ज्यावेळी हे चित्त एका विषयावरून दुसऱ्या विषयावर
जात असते, त्यावेळी एक विषयवृत्ति संपून चित्तामध्ये दुसरी विषयवृत्ति उत्पन्न होत
असते. त्या दोन वृत्तींच्यामधील चित्त हे शांत,
वृत्तिरहित असते. ती चित्ताची अवस्था म्हणजेच
चैतन्य असून हे राघवा ! त्याच स्थितीमध्ये
तू सदैव तन्मय हो. जेथे जागृतावस्था
नाही, स्वप्न नाही अथवा निद्राही नाही, असे जे या अवस्थांच्याही अतीत असणारे सनातन
निर्विषयक परमात्मस्वरूप आहे, ते चेतन नाही व जडही नाही, अशा परमात्मस्वरूपाशी तू तन्मय
हो. एखाद्या दगडामध्ये जी जडता असते, त्या
जडतेचा त्याग केल्यावर जी निश्चल स्थिति राहते, तशा निश्चल स्थितीमध्ये तू सदैव राहा
! एखाद्या वेळी तू काही व्यवहार करीत असशील
किंवा काही वेळेस क्रियारहित होऊन शांत, अक्षुब्ध होऊन बसशील, अशा दोन्हीही क्रिया
व अक्रिया यांच्यामध्ये तू अत्यंत स्थिर-निश्चल-कूटस्थ असणाऱ्या परमात्मस्वरूपाशीच
तन्मय हो.
हे राघवा ! अशी सहजस्थिति प्राप्त झाल्यानंतर तू शरीराने
अनेक प्रकारची कर्मे करीत असशील किंवा व्यवहाररहित होऊन शांत बसला असशील, तरीही तू
त्या सहजावस्थेमध्ये सुखाने राहा. कारण याप्रकारे
स्वरूपनिष्ठ झालेला ज्ञानी कशाचीही इच्छा करीत नाही. तो केव्हाही कोणाचाही थोडा देखील द्वेष करीत नाही.
राघवा ! हीच अत्यंत परिपूर्ण व श्रेष्ठ स्थिति आहे. या आत्मस्थितीमध्ये तू निःशंक होऊन स्वस्थ राहा.
देहबुद्धि धारण करू नकोस. देहाशी तादात्म्य पावून देहवृत्तींच्यामध्ये पडू
नकोस.
ज्याप्रमाणे अज्ञानी लोक भविष्याचे चित्रण करून
अनेक कार्यांच्यामध्ये प्रवृत्त होतात, त्याप्रमाणे हे रामा ! तू या चित्तवृत्तींच्यामध्ये यत्किंचित् देखील व्यग्र
होऊ नकोस. तेर उलट तू सत्यस्वरूप आत्मचैतन्यामध्ये
स्थिर हो. जसे दूर स्थानामध्ये असलेला मनुष्य
आपल्यासाठी लाकूड किंवा दगडाप्रमाणेच असून त्याचा आपल्याला काहीही उपयोग नसतो, तसेच
तू या चित्ताकडे पाहा. एकदा तू आत्मस्वरूपामध्ये
स्थिर व दृढ झालास की, तू चित्तरहित होशील. मग तू चित्ताशी तादात्म्य पावणार नाहीस.
हे रामा ! ज्याप्रमाणे दगडामध्ये पाणी नसते, पाण्यामध्ये
अग्नि नसतो, त्याचप्रमाणे तुझ्यामध्ये - या जीवात्म्यामध्ये चित्ताची वास्तविक सत्ता
नसतेच. मग सांग रामा ! जीवात्म्यामध्येच चित्त नसेल तर परमात्म्यामध्ये
कोठून असणार ? अर्थात परमात्म्यामध्ये चित्त
अस्तित्वातच नाही. त्यामुळे जे चित्त
मुळात अस्तित्वातच नाही, त्या चित्ताने काही पाहिले असेल किंवा काही क्रिया केल्या
असतील तर त्या सर्व क्रिया करूनही न केल्यासारख्याच आहेत, असा तू सतत विचार कर. कारण पुन्हा पुन्हा केलेल्या या विचारानेच जीव चित्ताच्या
अतीत जाऊ शकतो.
-
"योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya Swami
Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti
2022
- हरी ॐ–

