या कथानकामध्ये श्रुति सांगते की, देवासुर
संग्रामामध्ये देवांचा विजय झाला. व्यावहारिक
दृष्टीने हा विजय देवांचा असेल तरी हा प्रत्यक्ष देवांचा विजय नव्हता, कारण
देवांना प्राप्त झालेले बल, सामर्थ्य हे त्यांचे स्वतःचे नसून त्यांच्या
उपाधीमध्ये संनिविष्ट असलेल्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, विश्वनियामक
परमेश्वराचे ते सामर्थ्य होते.
परंतु देव सत्त्वगुणी असतील तरीही
दुर्दैवाने त्यांच्यामध्ये अभिमान निर्माण झाला. यामुळेच देव विचार करायला लागतात की, हा विजय
आमचाच आहे. हा विजय आमच्याच कर्तृत्वाने, सामर्थ्याने
व पुरुषार्थाने मिळाला आहे. यात ईश्वराची
कृपा वगैरे काही नाही. यामुळे देव या
विजयाने धुंद, उन्मत्त झाले. हा विजय व
विजायामधून प्राप्त झालेले फळ म्हणजेच महिमा, विभूति आमचीच आहे, असा चुकीचा ग्रह
त्यांनी केला. त्यांच्यामध्ये कर्तृत्व,
भोक्तृत्व भाव निर्माण झाला. अहंकार-ममकारादि
प्रत्यय निर्माण झाले.
देवांच्या आत स्थित असणाऱ्या सर्वसाक्षी
ईश्वराने देवांचा हा मिथ्या अभिमान तात्काळ जाणला. त्यामुळे देवांच्यावरील करुणेने युक्त होऊन
ब्रह्माने विचार केला की, देवांना निर्माण झालेल्या या व्यर्थ, मिथ्या अभिमानामुळे
देवांचा देवपणा नष्ट होऊन दैवीगुणसंपत्तीचा ऱ्हास होईल. देवांच्यामध्ये दैवीगुणांची जागा आसुरीगुण
घेतील. आसुरीगुणसंपत्तीचे प्राबल्य
वाढल्यामुळे देव स्वतःच सतःच्या नाशाला कारण होतील. म्हणजे असुरांच्याप्रमाणेच देवांचाही पराजय
होईल. जगाच्या सुस्थितीला आवश्यक असणारी
दैवीगुणसंपत्ति नष्ट होईल व हळुहळू जगाचाच ऱ्हास होईल. आपणच निर्माण केलेल्या या मानवजातीचा नाश होईल.
यामुळे ब्रह्माने ठरविले की, देवांच्यामधील
अभिमान, मद हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाहीसा केलाच पाहिजे. देवांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक
आहे. देवांनी पुन्हा देवांच्यासारखेच
वागावे. ईश्वरी परमोच्च सत्ता मान्य करून
धर्माचरणात व्हावे. म्हणून देवांना
धडा शिकविण्यासाठी, त्यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी, त्यांना पुन्हा देवत्वाच्या
मार्गावर आणण्यासाठी परब्रह्म देवांच्यासमोर आपल्या योगमायेच्या साहाय्याने अचानकपणे
अवतीर्ण झाले.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–