी पुरुषाला विषय क्षणाक्षणाला
दुःखाच्या गर्तेत लोटून देतात. एकामागून
एक दुःखाचे प्रसंग, संकटांचे आघात झाल्यामुळे अशा अज्ञानी पुरुषाचे मन सतत दुःखी, निराश,
उद्विग्न होत असते. सतत द्वंद्वयुक्त व
विक्षेपयुक्त होते. याचे कारण मनामध्ये
रात्रंदिवस विषयांचे चिंतन आहे. डोळे
उघडले तरी विषय दिसतात व डोळे बंद केले तरी विषय व भोगच दिसतात. असा विषयलंपट व भोगासक्त पुरुष आयुष्यभर अतृप्त,
अशांत व दुःखीच राहतो.
भगवान विषयासक्त पुरुषाच्या अधःपतनाचा क्रम
सांगतात-
ध्यायतो विषयान्पुसः सङ्स्तेषूपजायते |
सङ्गात्सञ्जायते
कामः कामात्क्रोधोऽभिजायते ||
क्रोधाद्भवति
संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः |
स्मृतिभ्रंशात्
बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति || (गीता अ.
२-६२, ६३)
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या
विषयात आसक्ति निर्माण होते. आसक्तीमधून विषयाची कामना निर्माण होते. कामना पूर्ण न झाल्यास कामनेमधून
क्रोध निर्माण होतो. क्रोधामधून संमोह आणि
त्यामुळे स्मृति भ्रष्ट होते. सारासार
विवेकबुद्धीचा नाश होतो. मनुष्य त्याच्या
परमपुरुषार्थापासून च्युत होतो. हेच
त्याचे अधःपतन आहे. असा हा अधःपतित, विषयी,
कामुक मनुष्य आपल्याच अंतरंगामध्ये असणाऱ्या शांतीचा व सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही.
मात्र ज्याचे मन सत्त्वगुणप्रधान, अंतर्मुख,
विषयासक्तिरहित होऊन विवेकवैराग्यसंपन्न झालेले आहे, त्यालाच अंतरंगामध्ये निरतिशय
शांतीचा व आनंदाचा अनुभव येतो. त्याची
शांतीची अवस्था कोणत्याही प्रसंगामध्ये नाश पावत नाही. तर उलट जिथे-जिथे त्याचे मन जाते, तिथे तो नित्य
आनंदस्वरूपामध्येच स्थित असतो.
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj
Govindam" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st ध्यायतो Edition, April 2015
- हरी ॐ–