Tuesday, October 8, 2024

ईश्वर खरच निष्ठुर आहे का ? | Is God Really Unkind ?

 



ईश्वरकृपा असताना जीवनात संकटे, प्रतिबंध, आपत्ति, कष्ट, दुःख, यातना कशा काय येतात ?  ज्याठिकाणी ईश्वरकृपा असेल तेथे आनंदच असला पाहिजे.  पण हे प्रत्यक्षात दिसत नाही.  त्यामुळे शंका येते की खरोखरच परमेश्वर कृपाळु, दयाळु आहे, का निष्ठूर आहे ?  अशी शंका घ्यावयाचे कारण नाही.  ज्याप्रमाणे चांगल्या, सुखाच्या प्रसंगामध्ये ईश्वरकृपा आहे, तशीच संकटकाळी दुःखाचे वेळी सुद्धा परमेश्वरकृपा आहेच.  ती पाहाण्याची आमच्या मनात ताकद नाही.  मनाची पक्वता नाही.  आपल्या मनाची दारे बंद आहेत.  कल्पनांच्या भराऱ्यामध्ये, राग-द्वेषांच्या जाळ्यामध्ये आपणच आपल्याला बद्ध केलेले आहे.

 

जर एखादा मुलगा म्हणाला की, माझ्या आईचे प्रेम नाही, तर ते किती अव्यवहार्य, अयुक्त आहे.  अशी कोणती माता असेल की जिने नऊ मास आपल्या उदरात मुलास वाढवून आपल्या रक्तातून त्याला अन्न, पाणी पुरवून त्याचे पोषण, वर्धन केले.  असह्य यातना सहन करून त्याला जग दाखविले.  एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला ती मुलाच्याच कल्याणाचा विचार करते.  त्याची काळजी घेते.  तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपते.  अशा मुलाने जर आईचे माझ्यावर प्रेम नाही असे म्हटले तर ते योग्य आहे का ?  सुखदुःखाच्या अनेक प्रसंगात ती त्याच्या मदतीला धावून जाते.  स्वतःच्या प्रेमाने त्याला गोंजारते.  परंतु पुत्राच्या कमनशीबामुळे ते प्रेम तो बघू शकत नाही.  तिचे वात्सल्य तिच्या अंतापर्यंत कायम असते.  परंतु कल्पनेच्या विलासात रंगणाऱ्या त्या अभागी पुत्रास ते दिसत नाही.

 

एखादा डॉक्टर रोग्यावर उपचार करतो.  त्यावेळेस त्या रोग्याच्या यातना, दुःख त्याला समजतात.  रोगाची तीव्रता किती आहे हे जाणून त्याप्रमाणे तो उपचार करतो.  एखादा रोगी गळूमुळे वेदनेने तळमळत आहे.  त्याला असह्य यातना होत आहेत.  अशावेळी आपण जर म्हटले की काय डॉक्टर आहे पहा !  आधीच बिचारा असह्य वेदनेने तळमळत आहे आणि हा डॉक्टर आणखीन कापाकापी करून त्याला अधिकच यातना देत आहे.  तो डॉक्टर दुष्ट, निर्दयी, कसाई आहे.  असे म्हणणे योग्य होईल का ?  डॉक्टरची कृति बाहेरून जरी निर्दयपणाची वाटली तरीही त्याच्या मनात रोग्याविषयी निष्ठुरता नाही.  उलट त्याच्याबद्दल जिव्हाळा, प्रेमच आहे.  म्हणूनच तो रोग्याला वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न करतो.  तसेच परमेश्वरकृपा असूनही दुर्दैवाने ती आपल्याला दिसत नाही.  तो किती दयाळु-कृपाळु आहे हे बघण्यासाठी मनाचे दरवाजे उघडले पाहिजेत.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ