गुढीपाडवा
श्रीशालिवाहन शके
१९३५
विजय नाम संवत्सर
आरंभ
चैत्रे मासि जगद् ब्रह्मा
ससर्ज प्रथमे S हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा
सूर्योद्ये सति ||
गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ !
साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या
निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या
निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.
श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये
गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण
होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी
अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व
प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या
निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची
प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे
पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो.
तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता
कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो.
याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या
तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत
असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या
निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे
पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर
तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे
लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून,
घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी
उभारली जाते. गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात.
सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व
वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी
प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -'ब्रह्मध्वजाय नम:|' असे म्हणून नमस्कार करून
गुढी उतरविली जाते. गुढी आत
आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख,
शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे
तोरण हे मंगलसूचक आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने,
फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात.
यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात.
त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे
पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन
म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति
ठेवावी, हाच संदेश मिळतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील
संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व
त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते
वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया
कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील 'मी कोणीतरी फार मोठा आहे,' हा
अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र,
विनयशील होते.
गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे.
त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व
जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची
संकल्पना केलेली आहे.
गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो.
अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील
नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन
स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच
सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच
सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व
सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व
आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो.
म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व
परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे
गुढीपाडवा !
यावरून लक्षात येते की,
सृष्टीची
निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू
संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक
दृष्टिकोन आहे.
परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, गुढीपाडवा २०१३, श्रुतिसागर आश्रम
Excellent explanation !
ReplyDeleteExcellent details of Gudipawada
ReplyDeleteThanks for sharing such a wonderful information in simple words.
ReplyDeleteVery useful details. There is a practice in some houses to fill the kalash (silver/copper) with water after the Gudhi is taken down in the evening and drink the same after few hours. Can anybody explain advantages of such act? Satish Shembekar
ReplyDelete